Saturday, 20 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

** विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्त्व-पंतप्रधानांचं प्रतिपादन

** सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त

** केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर तसंच इचलकरंजी दौऱ्यावर

** मुंबई इथं राष्ट्रीय सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन

** नीट युजी पुनर्परीक्षेसाठी एनटीएकडून अधिकृत व्हॉटसअप संपर्क वाहिनी

आणि

** केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल ८० रुपये वाढ

****

विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्त्व असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेतून आतापर्यंत ७० लाख रोजगार निर्माण झाल्याचा आणि लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३व्या हप्त्याचं वितरण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यात हा कार्यक्रम होईल.

****

सैनिकांच्या शौर्याला पूरक ठरेल अशा मजबूत सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात अत्याधुनिक संयंत्राची पायाभरणी काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर च्या यशात मेड-इन-इंडिया उपकरणांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले,

बाईट – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार असल्याचं ते म्हणाले.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. ते महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध विकासकामांचं उद्घाटन, विकास प्रकल्पांचा आढावा तसंच कोल्हापूर इथे एका जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर, ते इचलकरंजी इथे एका सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटनासह शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करतील.

दरम्यान, नवी दिल्लीत फिंगरप्रिंट विषयक २६ व्या अखिल भारतीय परिषदेत शहा यांनी काल मार्गदर्शन केलं. फौजदारी न्याय व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.

****

मुंबई इथं राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन काल केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. याठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दूरस्थ पद्धतीने त्यांनी उद्घाटन केलं. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्त्वाची भूमिका बजावतील, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं.

****

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट युजी पुनर्परिक्षा उद्या होणार आहे. या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था – एनटीएनं एक अधिकृत व्हॉटसअप संपर्क वाहिनी सुरु केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती ७८ २७ ९८ ०२ ८७ या व्हॉटसअप क्रमांकावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअप वर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करुन घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण पाच हजार ५६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात १७ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

****

राज्यातल्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यादरम्यान काल करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पुढील दीड वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

****

केंद्र सरकारने बफर साठा योजनेंतर्गत नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला प्रति क्विंटल ८० रुपयांची वाढ दिली आहे. गेल्या ४० दिवसातली ही तिसरी भाववाढ आहे. आजपासून ही दरवाढ लागू होत असून कांद्याचा किमान हमी खरेदी दर प्रतिकिलो साडे १७  रुपये करण्यात आला असून, कालपर्यंत हा दर १६ रुपये ५० पैसे इतका होता.

****

शिवसेनेचा साठावा वर्धापनदिन काल साजरा झाला. या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपवर टीका केली. काँग्रेसने असं राजकारण केलं नसल्याचं सांगत, काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या दाव्यांचं ठाकरे यांनी खंडन केलं. 

****

आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या साजरा होत आहे. या निमित्त काल मंत्रालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात दिव्यांग योगसाधिका अन्वी विजय झांझरूकिया हिचा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंदीगड इथं झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

****

योग दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय योग संस्थानच्या वतीने योग दिंडी काढण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात उद्या विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथं सकाळी साडे सहा वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे.

****

नांदेड इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शहरातल्या शिव मंदिर इथल्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात योगाध्यापकांचं प्रात्यक्षिक आणि ‘आरोग्य आणि जीवनशैली’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.

****

जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्ताने दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक संजय औरंगाबादकर यांनी दिलेली अर्ध चक्रासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.

बाईट – संजय औरंगाबादकर

****

नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना सरकारने एक कोटी रूपयांची मदत करावी, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या संतूक पिंप्री या त्यांच्या मूळ गावी ते काल बोलत होते. या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही दीपके यांनी यावेळी दिला.

****

राज्यातल्या अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्ट पर्यंत चार तासांचा ‘मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम’ पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाचे सहआयुक्त रवी गायकवाड यांनी सांगितलं. सर्व चालकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन वेळेत प्रमाणपत्र मिळवावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत तब्बल १२ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत अमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. या आरोपींकडून तीन लाख १८ हजार ५०० रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

****

नांदेडमध्ये इतवारा भागात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई करत नऊ लाख ८६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी विक्रेता आणि पुरवठादार अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

****

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...