Tuesday, 16 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६ जाहीर; स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ

·      महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून सातशे तेहतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी मंजूर

·      राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला एक हेक्टर शासकीय जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय

·      डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी

आणि

·      शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात शक्तिपीठ विरोधी कृती समितीचं आंदोलन

****

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६ जाहीर करण्यात आलं. या धोरणात, राज्यातल्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय योजण्यावर, तसंच ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण-२०२६ आज जाहीर करण्यात आलं. हवाई, सागरी तसंच जमिनीवरील विविध कामांसाठी स्वयंचलित प्रणालीतल्या उपकरणांची निर्मिती करण्यासाठीचं हे धोरण असून, यामुळे ड्रोन्स आणि विविध रोबोटसच्या निर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे.

राज्यात भारत नेट कार्यक्रम राबवण्यासाठी सुधारित पद्धतीला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी "महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड" या नावानं विशेष हेतू वहन यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे.

विकसित भारत - जी राम जी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विकसित भारत - जी राम जी कायदा २०२५, या कायद्याशी सुसंगत अशा तरतुदी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये करण्यालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याला आणि त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.

वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी यासाठी निदान प्रणालीतील महत्वाचा असा हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपूर इथे उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं सातशे तेहतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या रकमेपैकी साठ टक्के निधी केंद्र सरकार तर चाळीस टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. या निधीमुळे सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं अशा अनेक दृष्टीनं महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी  म्हटलं आहे.

****

राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला एक हेक्टर म्हणजेच अडीच एकर शासकीय जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. ते आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही योजना राज्यभर राबवण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा आणि बांबू लागवड करण्यासाठी तसंच ग्रासलँड डेव्हलपमेंटसाठी एक लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेतून रोजगार निर्मिती आणि महिलांचं आर्थिक स्वावलंबन साध्य होईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारनं येत्या २२ तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे. याशिवाय, येत्या ३० तारखेपर्यंत, या ॲपवरच्या जुन्या मेसेजेसचं एडिटिंग करता येणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. नीट यूजी २०२६ ची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार असून, या परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे आणि लोकांची फसवणूक करू पाहणारे अनेक बनावट संदेश या ॲपवर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय चाचणी संस्था, एनटीएनं  टेलिग्रामवर निर्बंध घालण्याची शिफारस केली होती. आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये, असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

****

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या सातव्या नियमातून सीरप वगळण्यात आलं असून, त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही, असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल येत्या २० तारखेला देणार असल्याचं विशेष न्यायालयानं आज सांगितलं. तीन जून २००६ ला पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्यांचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना २००९ मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सहआरोपी आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी नवीन पाणीपुरवठा योजनेचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला असून, काल रात्री वाढीव पाणी नक्षत्रवाडीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पोचलं. या पाण्याच्या वाटपाचं नियोजन महापालिकेनं केलं असून प्रथम सिडको हडको परिसराला आणि नंतर संपूर्ण शहराला वाढीव पाणी मिळणार आहे.

****

नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी आज  नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर हिंगोली जिल्ह्यातल्या कांडली फाटा इथं शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सुमारे दीड तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन ग्रामविकास अधिकारी एकनाथ कदम यांच्याकडे सादर केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कोणत्याही अटी-शर्तीशिवाय राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज मराठवाड्यातल्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. बीड तसंच छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

****

अनुसूचित जातीतील अ, , , ड आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं, या मुख्य मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज बीड शहरात मातंग क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आलं.

****

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येत्या २१ तारखेला म्हणजे रविवारी, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बिबी का मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल, या दोन ठिकाणी, सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात सामूहिक योगासनांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’, ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर पंचायत समितीमधला तांत्रिक सहाय्यक गौस पाशा चांद शेख याला लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराच्या सिंचन विहिरीच्या कामाचं पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

हिंगोली जिल्ह्यात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल इथं टँकरनं दिलेल्या धडकेमुळे  एक महिला आणि एक बैल जागीच मृत्युमुखी पडले असून, दुसरा एक बैल जखमी झाला आहे. आज सकाळी हा अपघात झाला. अकोल्याहून नांदेडकडे पेट्रोल वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरनं बैलांना घेऊन जाणाऱ्या महिलेला निष्काळजीपणे धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

****

 

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...