Saturday, 13 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्रीय विद्यालय संघटनेकडून सहावी तसंच नववीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य

·      राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची शक्यता सुप्रिया सुळे यांनी फेटाळली

·      ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण पुरस्कार

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू

आणि

·      पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिर्सेचा नवा राष्ट्रीय विक्रम

****

केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता सहावी आणि नववीच्या वर्गांसाठी त्रि-भाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं २९ मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल, तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान १५ विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुसरून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान दोन भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता दहावीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळस्तरीय परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्षे ठरली असून, देशानं नवी अर्थव्यवस्था आणि आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज अहिल्यानगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान नागपुर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या १२ वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेत विकास, विश्वास आणि जनकल्याण या त्रिसुत्रीच्या आधारावर नवभारताची  पायाभरणी झाल्याचं सांगितलं.

सांगली इथं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या काळात देशाचा चेहरा मोहरा बदलला असून सरकारवर लोकांचा अढळ विश्वास असल्याचं सांगितलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या, काँग्रेस पक्षात विलिनीकरणाची शक्यता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावली आहे. त्या आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं सांगत, या संदर्भातील माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांमधूनच मिळाल्याचं त्या म्हणाल्या. सरकारने शेतकरी समस्यांबाबत अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत, सरकारने राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन सुळे यांनी केलं.

****

आध्यात्मिक पर्यटन हे भारतीय संस्कृती तसंच जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असल्याचं केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी म्हटलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं विशेष परिषद आज पार पडली. या परिषदेत भुवनेश कुमार बोलत होते. या परिषदेत देशभरातील ३०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता असल्याचं भुवनेश कुमार यांनी सांगितलं.

****

ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रात पंचायती राज विभागाशी संबंधित दोन उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत तसंच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा समावेश आहे. कडेपूर ग्रामपंचायतीला 'सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम' या श्रेणीमध्ये तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 'ई-आरोग्य धमणी' या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार प्रदान’ सोहळा उद्या १४ जूनला मुंबईत माटुंगा इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात होणार आहे. रंगकर्मी, कलाकार आणि नाट्यसेवकांच्या गौरवासोबतच यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. स्वरस्वामिनी आशा भोसले यांना आदरांजली म्हणून ‘मर्म बंधातली ठेव ही’ या विशेष नाट्यसंगीत कार्यक्रमाचं आयोजनही या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

****

योग ही भारतानं जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी असून योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचं प्रतिपादन पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर सर्व देशांच्या महावाणिज्यदूत आणि मानद वाणिज्यदूतांसाठीच्या विशेष योग सत्राच्या उदघाट्नप्रसंगी बोलत होते. राजशिष्टाचार विभाग आणि मुंबईतली कैवल्यधाम योग संस्था, यांच्या संयुक्त विद्यमानं घेतलेलं हे विशेष सत्र उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं.

****

अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या नांदेडच्या श्रेयस मार्कंडेय यांचा आज जिल्हा प्रशासन नांदेड आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात आज भीषण रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला. बाबरगाव फाटा परिसरात कंटेनर - दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालक तसंच कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

विधान परिषदेच्‍या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या व्दिवार्षीक निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी दिले आहेत. नांदेड इथं आज झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. निवडणूक कर्तव्य बजावतांना समाज माध्यमाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक तसंच जबाबदारीने करावा, अशी सूचना डॉ. चवरे यांनी केली. 

****

इंडियन अ‍ॅथलेटिक्स सिरीज स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्से यानं आज पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ तेरा सेकंद सत्तावीस मिलीसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा तेरा सेकंद एक्केचाळीस मिलीसेकंदाचा स्वतःचाच जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही.सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिने सिंधुचा २२-२०, २१-१२ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. या स्पर्धेत इतर भारतीय खेळाडूंचं आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे.

****

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत, मिश्र दुहेरी गटात, भारताच्या बी. धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी रिकर्व्ह प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. तुर्कस्थानात अंटालया इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत भारतीय जोडीचा सामना कोरियाच्या जोडीसोबत होणार आहे.

****

भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होत आहे. दरम्यान भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे विलंब झाल्यानं हा सामना प्रत्येकी २५ षटकांचा करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तिथं ३ गावं आणि एका वाडीला चार टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यांपैकी अहमदपूर तालुक्यात ५२, औसा ३५, जळकोट १५, निलंगा १३, उदगीर ११, रेणापूर ८, चाकूर ५, शिरूर अनंतपाळ ६ तर लातूर आणि देवणी तालुक्यात प्रत्येकी ३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलं आहे.

 

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील १७४ गावं आणि ४८० वाड्या मिळुन ६५४ ठिकाणी १७९ टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात नांदगाव तालुक्यात सर्वाधिक २३० गावं आणि वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे.

****

हवामान

नैर्ऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्याला आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

****

 

  

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 15 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...