Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २७ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
तीन दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यावर रवाना झाले. भारत आणि सेशेल्स दरम्यानच्या राजनैतिक
संबंधांना यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा
आहे. या दौऱ्यात ते सेशेल्सचे राष्ट्रपती डॉक्टर पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी द्विपक्षीय
संबंध अधिक मजबूत करण्याबाबत आणि हिंद महासागर क्षेत्रातील शांतता, प्रगती व सुरक्षिततेवर चर्चा करतील तसंच अनिवासी भारतीय समुदायाशीही पंतप्रधान
मोदी संवाद साधणार आहे.
****
जम्मू आणि काश्मीरमधील वार्षिक
श्री अमरनाथ यात्रेची तयारी अधिक वेगाने सुरु आहे. येत्या तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून सखोल गस्त आणि शोधमोहिमा राबवल्या जात
आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि सीमा सुरक्षा दल यांच्या समन्वयाने अर्निया
सीमा भाग, रथाना, सालेहार, चक जगटू आणि इतर परिसरांमध्ये पोलिस दलाकडून देखरेख वाढवण्यात आली आहे. तसंच, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरही सतर्कता वाढवण्यात आल्याचं आमच्या जम्मू
इथल्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
'खेत बचाओ अभियाना'च्या अंमलबजावणीचा आढावा काल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ
ठाकूर यांनी पुणे इथं आयोजित बैठकीतून घेतला. राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांसह
कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचविण्याचे
मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन यावेळी झालं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा
या मालिकेचा १३५वा भाग आहे. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या यूट्यूब वाहिन्या, तसंच ‘न्यूज ऑन एआरआर अॅप’
वरून हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
नद्यांमधील मायक्रोप्लास्टिक
गोळा करुन त्याचं वर्गीकरण करणाऱ्या उपकरणाच्या तांत्रिक आराखड्याल निर्मिती मुंबई
विद्यापीठ-रत्नागिरी उपपरिसराच्या पर्यावरणशास्त्र विभागानं तयार केली आहे. या नाविन्यपूर्ण
उपकरणाच्या डिझाईनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृतपणे 'डिझाईन पेटंट' मंजूर झालं आहे. नद्यांच्या
पातळीवरच मायक्रोप्लास्टिक वेगळं करू शकणारं तंत्रज्ञान डिझाईन करणं ही शाश्वत पर्यावरण
रक्षणासाठी काळाची गरज आहे. यामुळे नदी प्रदूषण नियंत्रणासाठीच्या संशोधनाला नवी दिशा
मिळेल असं या प्रकल्पाचे संशोधक डॉक्टर पांडुरंग पाटील यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत
मंजूर कामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना लातूरचे
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत. काल जिल्हा नियोजन समितीच्या
बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी ६१२ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक
आराखड्यास मान्यता देण्यात आली.
****
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर
जयसिंगराव पवार यांना चाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान
करण्यात आला. शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात
डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.
****
संत मुक्ताबाई पालखीचं जळगाव
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याच्या कोथळी इथून
पंढरपूरकडे काल भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रस्थान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे ३१८ वं वर्ष आहे. तब्बल सातशे किलोमीटरचं
सर्वात जास्त असं अंतर पार करणारी ही एकमेव दिंडी आहे.
****
परभणी-जालना रेल्वे मार्गावर
देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे आजपासून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळेत तात्पुरता
बदल करण्यात आला आहे. हा बदल दर आठवड्याला रविवार, सोमवार आणि
शुक्रवार वगळून अन्य चार दिवशी असणार आहे. यानुसार धर्माबाद–मनमाड ही रेल्वेगाडी उद्यापासून
३० सप्टेंबर दरम्यान, मनमाड ते नांदेडपर्यंतच धावणार
असून धर्माबादला जाणार नाही. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई ते नांदेड तपोवन रेल्वे, नगरसोल ते जालन्यादरम्यान १२०
मिनिटे उशिराने धावणार आहे. याचप्रमाणे नरसोल-जालना- नरसापूर या मार्गावरील दोन रेल्वे
जालन्यापर्यंत पन्नास मिनिटे उशिराने धावतील अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
विभाग प्रशासनाने दिली आहे.
****
येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात
पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात येत्या तीस जूनपर्यंत
पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला
आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे
आयोजित पुरुष प्रो लीग हॉकी स्पर्धेत, काल रात्री भारताने पाकिस्तानचा
७-१ असा दारुण पराभव केला. लंडन इथल्या ‘ली व्हॅली हॉकी सेंटर’मध्ये खेळल्या गेलेल्या
सामन्याच्या पहिल्या सत्रात, अबू बकर याने पेनल्टी कॉर्नरचे
गोलमध्ये रूपांतर करून पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या सत्रात सुखजीत
सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी केलेल्या गोलमुळे सामन्याचे चित्र पालटले.
****
No comments:
Post a Comment