Tuesday, 16 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

नीट परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड सुविधा सुरू झाल्याच्या २४ तासांच्या आत, आगामी NEET UG पुनर्परीक्षा २०२६ साठी १० लाखांहून अधिक उमेदवारांनी आपली प्रवेशपत्रे डाउनलोड केली आहेत, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने म्हटले आहे. सर्व उमेदवारांना सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी त्यांचे पथक सर्व्हरवरील भारावर सतत लक्ष ठेवून आहे. सर्व उमेदवारांना परीक्षेपूर्वी वेळेवर त्यांची प्रवेशपत्रे मिळतील, याबाबत NTA ने विद्यार्थ्यांना आश्वस्त केले आहे.

****

बावन्नाव्या जी-सेव्हन परिषदेला काल फ्रान्समध्ये एव्हीयन शहरात सुरुवात झाली. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हीयनमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी, जी सेव्हन सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाइट क्रॉस, फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.

****

महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कायद्यांमध्ये बदल झाले असले, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि महिलांपर्यंत कायद्यांची माहिती पोहोचविणे ही आजची मोठी गरज आहे. तसेच महिलांच्या कायदे निर्मितीतील आणि समाज परिवर्तनातील योगदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, यांच्या वतीने आयोजित शं. ना. जोशी पुरस्कार ‘कायदा निर्मितीमध्ये महिलांचे योगदान’ या पुस्तकाच्या लेखिका विद्या देवधर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

****

साईभक्तांसाठी 'पुणे - साईनगर शिर्डी दैनंदिन एक्सप्रेस' उद्यापासून सुरू करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री मंत्री अश्विनी वैष्णव हे उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. ही पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट रेल्वे सेवा असेल, ज्यामुळे भक्त आणि पर्यटकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होणार आहे.

****

अखिल भारतीय टेनिस संघटनेने जपानमध्ये होणाऱ्या २०व्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा केली आहे. पुरुष गटातील भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागल आणि महिला गटातील अव्वल टेनिसपटू सहजा यमलपल्ली भारतीय संघाचे नेतृत्व करतील. भारतीय पुरुष संघात एकेरी गटासाठी सुमित नागल, मानस धामणे आणि दक्षिणेश्वर सुरेश यांची निवड झाली आहे. दुहेरीतील विशेषज्ञ युकी भांब्री, एन. श्रीराम बालाजी आणि अनिरुद्ध चंद्रशेखर यांची संघात निवड झाली आहे.

महिलांच्या गटात, भारताची अव्वल टेनिसपटू सहजा यमलापल्ली, तसेच वैष्णवी अडणकर आणि वैदेही चौधरी यांची एकेरीसाठी निवड झाली आहे. दुहेरीच्या संघात ऋतुजा भोसले, प्रार्थना थोंबरे आणि अंकिता रैना यांचा समावेश आहे. २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत जपानमधील आयची आणि नागोया येथे आयोजित केल्या जातील.

****

खरीप हंगामातल्या पेरण्या पावसाअभावी लांबल्यामुळे अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांवर मोठ्या प्रमाणात कामगार उपलब्ध होत असल्याचं चित्र आहे. सध्या रोजगार हमीच्या १ हजार ७२३ कामांवर ११ हजार ७७४ मजूर कार्यरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अयोध्येतील श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या कथित गैरव्यवहाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. लखनऊचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत हे या पथकाचे अध्यक्ष आहेत. पथकानं तपासाला सुरुवात केली असून काल अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. येत्या सात दिवसात प्रारंभिक अहवाल आणि पंधरा दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकाला देण्यात आले आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...