Tuesday, 9 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 09 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ९ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्ष पूर्ण झाली. २०२४ मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. गेल्या १२ वर्षांत सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे. या १२ वर्षांत पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाने "सेवा हीच साधना" या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणकारी धोरणांमुळे एनडीए सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशाने सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय लिहिला असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ‘अंत्योदयच्या तत्त्वज्ञानातून विविध शासकीय योजनांचे लाभ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले असल्याचं, त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

****

दरम्यान, गेल्या १२ वर्षांत देशातील युवा, महिला आणि शेतकरी यांना सक्षम करण्यासाठी सरकारने कोणतीही कसर सोडलेली नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १४० कोटी नागरिकांचे आशीर्वाद आणि 'राष्ट्र प्रथम' ही भावना घेऊन सरकार विश्वास, विकास आणि जनहित यासाठी समर्पित असल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. 'विकसित भारत'चा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या या मार्गावर अविरतपणे पुढे जात राहील, असं त्यांनी अधोरेखित केले.

****

महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक धरती आबा बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी उलगुलान आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं, असं नमूद करत, धर्मांतराविरुद्धचा त्यांचा संघर्ष आणि आदिवासी गौरवासाठीचं त्यांचं समर्पण आजही देशवासीयांसाठी प्रेरणेचा स्त्रोत असल्याचं शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

या दिनाच्या औचित्यानं मुंबईत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली.

नागपूर इथंही विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आलं.

****

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२५२६ साठी महाराष्ट्राच्या धान खरेदी उद्दिष्टात केंद्र शासनाने अतिरिक्त साडे एकोणतीस लाख क्विंटल वाढ मंजूर केली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या साडे एकोणसाठ लाख क्विंटल उद्दिष्टासह आता महाराष्ट्राचं एकूण धान खरेदी उद्दिष्ट ८९ लाख क्विंटलवर पोहोचलं आहे. दरम्यान, कालपर्यंत राज्यात एकूण 50 लाख क्विंटल धान खरेदी पूर्ण झाली आहे.

****

येत्या १६ जून ते आठ जुलै या कालावधीत होणार्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथं आज जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली. विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परिक्षा देता यावी यासाठी, तसंच कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी यावेळी संबंधित अधिका-यांना दिले. ही परिक्षा देणा-या पाच हजार आठशे एकोणीस विद्यार्थ्यांसाठी एकूण चोवीस परिक्षा केंद्रं सज्ज झाली आहेत.

****

येत्या १९ तारखेपर्यंत राज्यभरात अतिभारित आणि अवैध मालवाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम सुरू असून, या मोहिमेअंतर्गत अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन विशेष तपासणी पथकं दाखल झाली आहेत. या पथकांनी अंबाजोगाई कार्यक्षेत्रातल्या सहा तालुक्यांमध्ये ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये, निर्धारित वहन क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणारी तसंच मोटार वाहन कायदा आणि नियमांचं उल्लंघन करणारी वाहनं आढळून आल्यास संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातल्या मंगरूळ गावाजवळ मोटरसायकल, कार आणि एस टी च्या तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी सातच्या सुमाराला अमळनेरकडून धुळ्याकडे जाणा-या मोटरसायकल आणि एसटी या वाहनांना समोरून येणा-या कारनं धडक दिल्यानं हा अपघात झाला.

****

२८ जून रोजी पल्स पोलिओ लसकरन मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी ५ वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ लस द्यावी, असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...