Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात
६५ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव
· विधिमंडळासमोर ९७ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या पुरवणी मागण्या
सादर
· विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, दहा
जागांवर महायुतीला यश
· शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांचा एकनाथ
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश
आणि
· राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात
६५ मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. आजच्या सोहळ्यात २ पद्म विभूषण, ७ पद्म
भूषण आणि ५६ पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापूर्वी २५ मे रोजी राष्ट्रपती भवनात
पहिल्या टप्प्यातील सोहळा पार पडला होता, ज्यात ६६ पुरस्कार विजेत्यांचा
सन्मान करण्यात आला होता.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल मुंबईत सुरुवात झाली.
कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा
पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी २०२६-२७ च्या पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य
मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागांत पाणीटंचाई निर्माण झाल्याचा
मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा
घडवून आणायचं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं.
दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी
मंत्री अनंतराव थोपटे,
विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर-पाटील, कृष्णराव
देशमुख, पटल्या मावसकर,
वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी
जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं
कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित
सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर २०२६-२७ साठीच्या पुरवणी मागण्या अर्थ
राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल
तुमाने, संजय खोडके,
अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती
केली.
****
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या
पहिल्या दिवशी एकंदर ९७ हजार ७०६ कोटी ४० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर
सादर करण्यात आल्या,
ऐकू या संबंधीचा वृत्तांत.
राज्य
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकंदर ९७ हजार ७०६ कोटी ४० लाख
रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक
२० हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती
योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल १० हजार ७ कोटी १० लाख रुपयांची तरतूद
केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत
बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी-राम-जी योजनेसाठी केंद्र आणि
राज्याचा हिस्सा ७ हजार ३६७ कोटी ३२ लाख रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि
अंमलबजावणीसाठी ३ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या २२ हजार १५ कोटी ४२ लाख, नगर विकास विभागाच्या १५ हजार १५२ कोटी ४३ लाख, तर उद्योग,
ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म
विभागाच्या १४ हजार ७६० कोटी ४८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे.
****
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल
जाहीर झाले. अकरापैकी दहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका
जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर सहा जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच
बिनविरोध निवडले गेले आहेत,
त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या
जाणाऱ्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत १७ पैकी १६ जागा जिंकत महायुतीनं विजय
मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.
निवडून आलेल्यांमध्ये, छत्रपती संभाजीनगर - जालना मतदारसंघातुन
सुहास शिरसाट,
नांदेड अमरनाथ राजुरकर, लातूर-बीड-धाराशिव बसवराज पाटील, परभणी-हिंगोली
शिवसेनेचे सईद खान,
सांगली सातारा धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश
ब्राह्मणकर,
जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती
प्रवीण पोटे तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोतदार यांनी विजय
मिळवला.
नाशिक मतदारसंघातून शिवेसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा
सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते हे अपक्ष म्हणून तिथून
निवडून आले आहेत.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी काल
शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई इथं आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील
शिवसेनेत हे खासदार प्रवेश घेत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं. एकनाथ शिंदे यांनी
संजय दिना पाटील,
संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब
वाकचौरे, नागेश पाटील-आष्टीकर आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर या खासदारांचं पक्षात स्वागत केलं.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपणे आणि पक्षाची हिंदुत्वाची
तत्त्वं सुरक्षित ठेवणे हा या बंडाचा उद्देश असल्याचं शिंदे म्हणाले. तसंच या खासदारांना
आपापल्या मतदारसंघातील कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं शिंदे यांनी सांगितलं.
****
मतदार संघातील विकासकामं करण्यासाठीच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं
खासदार नागेश पाटील आणि संजय जाधव यांनी सांगितलं. पक्ष प्रवेशानंतर त्यांचं काल नांदेड
विमानतळावर आगमन झालं,
त्यावेळी ते बोलत होते.
****
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख
उद्धव ठाकरे शनिवारपासून तीन दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव
आणि शिर्डी या लोकसभा मतदार संघांचा दौरा करणार आहेत.
****
नीट फेरपरीक्षेचा पेपर फुटल्याचं वृत्त एनटीए, राष्ट्रीय
चाचणी संस्थेनं फेटाळलं आहे. नीट फेरपरीक्षा २०२६ चा पेपर टेलिग्राम या समाजमाध्यमावर
परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र रविवारची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त
वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अफवा पसरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई
केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा
तपास सुरु आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही
माहिती नीट परीक्षेच्या (www.neet.nta.nic.in)
या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे.
****
आधार ॲपला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या पाच
महिन्यांपेक्षाच्या कमी कालावधीत ॲपने 31 दशलक्ष डाउनलोडचा टप्पा ओलांडला
आहे. आधार ॲपमुळं मोबाईल क्रमांक आणि पत्ता अद्ययावत करणं स्मार्ट फोनच्या माध्यमातून
सहज करता येत आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात यशवाडी इथल्या हनुमान मंदिर
दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मदतीची रक्कम जिल्हाधिकार्यांच्या बँक
खात्यात जमा करण्यात आली असून प्रत्येकी ५
लाख रुपये अशी मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयानं जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं
आहे. २० जून रोजी मंदिराचा सभामंडप कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला.
****
समाजकल्याण आयुक्त पुणे दीपा मुधोळ-मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या
मुलांसाठी बीड इथं उभारण्यात येत असलेल्या संत भगवानबाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाची
पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली
तसेच काम वेळेवर पूर्ण करण्याची सूचना केली.
****
बीड नगरपरिषदेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत प्राप्त
झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी
करण्यात यावा,
अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासन निर्णयानुसार नगरपरिषदेला
गेल्या २४ मार्च रोजी २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे.
****
जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात आजपासून पुढील सुचनेपर्यंत
सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील उष्णतेचा कडाका लक्षात
घेता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
****
राज्यातील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना अनिवार्य करण्यात आली आहे.
पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या वैयक्तिक
अपघात विमा योजनेचा लाभ होणार आहे, अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.
यासाठी विद्यार्थ्यांना,
महाविद्यालयांना ’पर्सनल अॅक्सिडेंट इन्श्यूरन्स’ शिर्षतार्गंत
विमा रक्कमेसाठी २० रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे.
****
हवामान
नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम
महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली
आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग, तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये
तो सक्रीय झाला आहे. येत्या दोन दिवसात
नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळं मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात
तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही
काही जिल्ह्यांमध्ये हीच स्थिती राहील. काल संध्याकाळच्या सुमारास पैठण आणि जालना शहर
आणि परिसरात पाऊस झाला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना
जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment