Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
विकसित भारताचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा
वेग वाढवण्याचं पंतप्रधानांचं एनडीएच्या बैठकीत आवाहन
·
सर्वाधिक काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अभिनंदन; देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांकडून
शुभेच्छा
·
शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना
३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
·
राज्यात मे आणि जून महिन्यात गारपिटीमुळे बाधित
फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
आणि
·
बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पुढील दोन दिवस
पावसाचा यलो अलर्ट
****
विकसित भारताचं
उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएच्या बैठकीला ते संबोधित करत
होते. एनडीएच्या सर्व घटकपक्षांचे प्रमुख तसंच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या
बैठकीला उपस्थित होते. या सर्वांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले…
बाईट- पंतप्रधान नरेंद्र
मोदी
दरम्यान, सर्वात
प्रदीर्घ काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं
एनडीएच्या सर्व घटकपक्षांनी अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानेही काल एका विशेष
ठरावाद्वारे त्यांचं अभिनंदन केलं. मोदी यांनी पंतप्रधानपदी तब्बल ४ हजार ३९९ दिवस
पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा ४ हजार ३९८
दिवस या पदावर राहण्याचा विक्रम मोडला.
दरम्यान, राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह
अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका
अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचा कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या
कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला.
****
दरम्यान, राज्य
सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल
३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली. २०२० मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी
काही अटी लागू असल्या, तरी बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नसल्याचं त्यांनी
स्पष्ट केलं. याशिवाय खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना, जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा
मर्यादित असला तरी राज्यात खतांची टंचाई नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात मे आणि
जून २०२६ या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या
फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय
भरणे यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात एका आढावा बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना
कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसानभरपाईची प्रक्रिया गतिमान करावी, असं
त्यांनी सांगितलं. मे आणि जून या कालावधीत राज्यात २७ जिल्ह्यांमध्ये एकूण ६१ हजार
चार हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून, त्यापैकी १८ हजार १२१ हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील
आहे. बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याचं भरणे यांनी
सांगितलं.
****
देशात सीएनजी अर्थात
कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक
वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमधे रुपांतरित करण्याचे
प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची
माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई
केल्याचंही पुरी यांनी सांगितलं.
****
जागतिक नेत्रदान
दिन काल पाळण्यात आला. यानिमित्ताने नेत्रदानाविषयी जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात
आले.
छत्रपती संभाजीनगर
इथल्या तीन युवकांनी दृष्टिबाधितांना डिजिटल दृष्टी देणारं लेट सी नावाचं एक मोबाईल
ॲप विकसित केलं आहे. शौनक सावरगावकर, श्रीनिवास खिस्ते आणि डॉ ओजस मुंदडा अशी या तीन
युवकांची नावं असून, त्यांची सविस्तर मुलाखत आपण आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या
युववाणी या कार्यक्रमात उद्या १२ जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ऐकू शकता.
धाराशिव इथं ज्येष्ठ
नेत्रतज्ज्ञ डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात
आलेल्या दृष्टी दिन सप्ताहाचं उद्घाटन काल झालं. यावेळी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
करून अंधत्व निर्मूलनासाठी जनजागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं.
****
राज्य शिक्षण मंडळाची
दहावी - बारावीची पुरवणी तसंच श्रेणीसुधार परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार
आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ परीक्षा केंद्रांवर ५ हजार ८१९ विद्यार्थी ही
परीक्षा देणार आहेत. इयत्ता १० वीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान, तर १२ वीची परीक्षा
१६ जून ते ८ जुलै दरम्यान होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात १५
जूनपासून शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी विशेष
शिबिरांचं आयोजन करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. ते
काल याबाबतच्या बैठकीत बोलत होते. शाळा सुरू होण्यापूर्वीच तालुकानिहाय आणि शाळानिहाय
आधार शिबिरांचा एक मास्टर प्लॅन तयार करावा, ज्या शाळा १५ जूनपासून नियमित सुरू होत
आहेत, त्याच ठिकाणी या विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात यावं, असं जॉन्सन म्हणाले.
****
लातूर जिल्ह्यातले
शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा बैल वीज कोसळून दगावल्याने त्यांना त्यांच्या पत्नीला
जोखडाला जुंपण्याची वेळ आली होती. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्य़थेची
दखल घेतली, आणि काल अवघ्या काही तासात या कुटुंबाला बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान
भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यामुळे खरीप हंगामासाठी मिळालेली कामं पूर्ण करण्याची चिंता
दूर झाली असून, मिळालेली कामे चांगली होतील, असं समाधान या कुटुंबाने व्यक्त केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रे अद्ययावत करून, पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली
यांनी दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्रं
गावपातळीवरच उपलब्ध होणार आहेत.
****
विधान परिषद निवडणुकीत
महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
यांनी व्यक्त केला आहे. ते काल लातूर इथं बोलत होते. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून
असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्हा विधी
सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा
आणि सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी यांच्या हस्ते काल वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हा
वकील संघाचे अध्यक्ष एस. टी. अडकीने, यांच्यासह इतर न्यायिक अधिकारी यावेळी उपस्थित
होते.
****
नांदेड जिल्ह्यात
अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवलेल्या
विशेष मोहिमेत १४० प्रतिबंधात्मक कारवाया करून १० लाख ७२ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल.
कदम यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली. २९ मे पासूनच्या कारवाईत आत्तापर्यंत १४२
आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही पाणी टंचाईच्या झळा कायम आहेत. सध्या जिल्ह्यात
२३९ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जालना जिल्ह्यात
८३ टँकर, धाराशिव जिल्ह्यात १७, नांदेड १४, परभणी ११, बीड १०, लातूर ३ तर हिंगोली जिल्ह्यात
२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
****
मराठवाड्यात बीड,
लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या तीनही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची
शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाचा अंदाज
वर्तवण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment