Friday, 5 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      मार्च महिन्यातल्या अवकाळी पावसासाठी १६ कोटी ७१ लाख रुपये निधी मंजूर

·      छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी मदतीचे १२ कोटी २७ लाख रुपये वर्ग

·      देशात चलनी नोटांसाठी प्लॅस्टिकच्या वापराचा प्रस्ताव रिझर्व बँकेच्या विचाराधीन

·      राज्यातल्या सर्व एसटी बस स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

आणि

·      जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

****

मार्च महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १६ कोटी ७१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यासाठी १२ कोटी २७ लाख ६० हजार रुपये तर नागपूर विभागात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे चार कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट लाभहस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे.

****

विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागं घेतला. यावर पानसरे यांनी आपण माघार घेतली नसल्याचं सांगत आक्षेप अर्ज दाखल केला. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी केल्यानंतर पानसरे यांची आक्षेप अर्ज मागे घेतला.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागं घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतलेले आणि मूळचे कर्नाटक राज्यातल्या करूरचे रहिवासी असलेले, माजी सनदी अधिकारी अन्नामलाई, २०२० मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते, त्यानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाला होता.

****

जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

बँकेचा रेपो दर सव्वा ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे.

दरम्यान, देशात चलनी नोटांकरता प्लॅस्टिकचा वापर करण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करुन दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.

अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करण्याची मुभा बँकेनं दिली.

****

राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. १९७२ मध्ये ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर सहा वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे १४ वर्ष त्यांनी राज्यमंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थाची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्षं ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक होते, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

शासकीय सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा विषयक अडचणी आता तातडीने मार्गी लागणार आहेत. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबीर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज बीड इथं पहिलं कर्मचारी समाधान शिबीर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी शासकीय सुट्टी आली, तर त्यापूर्वीच्या कामकाजाच्या दिवशी हे शिबीर घेतले जाणार आहे.

****

पद्म पुरस्कार प्रदान सोहळ्याचा दुसरा टप्पा येत्या २३ तारखेला आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या सोहळ्यात ६५ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात ६६ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा, ५ पद्म विभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांसह एकूण १३१ पद्म पुरस्कार जाहीर झाले.

****

जागतिक पर्यावरण दिन आज साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचं, पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत, निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं.

 

राज्य मार्ग परिवहन - एस टी महामंडळ राज्यातल्या सर्व बस स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर चार तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. तसंच एसटी महामंडळाने आपल्या सर्व २५१ आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

****

नाशिक इथं पर्यावरण दिन उत्साहात साजरा झाला. गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीत महापालिका तसच लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थानी स्वच्छता मोहीम राबवली.

दरम्यान, वन विभाग महाराष्ट्र शासन आणि नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष सायकल राईड आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सुखना नदीच्या काठावर भारतीय वंशाची सुमारे अडीच हजार झाडं लावण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महापौरांनी यावेळी केलेल्या भाषणात प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून, वर्षभर त्याची काळजी घेत ते जगवण्याची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या रहाटी इथं युवा जल दिंडी २०२६ अभियानाचा आज समारोप झाला. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच दिवसांमध्ये राबवलेल्या या अभियानात युवकांनी चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात जाऊन नागरिकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती केली. सहभागी युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षरोपण करण्यात आलं.

****

नांदेड महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात १८ हजार झाडे लावले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

****

ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वर्तवली आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय स्थलांतर पूर्व नियोजन समन्वय बैठकीत ते आज बोलत होते. कामगारांच्या सुविधेसाठी तातडीने नवीन कार्यपद्धती तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ओळखपत्रांचं वितरण करण्यात यावं, असे निर्देश जॉन्सन यांनी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरणाच्या नक्षत्रवाडी इथल्या मुख्य जलकुंभात कालपासून अतिरिक्त १० एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचं, मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या अमृत - २ योजनेतून शहरासाठी २ हजार ७४० कोटी रुपये खर्चून ही नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.

****

लातूर शहरातल्या विविध भागात मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या त्रासाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. भाजप नगरसेवकांनी महानगरपालिकेसमोर हे अनोखं आंदोलन केलं.

****

हवामान

उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...