Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १४ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा
आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचं
प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी
अकादमी- आय.एम.ए.च्या १५८ व्या नियमित तसंच १४१व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग
आऊट परेडला त्या संबोधित करत होत्या. अधिकारी झालेल्या छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची
वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी
दिला. परेडमध्ये नऊ महिला छात्रांचा समावेश हा आय.एम.ए.च्या इतिहासातील महत्त्वाचा
टप्पा असल्याचे सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
'डी.आर.डी.ओ.' ने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहु-स्तरीय संरक्षण
आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या तीन यशस्वी चाचण्या
घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी डी.आर.डी.ओ.चं अभिनंदन केलं आहे.
याद्वारे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमधे आता भारताची
गणना होते, असं सिंग यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या
जहाज-विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केल्याचही त्यांनी सांगितलं. लांब
आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता आता सिद्ध झाली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स
आणि स्लोव्हाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल फ्रान्समधील 'नीस'
शहरात दाखल झाले. तिथल्या भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत
केलं.
या दौऱ्यात आज, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा प्रस्तावित आहे. 'भारत इनोव्हेट्स' उपक्रमाचा संयुक्तपणे
शुभारंभही होईल, महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय तसंच
G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. पंतप्रधान मोदी यांच्या स्लोव्हाकिया
भेटीतन दोन्ही देशांतील सहकार्याच्या नव्या संधींची उपलब्धता आणि आर्थिक संबंध अधिक
दृढ होण्यास मदत होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी
झालेल्या जोरदार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वसमत आणि
कळमनुरी तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. तर हिंगोली
तालुक्यातल्या पहेनी गावामध्ये 70 ते 80 घरावरी टीन पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने
अनेकांना मोठा फटका बसला आहे. कळमनुरी तालुक्यात अनेक भागात केळी पिकाचं मोठं नुकसान
झालं. नुकसानग्रस्त केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल
गुप्ता यांनी दिले आहेत.
****
इंडियन अॅथलेटिक्स सिरीज स्पर्धेत
छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्से यानं पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत
नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. काल या स्पर्धेत तेजसनं अवघ्या १३ सेकंद २७ मिलीसेकंदात
हे अंतर कापलं. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही
पात्र ठरला आहे.
****
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तिथं ३ गावं आणि एका वाडीला चार टँकरद्वारे पाणी
पुरवठा होत आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी विहिरींचे अधिग्रहण
करण्यात आलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या श्री
क्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तींची झीज रोखण्यासह त्यांचं
दीर्घकालीन जतन-संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर
येत्या २३ आणि २४ जून रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार
आहे.
****
राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे
वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर
कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये, आयसीसी
टी-ट्वेंटी विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान लढत होणार आहे. इग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं
भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामना सुरू होईल.
****
आज जागतिक रक्तदाता दिवस साजरा
होत आहे. मानवतेचा एक थेंब: रक्तदान करा जिवन वाचवा, अशा आथयाचा विचार यंदा रक्तदानाबद्दल
मांडण्यात आला आहे.
यानिमित्तानं नागरिकांनी स्वत:हून
रक्तदान करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे.
एखाच्या व्यक्तीला नवं जीवन प्राप्त करून देण्यासाठीचं हे सर्वात प्रभावी आणि पवित्र
कार्य असल्याचं नड्डा यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. रक्तदानाबद्दल
अधिकाधिक जागरकता वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment