Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ५ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने रेपो
दर पाच पूर्णांक २५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी
आज द्वैमासिक पतधोरण जाहिर केलं. जागतिक पातळीवर भूराजनैतिक संघर्षामुळं निर्माण झालेली
अस्थिरता, सप्लाय चेनमध्ये निर्माण झालेले अडथळे आणि दबाव याशिवाय ऊर्जा साधनांचे वाढलेले
दर याचा परिणाम विकासाच्या वेगावर झाला असून, महागाईच्या अंदाजात वाढ झाल्याचं पाहायला
मिळत असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. पुरवठा तुटवड्याचा परिणाम चौथ्या तिमाहीत
आणि त्यानंतर देखील कायम राहील, असं ते म्हणाले.
****
जागतिक पर्यावरण दिन आज साजरा
केला जात आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड
तसंच वाढतं जागतिक तापमान यांसारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा
मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची मध्यवर्ती
संकल्पना "हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा" अशी
निश्चित केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा
संदेश या संकल्पनेतून देण्यात आला आहे.
पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर विशेष ध्वनिचित्रफीत प्रसारित करून पर्यावरण संरक्षण,
शाश्वत विकास आणि हरित भविष्याचा संदेश दिला आहे.
हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्धच्या
लढ्यात निसर्ग हा आपला सर्वात मोठा सहकारी असल्याचं, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान
बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. आपण लावलेलं प्रत्येक झाड, जतन केलेली
प्रत्येक परिसंस्था आणि स्वीकारलेली प्रत्येक शाश्वत जीवनशैलीची सवय आपल्या सामूहिक
भविष्याला अधिक बळकट करते. चला, एकत्र येऊन हरित, स्वच्छ आणि अधिक सक्षम भारत घडवण्यासाठी
योगदान देऊया, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरणाचा वारसा
मिळेल, असं मंत्री यादव यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते आज सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने
जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे.
या कार्यक्रमात वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेच्या सहाव्या आणि सातव्या पॅकेजचं राष्ट्रार्पण
करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक,
लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. सुरतमध्ये सुमारे
१८ हजार ८०० कोटी रुपयांच्या तर दमणमध्ये सुमारे दोन हजार ९७० कोटी रुपयांच्या विकास
प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
२९ वे राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स
पुरस्कार काल जाहीर झाले. यात दहा सुवर्ण, सहा रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या
एका विशेष पुरस्काराचा समावेश असल्याचं, केंद्रीय कार्मिक विभागाने प्रसिद्ध केलेल्या
पत्रकात म्हंटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये राज्यातली नंदुरबार जिल्हा
परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्त्वपूर्ण
डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी
आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्य सेवा उपलब्ध
करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई-आरोग्य धमनी; या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात
येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना
एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण
उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या
उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही सन्मानित करण्यात
येणार आहे.
****
ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू
विचारांचे गाढे अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांना चाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर
जाहीर झाला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १५२व्या जयंती दिनी २६ जूनला हा
पुरस्कार प्रदान केला जाईल अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी
दिली.
****
लोकसभेचे माजी महासचिव आणि
घटनातज्ञ सुभाष सी. कश्यप यांचं नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९७ वर्षांचे
होते. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष
ओम बिर्ला यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
****
राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ
कॉँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं, ते ९३ वर्षांचे
होते. भोर मतदारसंघामधून ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९७२ मध्ये ते
प्रथम आमदार झाले. विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम
केलं.
****
No comments:
Post a Comment