Saturday, 13 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      एसटी प्रवास सुविधांसाठी येत्या १ ऑगस्ट पासून NCMC कार्ड बंधनकारक

·      येत्या २१ जूनला नियोजित नीट फेरपरीक्षेच्या कालावधीत १५ मिनिटे वाढ

·      प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन

आणि

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसामुळे शेड कोसळून दोघांचा मृत्यू

****

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल ग्रामीण पेयजल धोरण बैठकीत ते बोलत होते. राज्यात एकूण २२,१८५ योजनाकरिता सौर यंत्रणा उभी करण्याचे प्रस्तावित आहे. याकरता विभागाने सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये, याची काळजी घ्यावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ सादर केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या १२ वर्षांत आर्थिक, सामाजिक, पायाभूत आणि सांस्कृतिक क्षेत्रांत व्यापक परिवर्तन झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. केंद्र शासनाच्या १२ वर्षपूर्ती निमित्त काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने विशेष सहकार्य केले असून अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमरावती मेगा टेक्स्टाइल पार्क, छत्रपती संभाजीनगर इथली डीएमआयसी आणि ऑरिक सिटी, आदी महत्त्वाचे प्रकल्प केंद्र सरकारच्या सहकार्याने साकारल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

****

प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. गुटखा, तसंच इतर प्रतिबंधित पदार्थांचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण तसंच विक्री प्रकरणांत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम- मकोका लागू करण्याबाबत, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत.

****

राज्यातील एकल मातांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश अर्जात 'एकल पाल्य' असा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यासंदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे निर्देश उच्च तथा तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशात प्राधान्य, समुपदेशन सुविधा आणि इतर आवश्यक सवलती संदर्भात अभ्यास करून ही समिती शासनाला अहवाल सादर करेल.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या १ ऑगस्ट पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC-National Common Mobility Card बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. राज्यातल्या सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत.

****

माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम २०२६ चा मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या २७ जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडियो क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत.

****

येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट युजी फेरपरीक्षेचा कालावधी १५ मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. आता ही परीक्षा दुपारी २ ते संध्याकाळी सव्वा पाच या वेळेत होईल. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्याची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागाही देण्यात आली आहे.

****

शेतीपिकांच्या टाकाऊ अवशेषातून जैविक इंधन तयार करण्याचा प्रयोग धाराशिव जिल्ह्यात केला जात आहे. प्रायोगिक स्वरुपात उत्पादित या इंधनाची तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी काल पाहणी करून, चाचणी घेतली. याबाबत आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना व्यक्त केला. ते म्हणाले…

बाईट- आमदार राणा जगजीतसिंह पाटील

****

बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं प्रशासनाने १० कलमी नियमावली जारी केली असून, संपूर्ण परिसरात २४ तास बचाव पथकं तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या होडी चालकांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. सर्व होडी चालकांकडे वैध परवाने असण्याची खात्री केली जाणार आहे.

****

नांदेड इथं काल मान्सून २०२६ पूर्व तयारीचा भाग म्हणून विष्णुपुरी इथे शोध आणि बचाव कार्याचा सराव घेण्यात आला. निवासी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थावपन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण अंबेकर यावेळी उपस्थित होते.

****

जमीन खोदून केबल चोरी करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश करत, सहा जणांना अटक केली. हे सहा जण हिंगोली आणि परभणी इथले रहिवासी आहेत. या कारवाईत दोन वाहनांसह सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

जालना जिल्ह्यात टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक विद्यार्थीनी जागेवरच ठार झाली, तर दोघी गंभीर जखमी झाल्या. राजूर मार्गावर गुंडेवारी परिसरात काल हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं दिल्लीत काल निधन झालं. ते ४९ वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, त्यांचं निधन झालं.

****

महिलांच्या टीट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला कालपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. काल पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला ८७ धावांनी पराभूत केलं. दरम्यान, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिला सामना उद्या १४ जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

****

भारताच्या पी.व्ही.सिंधूने सिडनीमध्ये सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चीनी तैपैईच्या चेन स्यू यू हिला २१-६,२१-९ असं हरवलं. आज उपांत्य फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत होणार आहे.

****

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीने उद्या १४ तारखेला ऑनलाइन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी सव्वा सहा ते सव्वा सात या कालावधीत होणार असून, या उपक्रमाद्वारे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करण्याचा मानस आहे. इच्छुक नागरिकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केलं आहे.

****

हवामान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल संध्याकाळी फुलंब्री, खुलताबादसह अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यात आडगाव खुर्द इथं शेतातली शेड कोसळून शेतकरी आणि त्याच्या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी असलेल्या एका बालकावर छत्रपती संभाजीनगर इथं उपचार सुरू आहेत.

दरम्यान, विभागात धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...