Wednesday, 3 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०२ सकाळी.०० वाजता

****

जागतिक सायकल दिवस आज साजरा होत आहे. सायकल हे केवळ वाहतुकीचं साधन नसून निरोगी जीवनशैली, स्वच्छ शहरे आणि शाश्वत भविष्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. भारतामध्ये ‘फिट इंडिया’च्या ‘संडेज ऑन सायकल’ मोहिमेसह ‘सायकल्स फॉर चेंज’ उपक्रम नागरिकांना सक्रिय जीवनशैली आणि शाश्वत प्रवासाचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहेत. यावर्षीची या दिनाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकल’’ अशी आहे.

यानिमित्त आज परभणी इथं केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. पर्यावरणासोबतच आरोग्यासाठी सायकल चालवणं फायद्याचं आहे, अशी जनजागृती यावेळी करण्यात आली.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था – डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलाने रुद्रम-II या हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेल्या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी पूर्ण केली आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत घेण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींची कार्यक्षमता आणि अचूकता सिद्ध झाली. रुद्रम-II हे क्षेपणास्त्र हैदराबाद इथल्या इमारत संशोधन केंद्राने विविध संस्थांच्या सहकार्याने संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय हवाई दल, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, उद्योग क्षेत्र आणि विकास भागीदारांचं अभिनंदन केलं आहे.

****

विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही, असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला.

****

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, या हल्लाप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं.

****

सक्तवसुली संचालनालयानं काल अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सूरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण २० ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार, या व्यवहारांचे मध्यस्थ, मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे.

****

महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं अडीच किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत ४ कोटीपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या दोन तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाने राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने साडे-चार हजार बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन हजार बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

****

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात काल विशेष मुख आरोग्य तपासणी आणि तंबाखूमुक्ती जनजागृती अभियान राबवण्यात आलं. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची मुख आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच तंबाखू, गुटखा, मावा आणि धूम्रपानामुळे होणाऱ्या गंभीर आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथला विद्यार्थी आदित्य सचिन दीक्षित याची भारतीय वायू दलात निवड झाली आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. आदित्य सध्या पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर तो वायू दलात रुजू होईल.

****

उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं झालेल्या राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत आईस स्टॉक  क्रीडा प्रकारात छत्रपती संभाजीनगर इथला विद्यार्थी प्रताप साळुंके याने सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावलं. आठव्या इयत्तेत शिकत असलेल्या प्रताप याने १९ वर्षांखालील या स्पर्धेत गोवा संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेसाठी प्रताप याला क्रीडा शिक्षक प्रणव तारे यांचं मार्गदर्शन मिळालं. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...