Saturday, 27 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पेपरफुटीमुळे उद्याची टीईटी स्थगित; प्रश्नपत्रिका विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक

·      पेपरफुटी प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाईचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

·      शेतकरी कर्जमाफीसंदर्भात परवा २९ जूनला छत्रपती संभाजीनगर इथं निषेध आंदोलन-आमदार रोहित पवार यांचा इशारा

·      शिवराज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा

आणि

·      ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ.सुमंत पांडे यांना “वसंतराव नाईक जलसंवर्धन पुरस्कार” जाहीर

****

उद्या २८ जून रोजी नियोजित शिक्षक पात्रता परीक्षा - टीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरातील एक हजार २८ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. पण, भिवंडी इथं काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याच्या संशयावरून पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली असता, संबंधित व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि नियोजित परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं निदर्शनास आलं.

प्राथमिक तपासात हे आरोपी दिल्लीहून TET परीक्षेचे प्रश्नपत्र घेऊन भिवंडीत आले होते आणि ते सुमारे दीड कोटी रुपयांत विकण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये राजीव शॉ आणि आकाश कुमार या बिहारी तर आणि धीरज सिंह या हरियाणातल्या नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि TET च्या प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त करण्यात आले.

याप्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी ती पुढे ढकलण्यात आली असून, नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं परिषदेकडून कळवण्यात आलं आहे.

****

दरम्यान, पेपरफुटी हा आता अपवाद राहिलेला नसून ही सरकारची ओळख झाली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी सपकाळ यांनी केली आहे.

****

दरम्यान, राज्य सरकार भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर काम करत असून, पेपरफुटी हा प्रकार केवळ गैरव्यवहार नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण करणारा गंभीर अपराध असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशह बोलत होते. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि अधिक सक्षम करणं, हे महायुती सरकारचं ठाम ध्येय असल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. टीईटी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

****

हुतात्मा सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता तसंच कायदेशीर वारसदारांना शेतीसाठी शासकीय जमिनीचं हस्तांतरण करताना यापुढं मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं ही माहिती दिली. दरम्यान महसूल विभागातील कथित घोटाळ्याबाबत काही प्रकरणांमध्ये केवळ तफावत आढळली असून, प्रत्येक तफावत म्हणजे घोटाळा असं म्हणता येणार नसल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं. या प्रकरणाच्या तपासासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.

****

शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी ही फसवी असून त्याविरोधात आपण येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर इथं निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. ते बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या कर्जमाफीतील अटी आणि शर्ती काढून टाकाव्या या मागणीसाठी आपण पंढरपूर इथं अन्नत्याग आंदोलन केलं होतं. अटी आणि शर्ती शिवाय कर्जमाफीचं आश्वासन देऊन योग्य कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

****

यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली, असा हल्लाबोल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. संबंधित व्हिडिओ त्यांनी आज एका जाहीर सभेत ऐकवला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी पक्ष चोरीचा आरोप करत टीका केली.

हिंगोली इथंही ठाकरे आज जाहीर सभेला संबोधित करत आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता ‘मन की बातया कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १३५ वा भाग असून देशातील आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र तसंच न्यूज़ ऑन एआयआर मोबाइल अँपवरही या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे.

****

रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी गडावरील पाणीपुरवठा योजनेला नक्की मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांच्यावतीने रायगड इथं साजऱ्या झालेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात शिंदे आज रायगडावर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. रायगड हा केवळ दगड धोंड्याचा किल्ला नाही तर आपल्या स्वाभिमानाचा कणा असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

****

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं आहे.ते आज बारामती इथं ‘खेत बचाओ अभियानअंतर्गत शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी ठाकूर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचं वितरण करण्यात आलं तसंच नैसर्गिक शेतीचा यशस्वी अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

****

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या विलास घुले खून प्रकरणात एसआयटीच्या पथकाकडून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या केज इथल्या घराची तपासणी केली. या हत्या प्रकरणात फिर्यादी रमेश घुले यांच्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांचे नाव आल्यानंतर, याचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं एसआयटी गठीत करण्यात आली आहे.

****

देगलूर इथले ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. सुमंत पांडे यांना यंदाचा “वसंतराव नाईक जलसंवर्धन पुरस्कार” जाहीर झाला आहे. गेल्या चार दशकांपासून डॉ.पांडे हे जलसाक्षरता, नदी पुनरूज्जीवन आणि शाश्वत जलव्यवस्थापन या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील मन्याड नदीच्या पुनरूज्जीवनासाठी संस्कृती संवर्धन मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने त्यांचे कार्य सुरू आहे. येत्या बुधवारी, १ जुलै रोजी मुंबई इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात सहभाग न घेणाऱ्या महाविद्यालयांना युवक महोत्सवाचा दंड भरल्याशिवाय शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी संलग्नीकरण मिळवता येणार नाही. तसंच प्रवेश प्रक्रियाही राबवता येणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर निर्णय विद्यार्थी विकास मंडळ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत हा दंड माफ केला जाणार नाही, असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यात उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून, सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना पोलिओची मात्रा देऊन मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी केले आहे

****

छत्रपती संभाजीनगर इथले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक संचालक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी वामनराव रामचंद्र पांडे यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. ज्येष्ठ क्रिकेटपटू विद्याधर पांडे, ज्येष्ठ पत्रकार-नाटककार गिरीधर पांडे, बुद्धिबळपटू शशीधर पांडे आणि शिरीष पांडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिव देहावर आज रात्री छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह इतर बाजार समित्यांत आज कांदा दरात सुधारणा झाली. कांद्याचा दरानं तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बाजारात भाववाढ होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

****

राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी २२ पूर्णांक ७३ शतांश टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४२ पूर्णांक १६ शतांश टक्के एवढा होता. छत्रपती संभाजीनगर विभागात २४ पूर्णांक ५२ शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं रविवारी टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वेटरन्स टेबल टेनिस अकॅडमी तसेच टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातून ज्येष्ठ खेळाडूंसह महिला, पुरुष, आणि लहान मुले असे ८० खेळाडू सहभागी होणार आहेत.

****

हवामान

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...