Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 07
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
घरगुती वापराच्या १४ पूर्णांक २
शतांश किलो वजनाच्या द्रवीकृत पेट्रोलियम वायू अर्थात एल.पी.जी. स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या
दरात आज २९ रुपयांची वाढ करण्यात झाली आहे. नवीन दर तत्काळ लागू झाले आहेत. नवीन दरानुसार
मुंबईमध्ये सिलिंडरचा दर ९१२ रुपये ५० पैशांरून ९४१ रुपये ५० पैसे झाला आहे.
****
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेना-आय.ए.टी.ए.
नं आशिया-प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका
बजावत असल्याचं म्हटलं आहे; या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या आगामी २०४४ पर्यंत
चार अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील विमान
वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. भारत हा जगातील
सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रीय परीक्षा संस्था – एन.टी.ए.नं
नीटच्या प्रस्तावित पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच
उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे
फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून
परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं
एनटीएनं समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळितपणे
सुरू आहे त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांविना पार पडाव्यात याची पूर्ण काळजी
घेण्यात येत आहे, असंही एनटीनं नमूद केलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
वतीने महागाई विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधान परिषदेचे
माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केले. यावेळी महागाई के अच्छे दिन
म्हणत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणा बाजी देखील
करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती
होती.
****
परभणी शहरात आज सायकल रॅली पार पडली.
केंद्र सरकारच्या फिट इंडिया-संडे ऑन सायकल या संकल्पनेवराधारित आणि पर्यायावर संतुलन
तसेच जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन, परभणी पोलिस विभाग-परभणी
सायकल प्रेमींतर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. पोलिस अधीक्षक पंकज कुमावत स्वतः
सायकल चालवत फिट इंडिया आणि पर्यावरणाचा संदेश दिला. शहरातल्या, छत्रपती शिवाजी महाराज
पुतळा इथून सुरू होऊन गांधी पार्क, नारायण चाळ, महात्मा फुले पुतळामार्गे क्रीडा संकुलनात
या रॅलीचा समारोप झाला. रॅलीत प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, मुली आणि सायकल
प्रेमी सहभागी झाले होते.
****
न्यू चंदीगड इथं भारत-अफगाणिस्तान
दरम्यान खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात
भारताच्या सात बाद ५१५ धावा झाल्या आहेत. भारतानं कालच्या तीन बाद ३६८ धावांवरून आज
खेळाला सुरुवात केली.
****
पुणे जिल्ह्यात लोणीकंद पोलीस ठाण्याच्या
हद्दीत तुळापूर इथं मद्यसाठा, बंदी घातलेले हुक्का स्वाद आणि गांजा असा ८५ लाख रुपयांचा
मुद्देमाल पोलिसांनी आज जप्त केला. एका अनधिकृत मेजवानी समारंभावर पोलिसांनी आज पहाटे
ही धडक कारवाई केली. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तुळापूर
परिसरात अनधिकृत पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे
सुमारे अडीच वाजता १५ अधिकारी आणि ६५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकानं छापा टाकला. छाप्यावेळी
पार्टीमध्ये एकूण १५६ जण उपस्थित होते. त्यामध्ये १०७ पुरुष आणि ४९ महिलांचा समावेश
होता. पोलिस तपासात पार्टीसाठीच्या मद्य परवान्याची वैधता मुदत संपल्यानंतरही कार्यक्रम
सुरू असल्यानं नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. आयमन शेख आणि यश चौधरी हे कार्यक्रमाचे
प्रमुख आयोजक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
****
राज्यात
रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर
कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे
निर्देश निर्गमित झाले आहेत.
परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक
आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश देत सांगितले आहे की, अतिभार
वाहतुकीबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अशा वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत
आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली
आहे. या मोहिमे अंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये
पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे.
दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन
कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईचा सविस्तर अहवाल येत्या २२ जून
पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावा लागणार आहे.
****
No comments:
Post a Comment