Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· केंद्रीय
विद्यालय संघटनेकडून सहावी तसंच नववीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य
· राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची शक्यता सुप्रिया
सुळे यांनी फेटाळली
· छत्रपती
संभाजीनगर तसंच लातूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू
· पुरुषांच्या
क्रिकेटमध्ये भारताचा अफगाणिस्तानवर सात गडी राखून विजय, महिला टी-ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान लढत
आणि
· छत्रपती
संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याला आज उष्णतेचा यलो अलर्ट तर नांदेड, लातूर आणि
धाराशिव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी
****
केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच
केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता सहावी आणि नववीच्या वर्गांसाठी
त्रि-भाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा
अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय
टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या
तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकड्या असलेल्या
शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल, तर एकाच तुकडीच्या
शाळांमध्ये किमान १५ विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल,
असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -
सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुसरून इयत्ता नववीच्या
विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान दोन भारतीय
भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता
दहावीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळस्तरीय परीक्षा घेतली जाणार
नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे.
****
एकल माता किंवा एकल पालकांच्या
पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार
आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती
दिली. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, या संदर्भात येत्या १७ जून
रोजी राज्यातल्या पंधराशे महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक
बोलावली असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली केंद्र सरकारची बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची
सुवर्ण वर्षे ठरली असून, देशानं नवी अर्थव्यवस्था आणि आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे
वाटचाल केल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर
ते काल अहिल्यानगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, नागपूर इथं घेतलेल्या
पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनीही केंद्रात मोदी
सरकारच्या १२ वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला. विकास, विश्वास आणि जनकल्याण या
त्रिसुत्रीच्या आधारावर नवभारताची पायाभरणी झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
पक्षाच्या, काँग्रेस पक्षात विलिनीकरणाची शक्यता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा
खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावली आहे. त्या काल नागपूर इथं
प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं सांगत,
यासंदर्भातील माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांमधूनच मिळाल्याचं त्या म्हणाल्या.
सरकारने शेतकरी समस्यांबाबत अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत, सरकारने
राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन सुळे
यांनी केलं.
****
शेतकरी कर्ज माफी योजनेतल्या कथित
जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरु केलं आहे. मागण्या मान्य होईपर्यंत
उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी २०१९
च्या योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ पन्नास हजार रुपयांपर्यंतचा लाभ त्याचप्रमाणे
प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी
केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला
आहे.
****
ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय
पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रात पंचायती राज विभागाशी संबंधित दोन उपक्रमांना सुवर्ण
पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातल्या
कडेपूर ग्रामपंचायत तसंच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा यात समावेश
आहे. कडेपूर ग्रामपंचायतीला 'सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी
ग्रामस्तरावरील उपक्रम' या श्रेणीमध्ये, तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य
विभागाला 'ई-आरोग्य धमणी' या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सुवर्ण पदकाने सन्मानित
करण्यात आलं.
****
योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर,
मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचं प्रतिपादन पणन
आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. ते काल मुंबईत
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर सर्व देशांच्या महावाणिज्यदूत आणि
मानद वाणिज्यदूतांसाठीच्या विशेष योग सत्राच्या उदघाट्नप्रसंगी बोलत होते.
****
२१ जून हा दिवस जागतिक योग दिन
म्हणून साजरा होतो. या निमित्ताने विविध योगासनांची माहिती आपण दररोज घेणार आहोत.
छत्रपती संभाजीनगर इथले योग अभ्यासक उत्तम काळवणे यांनी दिलेली ताडासनाची माहिती
आपण आज घेऊ..
बाईट- योग अभ्यासक उत्तम
काळवणे
****
अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगा
अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नांदेडच्या श्रेयस मार्कंडेय यांचा
नांदेड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर
यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर तसंच लातूर
जिल्ह्यात काल रस्ता अपघातात दोन वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर
तालुक्यात बाबरगाव फाटा परिसरात कंटेनर - दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी
चालक तसंच कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी महिलेचं रुग्णालयात
उपचारादरम्यान निधन झालं.
दुसरा अपघात लातूर जिल्ह्याच्या
चाकूर तालुक्यात आलगरवाडी पाटीजवळ घडला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या
या तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघांसह कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताच्या नेमक्या कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान राज्य सरकार आणि
प्रशासनावर जोरदार टीका केली. काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, देवणी
तालुक्यातल्या शेतकऱ्याला मदत केल्याचा सरकारने केवळ दिखावा करीत असल्याचा आरोप केला.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. लोकशाहीमध्ये निवडणूक
प्रक्रिया महत्त्वाची असून जिंकणे-हरणे हा त्याचा भाग असल्याचं सांगून दानवे
यांनी, भाजपवर टीका केली.
****
विधान परिषदेच्याप नांदेड स्थानिक
प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष आणि
शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचं काटेकोरपणे
पालन करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी दिले आहेत.
नांदेड इथं काल झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. निवडणूक कर्तव्य
बजावतांना समाज माध्यमाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक तसंच जबाबदारीने करावा, अशी
सूचना त्यांनी केली.
****
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये, भारतानं
काल धरमशाला इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानवर सात गडी राखून
विजय मिळवला. पावसामुळं उशिरा सुरुवात झाल्यानं प्रत्येकी २५ षटकं खेळण्यासाठी
निर्धारित करण्यात आली. नाणेफेक जिंकून भारतानं अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीस
पाचारण केलं. त्यांनी सर्वबाद १९४ धावा केल्या. भारतानं हे आव्हान तीन गड्यांच्या
मोबदल्यात २३ व्या षटकातच साध्य केलं. कर्णधार शुभमन गिलनं नाबाद ८४ धावा करत
सामनावीरचा किताब पटकावला. मालिकेचा पुढचा सामना १७ जुनला लखनऊ इथं होईल.
****
महिला क्रिकेटमध्ये, आयसीसी
टी-ट्वेंटी विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान लढत होणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम
इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामना सुरु होईल.
****
हवामान
नैर्ऋत्य मोसमी पाऊस पुढे
सरकण्यासाठी पुढच्या दोन दिवसांत परिस्थिती अनुकूल होत असल्याचं हवामान विभागाने
म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह
पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज
पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच जालना
जिल्ह्याला आज उष्णतेचा यलो अलर्ट तर नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला
पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. इतर
जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment