Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला
·
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा
महिन्यांची अंतिम मुदतवाढ
·
प्रत्येक महिला बचत गटाला एक हेक्टर जमीन पाच वर्षांसाठी लीजवर देण्याचा सरकारचा
निर्णय
·
विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची
आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमूबेन बांभनिया यांचं प्रतिपादन; छत्रपती संभाजीनगर इथं विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी
आणि
·
मराठवाड्यात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची
शक्यता
****
राज्यात
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ २७ पूर्णांक चार शंताश मिलीमीटर पावसाची नोंद
झाली असून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु
नये असा सल्ला सरकारने दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी १०३ पूर्णांक आठ शंताश
मिलीमीटर पावसाची नोंद होत असते, त्या तुलनेत राज्यात कमी
पाऊस पडल्याचं काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य
महाराष्ट्रात पाऊस सुरु होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या १८
जूनपासून पावसाला सुरुवात होईल, शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती
पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात
यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण
विभागात जून महिन्यासाठी सरासरी ७१ पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात केवळ ४० पूर्णांक सात मिलीमीटर म्हणजे
५६ पूर्णांक नऊ टक्के इतका पाऊस झाला आहे.
धाराशिव
जिल्ह्यात जून महिन्यातला सर्वाधिक ११२ टक्के पाऊस झाला. तर छत्रपती संभाजीनगर आणि
जालना जिल्ह्यात सर्वात कमी केवळ १९ टक्के पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनी ७५ ते
१०० मिलीमीटे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचा सल्ला कृषी
विभागाने दिला आहे.
****
राज्याच्या
ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरुपी
उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण २०२६ जाहीर करण्यात आलं
आहे. काल मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली.
विविध योजनांचं एकत्रिकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे.
स्थानिक
स्वराज्य संस्थामध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता
प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णयही
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यात येणार
आहे.
ड्रोन आणि
तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणला, तसंच विकसित भारत-जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत
बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी
दिली.
****
राज्यातल्या
प्रत्येक महिला बचत गटाला एक हेक्टर म्हणजेच अडीच एकर शासकीय जमीन पाच वर्षांच्या
लीजवर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
काल नागपूर इथं ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा आणि बांबू लागवड
करण्यासाठी तसंच चराय जमिन विकासासाठी एक लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार असल्याचं
बावनकुळे यांनी सांगितलं.
****
संमतीनं किंवा
न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर
केवळ २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची
प्रक्रीया जलद करुन घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरीक्त शुल्क भरुन ही सुविधा
उपलब्ध असेल. त्यानुसार नियमित मोजणी ३ महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल.
****
महाराष्ट्र
पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं ७३३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी
मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही
माहिती दिली. या रकमेपैकी साठ टक्के निधी केंद्र सरकार तर चाळीस टक्के निधी राज्य
सरकार देणार आहे. या निधीमुळे महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
विकसित भारत
२०४७ चं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता
असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमूबेन बांभनिया यांनी म्हटलं आहे. केंद्र
सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित 'प्रगतिपथ दौऱ्या' अंतर्गत त्या काल
छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा-बिडकीन इथल्या
ऑरिक सिटी मधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली, तसंच
विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी
दिल्ली–मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर – डीएमआयसी अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन
इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या
औद्योगिक विकासाला गती देण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
मराठवाड्यासह
राज्यातल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथल्या बाळासाहेब ठाकरे हळद
संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. या तीन
वर्षाच्या दीर्घकालीन करारामुळे दोन्ही संस्थांमधील वैज्ञानिक कौशल्य, प्रयोगशाळा आणि संशोधन साधनांची देवाणघेवाण होणार आहे.
****
जागतिक योग
दिनाच्या अनुषंगाने सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्ताने दररोज एका
आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग शिक्षिका स्वाती देशमुख यांनी दिलेली उत्तान मंडुकासनाची
माहिती आज आपण जाणून घेऊ.
बाईट – योग शिक्षिका स्वाती देशमुख
****
नीट पेपरफुटी
प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या
मागणीसाठी नागपूर शहरातल्या संविधान चौक इथं काल कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीन
आंदोलन करण्यात आलं. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत कॉक्रोच जनता पार्टीचे
संस्थापक अभिजीत दिपके यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा
पुनरुच्चार केला. येत्या २० जून ला पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
मराठवाड्यात
काल काही संघटनांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलनं करण्यात आली.
शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, शेतकऱ्यांची
संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करण्यात यावा, यासह
इतर मागण्यांसाठी काल मराठवाड्यातल्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा
काढण्यात आला.
**
नागपूर ते गोवा
हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कांडली फाटा इथं शक्तिपीठ विरोधी कृती
समितीनं रास्ता रोको आंदोलन केलं. सुमारे दीड तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी
आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं.
**
अनुसूचित
जातीतील आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं, या मुख्य मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल बीड
शहरात मातंग क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला.
तर बीड विभागीय
कार्यालय आणि सर्व आगाराच्या ठिकाणी एस.टी. कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक
प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र एस.टी.कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने महाआरती
आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं.
**
शेतकऱ्यांना
विनाअट सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत
तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत लातूर इथं क्रांतिकारी
शेतकरी संघटनेच्या वतीने काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती
आदेशाची होळी करण्यात आली.
****
हिंगोली
जिल्ह्यात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल इथं टँकरनं
दिलेल्या धडकेमुळे एक महिला आणि एक बैल
जागीच मृत्युमुखी पडले असून, दुसरा एक
बैल जखमी झाला आहे. काल सकाळी हा अपघात झाला. अकोल्याहून नांदेडकडे पेट्रोल वाहून
नेणा-या भरधाव टँकरनं बैलांना घेऊन जाणा-या महिलेला निष्काळजीपणे धडक दिल्यामुळे
हा अपघात झाला.
****
लातूर
जिल्ह्यातल्या रेणापूर पंचायत समितीमधला तांत्रिक सहाय्यक गौस पाशा चांद शेख याला
लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं दहा हजार रुपयांची लाच घेताना
रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराच्या सिंचन विहिरीच्या कामाचं पूर्णत्व प्रमाणपत्र
देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
एफ आय एच हॉकी
चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघाने सहा गुण मिळवून उपान्त्य फेरी गाठली आहे.
न्यूझीलंडमधे ऑकलंड इथं झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा दोन – एक
असा पराभव केला.
****
पुढील पाच
दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड
आणि नांदेड जिल्ह्यात आज पाऊस होऊ शकतो, तर १८ आणि १९ जून
रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक
ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. १९ ते २५ जून दरम्यान मराठवाड्यात
सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने
वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment