Sunday, 21 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन ठिकठिकाणी योगाभ्यासानं उत्साहात साजरा

·      पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीन जहाजं नौदलाच्या सेवेत

·      विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून

आणि

·      भारतीय महिला हॉकी संघाला नेशन्स चषक स्पर्धेचं विजेतेपद

****

आज १२ वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ सर्वत्र योग अभ्यासाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशभरात यानिमित्त मंत्री,लोकप्रतिनिधी, सरकारी कार्यालयं, सामाजिक-खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, आस्थापनांनी सामुहिक योगसन सादरीकरणातून योगाचं महत्व अधोरेखीत केलं. भारत तिबेट सीमा पोलिसांच्या ४७ व्या तुकडीतल्या हिमवीर जवानांनी १४ हजार फुट ऊंचीवर लेह-लडाखच्या पैंगोंग त्सो किनाऱ्यावर योगासनं सादर केली. तर, भारतीय नौदलाच्या पानबुडीतील योध्दांनी योगाभ्यास करत शिस्त, आत्मबल आणि भारतीय संस्कृतिचा अद्भुत संदेश दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशात जबलपूर इथं योग दिनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी यावेळी योगाभ्यासाचं महत्त्व नमुद केलं. त्या म्हणाल्या -

बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कोलकाता इथल्या ऐतिहासिक रेड स्ट्रीट इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगाभ्यास करण्यात आला. त्यांनी यावेळी योगशिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही, तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे, असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं पंतप्रधान म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास सत्रात सहभाग घेतला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला.

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा प्रशासनातर्फे सामुहिक योगासनांचा सराव बिबी का मकबरा आणि विभागीय क्रीडा संकूल इथं आयोजित मुख्य कार्यक्रमांमधून करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन, छत्रपती संभाजीनगर व भारतीय योग संस्थान (दिल्ली), विभाग-छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे एन आठ इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतल्या कार्यक्रमामध्ये उत्साहात योगासनं करुन योगदिन साजरा झाला, वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात योगाभ्यास करण्यात आला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच इतर राजकीय पक्ष, मराठवाडा युवक विकास मंडळ यांनी योगदिनाचे कार्यक्रम घेतले. धाराशिव इथं पतंजली योग समिती, मेरा युवा भारत कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानं श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात योगाभ्यास करण्यात आला. परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलनात आज जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकं सादर करून उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त आज लातूर इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला.

जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज आंतरराष्ट्रीय योग दिनासह वृक्षारोपण करण्यात आलं. बीड इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, भाजपच्या वतीनं मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगाभ्यास करण्यात आला. नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मालाडच्या दानापाणी सागर किनाऱ्यावर योग अभ्यासात सहभागी झाले. वरळीत सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील योग सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा प्रमुख उपस्थित होते. यवतमाळमध्ये शंकर डहाके या योगपटूनं विहिरीतील योगासनं सादर केली.

****

भारतानं जहाज बांधणी क्षेत्रात नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरु केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं तीन जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय अशी या जहाजांची नावं असून त्यांची रचना नौदलाच्या युद्धनौका रचना संस्थेनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून होणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रम्होस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यसाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सज्ज अशी युद्धनौका आहे. २०१४ मध्ये असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ही तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

****

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते, तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे.

****

नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा आज घेण्यात आली. देशातल्या ५५१ आणि परदेशातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा झाली. २२ लाख ७९ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पन्नास केंद्रांवर सतरा हजार चारशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

****

कोकणातील गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत पाच जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी ४ जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेपत्ता एकाचा शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण मधील बिडकीन गावातल्या १९ युवकांचा एक गट शनिवारी गणपतीपुळे इथं पर्यटनासाठी गेला असताना ही दूर्घटना घडली.

****

भारतीय महिला हॉकी संघानं आज ऑकलंड इथं झालेल्या अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाचा २-० असा पराभव करून एफआयएच वुमन्स नेशन्स चषक स्पर्धेचं दुसरं विजेतेपद पटकवलं. याविजेतेपदामुळं भारतीय संघाला एफआयएच वुमन्स प्रो लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नवनीत कौर आणि सुनेलीता टोप्पो यांनी भारतातर्फे गोल नोंदवले. लालरेमसिआमी हिला अंतिम सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. दीपिका स्पर्धेत सहा गोल नोंदवून अमेरिकेच्या ॲशले सेसासह सर्वाधिक गोल नोंदवणारी खेळाडू ठरली. हे भारताचं दुसरं नेशन्स चषक विजेतेपद असून, यापूर्वी २०२२ मध्ये स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद भारतानं मिळवलं होतं.

****

श्रीलंकेत दंबोला इथं तिरंगी एकदिवीसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय अ संघानं आज श्रीलंका अ संघावर ६६ धावांनी विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीच्या २९ चेंडुंमध्ये ९४ धावा तसंच कर्णधार तिलक वर्माच्या ६७ धावांमुळं भारतीय अ संघानं ५० षटकांत नऊ वाद ३७७ धावा केल्या. या सामन्यात आणखी एका झंजावती खेळीचं प्रात्यक्षिक देताना वैभवनं अकरा चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं, त्यानं या डावात एकूण आठ षटकार आणि दहा चौकार लगावले.

****

भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लडमध्ये सुरू आयसीसी टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार आहे. ओल्डट्रॅफर्ड, मॅंचेस्टर इथं संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौरचा हा विक्रमी २००वा टी-ट्वेंटी सामना आहे. भारतीय संघानं स्पर्धेतले प्रारंभीचे दोन्ही सामने जिंकले आहेत.

****

गडचिरोली नगर परिषदेच्या एक आणि नगर पंचायतीच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. अकोला जिल्ह्यातल्या पातूर इथं नगराध्यक्षपदी काँग्रेसचे हिदायत खान निवडून आले.

****

छत्रपती संभाजीनगर इथले नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांचं आज पहाटे साडेपाच वाजता हृदयविकारानं निधन झालं. त्यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या कार्यकाळात कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली होती.

****

छत्रपती संभाजीनगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मार्च - एप्रिल मध्ये पहिल्या टप्प्यातील घेतलेल्या १२५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षा १५ जून रोजी संपल्या. यासह एकूण ९ परीक्षांचे निकाल १० जुलैच्या आत जाहीर होतील, असं परीक्षा विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...