Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 June 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जून २०२६ सायंकाळी
६.१०
****
· राज्यात
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान
प्रक्रिया पूर्ण, येत्या २२ तारखेला मतमोजणी
·
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हिप जारी करत बोलवलेल्या बैठकीला सहा खासदार
अनुपस्थित
· नीट युजी पुनर्परिक्षेच्या
तयारीचा शिक्षण मंत्र्यांकडून आढावा
आणि
· बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या
कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
****
राज्यात विधानपरिषदेच्या
११ जागांसाठी आज मतदान पार पडलं. यात सोलापूर, जळगाव, सांगली- सातारा, नांदेड, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या
पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. मतमोजणी येत्या २२ तारखेला होईल.
ठाणे,
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे,
यवतमाळ, वर्धा- गडचिरोली-चंद्रपूर आणि
अहिल्यानगर या सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
****
औरंगाबाद-जालना मतदारसंघासाठी ९८ पूर्णांक ९० टक्के, नांदेड जिल्ह्यात ९९
पूर्णांक ७८ टक्के, तर उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात ९९
टक्के मतदान झालं. परभणी –हिंगोली मतदारसंघात दुपारी दोन वाजेपर्यंत ७५
टक्के मतदान झालं, तर या वेळेपर्यंत कळमनुरी मतदान
केंद्रावर १०० टक्के मतदानाची नोंद झाली.
****
दरम्यान, या मतदान प्रक्रियेत
लातूर इथं वंचित बहुजन आघाडीने मतदान न करण्याचा निर्णय घेतला. नांदेड
आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला
पाठिंबा दिला नसल्याचा आरोप करत, लातूर इथं काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने
घेतली. त्यामुळे लातूर शहरातल्या आघाडीच्या सर्व पाच नगरसेवकांनी आज मतदान केलं नाही.
****
या निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
महायुतीकडे पुरेसं संख्याबळ असल्याने महाविकास आघाडीला अधिक
मतांनी विजय मिळवणं शक्य नसल्याचं ते म्हणाले.
शिवसेनेतील संवादाचा
अभाव आणि नेतृत्वाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी
असल्याचं नमूद करत उद्धव ठाकरे यांनी याचा गांभीर्याने विचार करावा असंही बावनकुळे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित
होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल
देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत
उपस्थित होते. उर्वरित सहा खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट
पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश
आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव,
संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे
निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे
यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं. मात्र, ही
प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून, पडताळणीसाठी काही खासदारांनी
प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे, असं लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
येत्या २१ जून रोजी होणाऱ्या
नीट युजी पुनर्परिक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री
धर्मेंद्र प्रधान यांनी आज आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्ये,
पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके राखण्याची सूचना
त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त
आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली
असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा,
असंही त्यांनी सूचित केलं. या बैठकीत परीक्षेची पूर्वतयारी,
समन्वय यंत्रणा, सुरक्षाविषयक नियम,
वाहतूक आणि आवश्यक सामुग्रीच्या
व्यवस्थापनासाठी केलेलं नियोजन, तक्रार
निवारण यंत्रणा तसंच परीक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात
आली.
****
इ पी एफ ओ अर्थात
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये २०२५-२६ मधल्या ठेवींवर सव्वा आठ टक्के व्याज देण्याचा
निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग तीन वर्ष हा व्याजदर कायम
राहिला आहे. याचा फायदा सुमारे सात कोटी ठेवीदारांना होणार आहे.
****
नागपूरजवळ अंबाझरी
इथल्या आयुध कारखान्यात दहा हजार टनाच्या ॲल्युमिनियम
एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या
हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस
अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक
असणारं उच्च दर्जाचं ऍल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या एक्सट्रुजन
प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
जागतिक पातळीवर शैक्षणिक
संस्थांचा दर्जा दर्शवणारी क्वाकरेली सिमोंड्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. यात
पहिल्या २०० शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या ३ संस्थांचा समावेश असून,
आयआयटी दिल्ली ११८ व्या, आयआयटी मुंबई
१३४ व्या तर आयआयटी मद्रास १७० व्या क्रमांकावर आहे.
****
झारखंडमधली महिला
नक्षलवादी पुष्पा महतो हिने कोलकाता पोलिसांसमोर आज शरणागती पत्करली. तिच्यावर १०
लाखांचं बक्षीस होतं, आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम
आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि
बुरुडीह येथील भूसुरुंग स्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता.
****
झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात
येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राणी लक्ष्मीबाई यांना
अभिवादन केलं.
****
पावसाच्या प्रत्येक
थेंबाचं संवर्धन करून, दुष्काळाला हरवत जलसमृद्ध
महाराष्ट्र घडवण्याचं आवाहन, मृद आणि जलसंधारण
मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. अल निनोमुळे यावर्षी
राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन आणि संवर्धन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात नमूद
केलं. मृद आणि जलसंधारण विभागाने राज्यभर मोठ्या प्रमाणात
जलसंधारणाची कामं हाती घेतली
असून, निधीची कमतरता भासू देणार नाही असंही मंत्री राठोड
यांनी आश्वासित केलं.
****
अन्नपदार्थांशी निगडीत
सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक
सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे
निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक
प्राधिकरणाने दिले आहेत. काही व्यावसायिक अन्न हाताळणी आणि प्रक्रियेदरम्यान,
गंजलेली, खराब झालेली सुरी वापरताना
आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.
****
अन्न आणि औषध प्रशासनाने
बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या 'विशाल डेअरी'वर आज धाड
टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट पेढा तयार केला जात असल्याचं तपासात
समोर आलं. हा पेढा बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातल्या अनेक देवस्थानांमध्ये विक्री केला जात होता, अशी
माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
****
जालना जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार
प्राप्त बदनापूर तालुक्यातल्या वरुडी आणि जालना तालुक्यातल्या सावरगाव या
ग्रामपंचायतींची विभागस्तरीय तपासणी आज करण्यात आली. यावेळी विभागीय अप्पर आयुक्त
सुषमा देसाई यांनी स्वच्छतेच्या कामात सातत्य राखण्याचं
आवाहन केलं. तपासणीदरम्यान समितीने वैयक्तिक शौचालयांचा
वापर, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शाळा आणि अंगणवाडी परिसरातली स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, पाण्याची गुणवत्ता आणि पर्जन्य जलपुनर्भरण आदी
बाबींची पाहणी केली.
****
लातूर इथं जिल्हाधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांनी नीट युजी पुनर्परिक्षेच्या तयारीचा आढावा
घेतला. या परीक्षेदरम्यान आवश्यक सुविधा परीक्षा केंद्रांवर
उपलब्ध असल्याची खात्री करावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार
नाही, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक आणि
समन्वयाने काम करावं, अशा सूचना त्यांनी संबंधितांना
यावेळी दिल्या. जिल्ह्यात एकूण २६ केंद्रांवर ही परीक्षा होणार
आहे.
****
शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफीच्या मागणीसाठी बुलढाणा इथं क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर गेल्या अनेक दिवसांपासून
अन्नत्याग आंदोलन करत आहेत. प्रकृती खालावली असतानाही
त्यांची मागणी ठाम असून, सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन न
मिळाल्याने तुपकर यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. या आंदोलनाला बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्वच विरोधी
पक्षांनी पाठिंबा दिल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
एफआयएच महिला हॉकी
स्पर्धेत भारताच्या संघाने उरुग्वेवर ३-२ अशी मात केली. न्यूझीलंडमधे सुरु
असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे.
भारताचा उपान्त्यफेरीत सामना येत्या २० तारखेला होणार आहे.
****
No comments:
Post a Comment