Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २४ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल, अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा
सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ‘ब्रिक्स’ देशांच्या
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. या करारामुळे होर्मुझची सामुद्रधुनी
वाहतुकीसाठी खुली होऊन जागतिक ऊर्जा सुरक्षेला बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
****
भारत-अमेरिकेमधील आर्थिक भागीदारी मजबूत असून ती अधिक
दृढ होत असल्याचं व्यापार आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे
व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांची गोयल
यांनी काल नवी दिल्लीत भेट घेतेली त्यावेळी ते बोलत होते. दोन्ही देशातील व्यापारी
संबंध वाढवण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
'सुरक्षित पासपोर्ट, सुगम सेवा, सशक्त नागरिक' या ध्येयाने
प्रेरित होऊन पासपोर्ट सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि
सुलभ करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं
आहे. १४ व्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त त्यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात
भारत आणि परदेशातील सर्व पासपोर्ट प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या ‘पासपोर्ट
सेवाची अंमलबजावणी, चिप-युक्त ई-पासपोर्टची सुरुवात, नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे आणि टपाल कार्यालय पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करणे
तसंच विक्रमी संख्येने पासपोर्ट जारी करणे यांमुळे प्रवासातील सुलभता वाढत आहे, तसंच जागतिक संधींची उपलब्धता विस्तारत असल्यानं नागरिक सशक्त होत असल्याचं त्यांनी
नमूद केलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार
प्रदान करण्यात आले. यात राज्यातील सात जणांना गौरवण्यात आलं. यामध्ये क्रिकेटमधील
योगदानासाठी दिग्गज फलंदाज रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील
योगदानासाठी अर्मिंडा फर्नांडिस, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर अशोक खाडे, कलाक्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका अल्का याज्ञिक, माधव रंगनाथन आणि भिकल्या लाडक्या धिंडा यांना तर प्रसिद्ध दिवंगत सिने कलाकार
सतीश शहा यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यंदा पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
****
देशातील विविध केंद्रीय आणि
नामांकित विद्यापीठांच्या यंदाच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘सामान्य विद्यापीठ
प्रवेश परीक्षा’ म्हणजेच ‘सीयूईटी’ चा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था-‘एनटीए’ने काल
अधिकृतपणे जाहीर केला. परीक्षार्थ्यांना ‘सीयूईटी’च्या अधिकृत संकेतस्थळावर गुणपत्रिका
बघता येतील. या परीक्षेला १५ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली होती; त्यापैकी ११ लाखांहून अधिक उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. गेल्या ११ ते ३१ मे दरम्यान १९ दिवसांच्या कालावधीत, १३ आंतरराष्ट्रीय परीक्षा केंद्रांसह देशातील ३२१ शहरांमध्ये, ३५ सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
****
कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी
क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या
कार्याचा गौरव करण्यासाठी २०२३ आणि २०२४ या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर
करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. येत्या एक जुलैला
मुंबईत एका सोहळ्यात जवळपास १८९ जणांना पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.
****
जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ विश्व
अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी काल दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.
शिव नरवाल याला पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल कनिष्ठ प्रकारात रौप्य पदक मिळालं तर
याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्यपदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या १० मीटर
एअर पिस्टल कनिष्ठ सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदकसंख्या
१५ वर पोहोचली असून, यात पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या
वतीनं काल महाकवी कालिदास कलामंदिरात विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. बालरंगभूमी
परिषद मुंबईच्या अध्यक्ष नीलम शिर्के-सामंत, वसंत कानेटकर यांच्या स्नूषा अंजली कानेटकर यांच्या हस्ते
कानेटकर रंगकर्मी पुरस्कारानं महेश मांजरेकर यांना सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी
अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक अभिराम
भडकमकर यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कारानं गौरविण्यात आलं. तर, अभिनेता, दिग्दर्शक सुनील देशपांडे यांना बाबूराव
सावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
राज्यात आज सकाळपासून अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात जोरदार पावसानं सकाळी हजेरी लावली, तर सांगलीसह जिल्ह्यात हलक्या सरी
कोसळल्या, मात्र अद्याप पेरणी युक्त
पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वाशिम जिल्ह्यात
काल गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे मंगरुळपीर तालुक्यातल्या वनोजा इथल्या शेतकऱ्यांच्या
पपई पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी शेतातील पिकं जमीनदोस्त झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
No comments:
Post a Comment