Sunday, 28 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून २०२६ दुपारी १.०० वा.

****

देशात रोजगाराच्या संधी वाढण्यासह आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ‘मन की बात’ या आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या १३५व्या भागातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत असतांना बोलत होते.

प्रत्येक नागरिकाच्या अभिमानाचं हे यश राष्ट्र सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेशी जोडलेलं आहे. कारण, आयएनएस दूनागिरीसोबतच संशोधक आणि अग्रय ही तीन जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहेत. त्यांच्या आरेखन ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे असं मोदी म्हणाले. याचसोबत देशानं हवाई वाहतूक क्षेत्रातही मोठं यश मिळवत ‘मेड इन इंडियाअसलेल्या सी-295 विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी ४० विमानं तयार केली जात असल्यानं सुक्ष्म आणि लघु उद्योग-एम.एस.एम.ई. आणि विमान-अंतराळ क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे असं ते म्हणाले. लांब पल्ल्याच्या स्वयंचलीत क्षेपणास्रांची नुकतीच यशस्वी चाचणी झाल्याचं नमूद करत, आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे असं पंतप्रधानांनी अधोरेखीत केलं.

नुकत्याच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं बोलतांना मोदी यांनी, देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित योगविद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचं सांगून अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं एकूण १०२ सुवर्णपदकांसह ११४ पदकं जिंकत स्पर्धेच्या पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावल्याचं नमूद केलं.

पश्चिम आशियातली युद्ध परिस्थितीत देशवासियांना आपण केलेलं आवाहन अर्थात काही काळ सोनं खरेदी करणं टाळणं, परदेशात सुट्टयांसाठी न जाणं, तसंच चारचाकी वाहनं सामायिक करणं यांसह शेतकऱ्यांनी रासायनिक खतमुक्त शेती करत, शेतजमिनी वाचवणं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं सांगितलं होतं. आपल्या आवाहनाला केवळ पाठिंबाच नाही तर सर्व बाजूंनी जनता सहकार्यही करत असल्याचं मोदी म्हणाले.

आपल्या देशात वाढदिवस – लग्नसोहळे, कौटुंबिक कार्यक्रम न राहता समाजाचे उत्सव बनतात. कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटायचा असल्यानं पाहुण्यांना भेटवस्तूही देल्या जातात. महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या बहादूरपुरा गावातील एका कुटुंबाच्या आदर्श उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

यासंदर्भानं पुढं बोलतांना मोदी यांनी, नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत एका वर्षाच्या फक्त वीस रुपयांच्या हप्त्यात दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळत असल्याचं सांगून, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त ४३६ रुपये म्हणजेच दिवसाला जेमतेम दीड रुपया असल्याचं त्यांनी सांगितलं.

अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं असं सांगून विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देत अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही असं त्यांनी नमूद केलं.

जो खेळतो, त्याचाच विकास होतो असं सांगून आज देशात खेळणाऱ्या तरुणांची संख्या वेगानं वाढत असून आता खूप जास्त तरुण खेळाला कारकिर्द म्हणून स्वीकारत असल्याचं मोदी म्हणाले.

कत्रिम बुध्दीमत्ता –ए.आय.च्या जगात लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची, यासाठी नालंदा विद्यापीठानं शास्त्रार्थ परंपरा राबवल्याचं सांगितलं. ही वाद-संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया ज्यात तर्कासहित, पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपलं संगीत - अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून दूर आपली परंपरा शिकण्याचा हा प्रयत्न आपली संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठीचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. गणेशोत्सवात मातीच्या मूर्तीच खरेदी करा, असं आवाहन त्यांनी केलं. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं अभियान मिळून राबवायचा खास आग्रहही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

****

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज सर्वत्र सुरू आहे. ठिकठिकाणी प्रामुख्यानं रेल्वे स्थानक, बस स्थानकं आणि तपासणी चौकीवर प्रवासातील बालकांसाठी कक्ष उभारण्यात आले आहेत.

****

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या चार ते पाच दिवसांत मराठवाड्याच्या संपूर्ण भागात बहुतांशी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...