Tuesday, 2 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही- मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा;पुरुष लाभार्थींकडून मात्र पैसे परत घेतले जाणार

·      निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय लांबणीवर

·      मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृतांच्या वारसांना एमआयडीसीत नोकरी

·      एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाईचा इशारा

आणि

·      छत्रपती संभाजीनगराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश

****

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेसाठीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी पाच लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच दहा लाख जणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्यांनी केवायसी केलं अशा एक कोटी ७० लाख महिला योजनेसाठी पात्र ठरल्या, ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या, त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, पण १४ हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रकार उघड झाला, या पुरुषांकडून मात्र, त्यांनी मिळवलेले पैसे परत घेतले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होण्याची अपेक्षा होती, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

ग्राम सडक योजना टप्पा-३ मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५० कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक, या दोन्ही बँकांकडून राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.

राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय रस्ता काँग्रेस - IRCच्या मानकांनुसार राज्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीस मान्यता देण्यात आली. यामध्ये व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक-प्रशासन, सहायक व्यवस्थापक-वित्त व लेखा ही पदे प्रतिनियुक्तीने भरली जाणार असून, मल्टी टास्किंग स्टाफची सेवा बाह्यस्त्रोतांद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली

मुंबईतील हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी पाच महाविद्यालयांचा घटक म्हणून समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे.  सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र जारी केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी करून प्रमाणपत्र वितरीत करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

****

कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीने आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे - नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. सरकारने कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली.

नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं तहसीलवर काँग्रेसच्या वतीने गाढव मोर्चा काढण्यात आला.

****

दिल्लीतल्या एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पाच आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत १५ जूनपर्यंत वाढवली. मांगिलाल खाटिक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याची सीबीआयची मागणी न्यायालयानं मंजूर केली. मनिषा हवालदार, डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह या आरोपींना न्यायालयानं काल चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. सीबीआयनं याप्रकरणी आतापर्यंत तेरा जणांना अटक केलं आहे.

****

नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा पदवीदान संचालन सोहळा आज सकाळी लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं १८ आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या २५ प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह १० प्रशिक्षकांची तुकडी यावेळी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये दोन महिला वैमानिकांचाही समावेश आहे.

****

एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. सीसीटीव्ही, डिजिटल नोंदी आणि वाहकांच्या अहवालांच्या आधारे बस निघण्याच्या वेळेचं निरीक्षण केलं जाणार आहे. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात, त्यांचं तिकीट वितरण वेळेत व्हावं, विशेषत: पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीतल्या सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेवर होतील, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

****

केंद्र सरकारला बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. या बारा वर्षामध्ये सरकारने एक देश एक कर प्रणाली म्हणजेच जीएसटी सुधारणा करून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी दिल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीशी बोलते होते. ते म्हणाले -

बाईट – डॉ. भागवत कराड

****

छत्रपती संभाजीनगर शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. येत्या १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगानं आज त्यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.

****

उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे धाराशिव जिल्ह्यातल्या अकरा गावात १६ टँकर्सनं तर ६५ गावांमध्ये ९९ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. यात धाराशिव तालुक्यातल्या सात गावांसाठी सर्वाधिक अकरा टँकर्समधून तर भूम तालुक्यातल्या चार गावांसाठी पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि संदलापूर इथे, “युवा जल दिंडी २०२६अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारचा युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालयाचा माय भारत कार्यक्रम, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या यशदा यांच्यातर्फे संयुक्तपणे हे अभियान राबवण्यात येतं. यामध्ये, गावोगावी जाऊन भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवला जाणार आहे.

****

येत्या ४ ते ८ जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योग-पटूंचं पथक भारतात येत आहे. या स्पर्धेत साठपेक्षा जास्त देशांचे खेळाडू आणि प्रतिनिधी येतील अशी शक्यता आहे.

****

हवामान

नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या दोन दिवसांत केरलम् मध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. लक्षद्वीप, केरलम्, तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागर परिसरात चार जूनपासून मोसमी पाऊस पुढे वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४३ पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४० पूर्णांक पाच दशांश सेल्सियस, नांदेड ३९ पूर्णांक चार, बीड ४० पूर्णांक तीन, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक तीन, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...