Sunday, 14 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन

·      मराठवाडा, अहिल्‍यानगर विभागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या गरजांना प्राधान्‍य देवून जलसाठ्याचे काटेकारपणे नियोजन करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

·      पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी दरम्यान शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

·      लातूर-औसा मार्गावरील बुधोडा गावाजवळ भीषण अपघातात ३ जण ठार, १७ जखमी

आणि

·      आयसीसी महिला क्रिकेट टी-ट्वेंटी विश्वचषकात भारताचा थोड्याच वेळात पाकिस्तानशी सामना

****

भारतीय प्रतिभा आणि युरोपमधील गुंतवणूकदार यामधील ‘भारत इनोव्हेट्स हा महत्त्वाचा सेतू म्हणून पुढे येत आहे. यामुळे नव्या कल्पना करणाऱ्या तरुणांना जगातील तज्ज्ञांच्या संपर्कात येणं सोपं झालं आहे. भारतातील तरुण आता कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, नवीन उत्पादन तंत्र आणि संरक्षण क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधत आहेत. संपूर्ण जग आज भारताच्या नवकल्पनांकडे पाहत आहे. भारत आज संपूर्ण जगाच्या विविध गरजांची उत्तरे शोधणारा, पर्याय देणारा देश बनत आहे. आता प्रश्न असा नाही की भारत नाविन्यपूर्ण काम करतो का, तर प्रश्न असा आहे की भारतासोबत कोण नाविन्यपूर्ण निर्मिती करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते फ्रान्सच्या नाईस इथं भारत इनोव्हेट्स २०२६ या तीन दिवसीय उपक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘भारत इनोव्हेट्स’ मधून १२० स्टार्टअप्स, १५ उच्च शिक्षण संस्था आणि ५० गुंतवणूकदारांना एका व्यासपीठावर आणलं गेलं आहे. अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, सेमीकंडक्टर, स्पेस टेक, बायोटेक, एनर्जी, हेल्थकेअर अशा १३ क्षेत्रांमध्ये नवकल्पनांना चालना देण्याचा उद्देश आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यानंतर मोदी आणि मॅक्रॉन यांच्यातली द्विपक्षीय बैठक नाइस मध्येच झाली.

****

राज्‍यातील अपुऱ्या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसंच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍टपर्यंत नागरीकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुनिश्चित करण्‍यास सर्वोच्‍च प्राधान्‍य देण्‍याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीर पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी विभागाच्‍या आधिकाऱ्यांना दिल्‍या. पुण्यात कृष्‍णा व गोदावरी लाभक्षेत्राच्‍या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा, अगामी मान्‍सूनची परिस्थिती या संदर्भात महत्‍वपूर्ण बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. मराठवाडा, अहिल्‍यानगर आणि नाशिक विभागातील जलसाठ्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. मराठवाडा विभागात २८ टक्‍के तर नाशिक विभागात सध्‍या २६ टक्‍के उपयुक्‍त जलसाठा उपलब्‍ध असून, दोन्‍हीही विभागातील प्रकल्‍पांमध्‍ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही. विशेषत: मराठवाडा आणि अहिल्‍यानगर विभागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या गरजांना प्राधान्‍य देवून उपलब्‍ध जलसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्‍याबातही गांभिर्याने कार्यवाही करण्‍यास आधिकाऱ्यांना सांगण्‍यात आले आहे.

****

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज पुण्यात झाली. या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता जिथं साहित्य संमेलनं झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह, महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत. हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

****

लातूर-औसा मार्गावरील बुधोडा गावाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. औसाहून लातूरकडे येत असलेल्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात मृत झालेल्यांमध्ये रेश्मा पाटील व सरोजा पतगे यांचा समावेश असून तिसऱ्या मृत व्यक्तीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. जखमींना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींवर औसा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी व मृत व्यक्ती धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं, असं केंद्रीय मंत्री आणि रिपाइं प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले.

****

भंडारा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम असताना, भंडारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर येथे उन्हाळी सुट्टीनंतर उद्यापासून जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी शाळांनी विशेष तयारी केली आहे. शाळांची स्वच्छता, रंगरंगोटी, वर्गखोल्यांची सजावट तसेच परिसर स्वच्छ करून शाळांना चकाचक केले आहेत. गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. आज रविवारची सुट्टी असल्याने बाजारात वह्या, दप्तर, पाणी बॉटलपासून टिफिन बॉक्स खरेदीसाठी पालकांकडून लगबग सुरू आहे.

****

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परिक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र नागरी सेवा गट अ राजपत्रिक परीक्षा आज सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी २० हजार ६५१ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ३० उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३ हजार ६२१ उमेदवार अनुपस्थित राहिले. एमपीएससीची सदरील परीक्षा शहरातील एकूण ६४ केंद्रावर घेण्यात आली.

****

धुळे जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत साक्री पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवत, चार जणांच्या टोळीचा शोध घेतला. या टोळीच्या ताब्यातून तब्बल १८ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून यातून मोटारसायकल चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर मधील महानगरपालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत आज आयुक्त अमोल येडगे यांनी १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी ही लस प्रभावी ठरत असल्यानं, पात्र वयोगटातील सर्व विद्यार्थिनींचं लसीकरण करून घेण्याबाबत त्यांनी मुख्याध्यापकांना निर्देश दिले. पुढील पंधरा दिवसांत प्रत्येक शाळेतील, पात्र विद्यार्थिनींचं नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रामार्फत एचपीव्ही लसीकरण पूर्ण होईल, यासाठी आवश्यक समन्वय, जनजागृती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन, विद्यार्थिनींच्या पालकांना या लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

वाशीम जिल्ह्यातील इंझोर्व इथं आज आतेभाऊ आणि मामेभावाचा नदीत बुडून मृत्यू झाला. दोघं गोमुखेश्वर संस्थानजवळील अडाण नदीच्या पात्रात पोहायला गेले असताना पात्रात असलेल्या एका मोठ्या आणि खोलगट खड्ड्याचा अंदाज न आल्यान ही दुर्घटना घडली.

****

महिला क्रिकेटमधील लागोपाठ दुसऱ्या विश्वचषकाला गवसणी घालण्याच्या उद्दिष्टाने मैदानावर उतरत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आज आपला पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात खेळणार आहे. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकात इग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.

****

फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर फुटबॉलप्रेमींमध्ये आता चढू लागला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या सामन्यांमध्ये सर्वच मोठ्या संघांनी जोरदार सुरुवात केली आहे. क गटात न्यू जर्सीमध्ये ब्राझील आणि मोरोक्को यांच्यात रंगतदार सामना झाला. २१ व्या मिनिटाला मोरोक्कोच्या इस्माईल सबैरीने गोल करत ब्राझीलला धक्का दिला. पण ३२ व्या मिनिटाला विनिसियस ज्युनियरने गोल करत ब्राझीलची बरोबरी साधली. हा सामना १-१ असा संपला. याच गटात स्कॉटलंडने २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला विश्वचषक विजय नोंदवला. हैतीविरुद्धच्या सामन्यात जॉन मॅकगिनच्या एकमेव गोलमुळे स्कॉटलंडने १-० ने विजय मिळवत गटात अव्वल स्थान पटकावलं. ब गटात कॅलिफोर्नियामध्ये कतार आणि स्वित्झर्लंड यांच्यातही चुरशीची लढत झाली. स्वित्झर्लंडने सुरुवातीला आघाडी घेतली, पण कतारने हार न मानता बरोबरीचा गोल केला आणि सामना १-१ असा बरोबरीत संपवला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 15 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...