Thursday, 4 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागितक योगासन क्रीडास्पर्धेला आभासी पद्धतीनं संबोधित करणार आहेत. जगभरात योगाभ्यासाला प्रचंड लोकप्रियता मिळत असून, या व्यासपीठाने जगभरातल्या योगप्रेमींना एकत्र आणल्याचं पंतप्रधानांनी यासंदर्भात समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. योगासनासाठीच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं. या स्पर्धेत आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीया मधल्या सुमारे ७० ते ७५ देशातले ५०० हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.

****

बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या नऊ प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरविण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत, तर रायगड जिल्ह्यातल्या खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत दुसरा, तर रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत दुसरा क्रमांक मिळवला.

****

अल्पसंख्याक विभागातली रिक्त पदे कालमर्यादेत तातडीने भरण्याची प्रक्रिया गतीमान करावी, तसंच विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ पात्र नागरीकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. यासंदर्भातल्या बैठकीत त्या काल बोलत होत्या. अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं, विशेषतः मुलींसाठी उच्च आणि तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणं, ही काळाची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन असून त्याद्वारे समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळू शकते, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.

****

माथाडी कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्यासाठी लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. मुंबईत आयोजित बैठकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी यासंदर्भातल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये या विषयावर कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कामगारांचं आरोग्य, सुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणी होणारा शारीरिक ताण कमी करण्यासाठी ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळणं आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी व्यापक जनजागृती मोहीमही राबवण्यात येणार आहे.

****

केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्रे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून, बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्याने खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने दोन स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकांनुसार नसलेल्या शीतपेयांचा एकूण एक लाख ५५ हजार रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी-वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान, रिफाइन्ड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदींनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. तर चाळीसगाव इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता, शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले.

****

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या पाच जून रोजी लातूर जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपण मोहिमेसह विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिली. या मोहिमेत शासकीय यंत्रणांसोबत स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन त्यांनी केले आहे. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन, अवैध वृक्षतोड रोखणं आणि ‘एकल वापराच्या प्लास्टिक विरोधी मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले.

****

सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने भूतानचा एक – शून्य असा पराभव केला. भारत सहा वर्षानंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून, विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांग्लादेशसोबत होणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...