Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तिघांचा
मृत्यू,
कडक कारवाईचा निवडणूक आयुक्तांचा इशारा
· राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना
येत्या ३१ डिसेंबर पर्यंत उपलब्ध
आणि
· भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल
****
पश्चिम बंगाल, आसाम, केरळ,
तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून
तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापना झाली असल्याचं
संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार
स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर होत
असलेल्या हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांबाबत निवडणूक आयोगाने कडक निर्देश जारी केले
आहेत. हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त
ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं पश्चिम
बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस
दलांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात
तिघांचा मृत्यू झाला आहे. कोलकात्यातील न्यूटाउन परिसरात काल एका भाजप कार्यकर्त्याची
मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी निषेध
आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
****
पश्चिम बंगालमधील नवीन भाजप सरकारचा शपथविधी ९ मे रोजी 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर सकाळी १० वाजता होणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या कार्यक्रमाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपशासित
राज्यांमधील अनेक मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा
राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी ११ मेनंतर
होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
तामिळनाडूमध्ये, TVK चे
प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली आणि राज्यात
नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. TVK ने
१०८ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस नेते गिरीश चोडणकर आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी
विजय यांची भेट घेतली आणि पाच आमदारांच्या समर्थनाचे पत्र त्यांना सुपूर्द केले. दरम्यान, तमिळनाडूतील DMK च्या आघाडीत असलेला VCK हा पक्षही विजय यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यांचे दोन आमदार आहेत.
केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात युडीएफमध्ये अनौपचारिक
बैठका सुरू आहेत. पुदुच्चेरीमधे AI NRC चे एन. रंगासामी पुन्हा
एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
****
पंजाबमध्ये जालंधर येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर
आणि अमृतसरच्या खासा येथील लष्करी तळावर काल रात्री दोन स्फोट झाले. या स्फोटामागे
पाकिस्तानची गुप्तचर संस्था, आयएसआयचा हात असल्याचा सुरक्षा
यंत्रणांना संशय आहे. पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी लष्कर आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांसह
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमृतसरच्या खासा येथील घटनास्थळाला भेट दिली. प्राथमिक
तपासानुसार दोन्ही ठिकाणी आयईडी वापरण्यात आले होते. पोलीस, लष्कर आणि इतर सुरक्षा दल या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
****
NPS
अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी
राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य
सरकारनं घेतला आहे. अर्थ विभागाने आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत
कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची
किमान २० वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन
मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन मिळेल. ही
रक्कम किमान साडे ७ हजार रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण दहा वर्षांपेक्षा
कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्याअंतर्गत निवृत्तीवेतनाला पात्र ठरणार नाही.
राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्तीवेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ६० टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळेल आणि
त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या
कर्मचाऱ्यांना NPS
मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा १० टक्के व्याजासह करावा
लागेल. विविध विद्यापीठे, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांनाही हे नियम लागू होतील.
****
मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर
धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक
धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे, असं मुडीज या संस्थेच्या अहवालात
म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षांतल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत एक आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल
या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे
चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे.
****
संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम
कायद्याचं राज्य, शांतता, स्थिरता
आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आज केलं. मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज
विविध मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. या
चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते. या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली. व्हिएतनामचे
राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत राष्ट्राध्यक्ष तो लाम
यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत-व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला
प्राधान्यक्रमच दर्शवतो, असं मोदी म्हणाले.
****
राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका
ही आंतरराष्ट्रीय संस्था महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यास उत्सुक असून येत्या काळात
यासाठी ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंत्रीमंडळानं मान्यता दिली असल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पात वर्धा, पालघर,
रत्नागिरी, अहिल्यानगर या नवनिर्मित शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयांसाठी तसंच मुंबईतील जीटी, सेंट
जॉर्ज,
धुळे, सोलापूर, अंबेजोगाई,
अकोला, आयजीएमसी नागपूर, रत्नागिरी,
पालघर आणि धाराशिव इथल्या नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन
करण्यात येणार आहे.
****
सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी
करत धाराशिव जिल्ह्यानं राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल
घेत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी
कीर्ती किरण पुजार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. ध्वजदिन
निधी-२०२४ साठी महाराष्ट्र शासनाकडून धाराशिव जिल्ह्याला ५७ लाख रुपये इतकं उद्दिष्ट
देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात १ कोटी ३४ लाख ८४ हजार रुपये इतका निधी जमा करण्यात
आला.
****
ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं अमली पदार्थ विरोधी पथकानं आज मोठी
कारवाई करत तब्बल २१ लाख ४० हजार रुपये किमतीचा १०७ किलो गांजा जप्त केला. यावेळी पोलिसांनी
३ तस्करांना अटक केली आहे. वसीम खान उर्फ पिला, दिनेश
कुमार आणि मोहित वर्मा अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. खडकपाडा पोलिस ठाण्याच्या
हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड आणि उपनिरीक्षक जितेंद्र ठोके यांच्या
पथकानं वाडेघर परिसरातील वाडेकर डम्पिंग ग्राउंडजवळ सापळा रचून या तिघांना अटक केली.
****
सोलापूर इथले ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं
आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. माधव पवार यांचे
‘हे शुभशकुनांचे पक्षी’ आणि ‘गरूडभरारी’
हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल
भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. माधव पवार
यांची अनेक गीतं कॅसेट आणि इतर माध्यमातून प्रसिद्ध झाली असून ती नामवंत गायकांनी गायलेली
आहेत.
****
लातूर जिल्ह्यासह औसा तालुक्यात, राज्य
शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज औसा तालुक्यात, फत्तेपूर,
दावतपूर, तांबरवाडी, राजेवाडी इथल्या जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर
ते पत्रकारांशी बोलत होते.
****
त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून
लहान-मोठ्या उद्योगांना चालना मिळणार आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक आणि पर्यटकांमुळं
जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून नाशिक, त्र्यंबकेश्वरच्या ब्रँडिंगची मोठी संधी आहे. याचा लाभ जिल्ह्याला व्हावा यासाठी
आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचं प्रतिपादन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास
प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलं आहे. ते आज नाशिकच्या
हॉटेल ताज गेट वे इथं गुंतवणूक परिषदेत आयोजकांशी बोलत होते.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब
किंग्ज संघाशी होईल. हैदराबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment