Sunday, 10 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशाचे पुढील सीडीएस-संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची नियुक्ती

·      पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी; तमिळनाडूत जोसेफ विजय आज शपथ घेणार; केरळमध्ये काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही

·      राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ जाहीर; राज्यातल्या तीन पंचायतींचा गौरव

·      अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक जाहीर

आणि

·      निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकावर कारवाईची शिवसेनेची मागणी; एमआयएमकडून मात्र पाठराखण

****

देशाचे पुढील सीडीएस-संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ येत्या ३० मे रोजी पूर्ण होत आहे. याच दिवशी जनरल एन. एस. राजा सुब्रमणी, पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी १ सप्टेंबर २०२५ पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत.

****

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी काल शपथ घेतली. कोलकाता इथं राज्यपाल आर.एन. रवी यांनी त्यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पाच कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह भाजप-एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार यांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लक्षणीय ठरली.

**

दरम्यान, तमिळनाडू मध्ये टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. विजय यांनी १२० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र काल राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सादर केलं, त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करत, येत्या १३ मे पर्यंत विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. चेन्नईत आज सकाळी दहा वाजता हा शपथग्रहण सोहळा होणार आहे.

**

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून एन रंगासामी यांना नियुक्त केलं आहे. नायब राज्यपाल कैलास नाथन यांनी रंगासामी यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं, येत्या १३ मे रोजी रंगासामी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतील.

**

दरम्यान केरळमध्ये विधीमंडळ पक्षनेत्याच्या संदर्भात काँग्रेस पक्षाचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं आहे.

****

देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रीजीजू यांनी फेटाळून लावला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रीजीजू

 

पारसी समाजाने राष्ट्रकार्यात दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करत, पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

****

केंद्र सरकारनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ ची घोषणा केली आहे. यात देशभरातून निवडलेल्या ४२ पंचायतींना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये कर्ऩाटक सहा पुरस्कारासह पहिल्या तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी पाच पुरस्कारासह दुसरा स्थानावर आहेत. राज्यात भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालक स्नेही पंचायत म्हणून एक कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा ७५ हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी एक कोटी रुपये तर चांभार्ली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी साडेसदतीस लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे.  येत्या तीन जून रोजी नवी दिल्ली इथं हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

****

विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा, यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे सौर कृषिपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही सौर पंपांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावं, असं आवाहन केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पीएम-कुसुम बी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधत होते. राज्याचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, मंत्री अतुल सावे यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

****

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. फळं कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश रावल यांनी दिले.

दरम्यान, राज्यातील काही भागात अनेक व्यापारी, संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा इशाराही रावल यांनी दिला आहे.

****

राज्यात इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-एक मधील दुरुस्ती तसंच भाग-दोन भरण्याची प्रक्रिया ही २१ आणि २२ मे रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम द्यायचा आहे. २६ मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. २६ ते २८ मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी तसंच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक राहणार आहे.

****

निदा खान प्रकरणावरून एमआयएम नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काल छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयात जाऊन निवेदन दिलं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांना हे निवेदन दिलं. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी, काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेतली. निदा खान तसंच मतीन पटेल यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसून, न्यायालय त्यांना दोषी ठरवत नाहीत, तोवर आपण त्यांच्या पाठिशी असल्याचं, ओवैसी यांनी म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जालना इथं काल विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाला घेराव घालत त्यावर सुपाऱ्या आणि काळं तेल फेकलं. जालन्याच्या छत्रपती संभाजीनगर रस्ता चौफुलीच्या ठिकाणी ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उत्सव समितीतर्फे काल सकाळी शहरात भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. बहुजन आणि इतर मागास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या फेरीचं उद्घाटन करण्यात आलं. सिडको इथल्या कॅनॉट उद्यानात महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राजपूत समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाउंड प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक आहे. कांस्यपदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्याविरोधात १४७ विरुद्ध १४४ अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत,काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्स संघावर ७७ धावांनी विजय मिळवला.

या स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंटस यांच्यात होईल, तर दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता रॉयल चलेंजर्स बंगरुळू आणि मुंबई इंडीयन्स यांच्यात, छत्तीसगडमध्ये नवा रायपूर इथं होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल दरवाजाच्या जतन, दुरुस्तीच्या कामामुळे उद्या सोमवारपासून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले. उद्यापासून काम पूर्ण होईपर्यंत भडकल दरवाजातून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

****

माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठीच्या एकोणिसाव्या मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरवात झाली आहे. miff.in या वेबसाइटवर ही नोंदणी करता येईल.

****

हवामान

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काल संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं.

मराठवाड्यात लातूर तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल पाऊस झाला.

दरम्यान, राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४० अंशापेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...