Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 19 June 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जून २०२६ सायंकाळी ६.१०
****
· सैनिकांच्या शौर्याला पूरक ठरेल अशा मजबूत सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनात
वाढ करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांकडून व्यक्त
·
प्रधानमंत्री विकसित
भारत रोजगार योजनेंतर्गत दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं पंतप्रधानांच्या
हस्ते वितरण
·
नीट यूजी फेरपरीक्षेला
बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून व्हॉटसअप संपर्क वाहिनी
सुरु
· अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्ट पर्यंत ‘मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम’ पूर्ण करणं अनिवार्य
आणि
· शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन मागे
****
संरक्षण
दलाच्या सैनिकांच्या शौर्याला पूरक ठरेल अशा मजबूत सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनात
वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात दहा हजार
टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज राजनाथ सिंह यांच्या
हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर च्या यशात मेड-इन-इंडिया उपकरणांनी
बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले -
बाईट – राजनाथ
सिंह
देशाचं
संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी एक लाख ७८ हजार कोटी रुपयांहून अधिक झालं तर
देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातली निर्यात ४० हजार कोटी रुपयांवर
पोहोचली असल्याची माहितीही राजनाथ सिंह यांनी दिली.
नागझरी इथल्या या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच
नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील
वापरले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे ॲल्युमिनियम
एक्सट्रूडेड घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत
स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार असल्याचं ते म्हणाले.
****
प्रधानमंत्री
विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.
देशभरात २०० ठिकाणी,
प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात
हा कार्यक्रम पार पडला. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि
संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान
देणं, अशा दोन भागात ही योजना
राबवली जाणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाचं प्रसारण
दाखवण्यात आलं.
****
पश्चिम
बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
योजनेच्या २३व्या हप्त्याचं वितरण उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या हप्त्यानंतर,
फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून
शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा ४ कोटी ४६ लाखांचा टप्पा ओलांडेल.
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या फौजदारी न्याय व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा
अधिक प्रभावी वापर करण्यावर भर दिला. नवी दिल्लीत आयोजित फिंगरप्रिंट विषयक २६
व्या अखिल भारतीय परिषदेत ते आज बोलत होते.
संविधानाने नागरिकांना दिलेल्या हक्कांचं संरक्षण
करण्यासाठी न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंचलित बोटांचे ठसे ओळखणारी प्रणाली सध्या
केवळ १० टक्के क्षमतेने वापरली जात असून, तिचा अधिक व्यापक वापर करण्याचे निर्देश शहा यांनी दिले.
****
नीट
यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था – एनटीएनं एक अधिकृत व्हॉटसअप संपर्क वाहिनी सुरु केली
आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती ७८ २७ ९८ ०२ ८७ या व्हॉटसअप क्रमांकावर
उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअप वर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास
ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करुन
घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मुंबई
इथं राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन
आज केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. याठिकाणी
बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. तसंच छत्रपती संभाजीनगर
इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी
केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दूरस्थ पद्धतीने त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक
परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना, गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र
बनवण्यात या चाचणी सुविधा महत्त्वाची भूमिका बजावतील,
असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी
यावेळी केलं.
****
राष्ट्रीय
सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम-२०४७ या उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल ॲनिमिया या
आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्यप्रदेशात
ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलत
होत्या. राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारने
केलेल्या काममगिरीचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.
****
आंतरराष्ट्रीय
योग दिनानिमित्त आज मंत्रालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात दिव्यांग योगसाधिका अन्वी विजय
झांझरूकिया हिचा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नुकत्याच
चंदीगड इथं झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातले
विजेते शुभांगी चिकटे,
श्रीकांत घोलकर, दत्तात्राम सावंत आणि जगन्नाथ लांडगे यांचा यावेळी गौरव करण्यात
आला.
****
योग
दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय योग संस्थानच्या वतीने योग दिंडी
काढण्यात आली. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्राप्त व्हावं तसंच समाजामध्ये
योगाबाबत जनजागृती, प्रचार
आणि प्रसार व्हावा या उद्देशाने ही दिंडी काढण्यात आली.
****
योग
दिनानिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं आयोजन
करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथं सकाळी साडे सहा वाजता मुख्य कार्यक्रम
होणार आहे. योग दिनाच्या
पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ही माहिती
दिली. नागरिकांनी या
कार्यक्रमात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
नांदेड
इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शहरातल्या
शिव मंदिर इथल्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात योगाध्यापकांचं प्रात्यक्षिक आणि ‘आरोग्य आणि जीवनशैली’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.
****
राज्यातल्या
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्ट पर्यंत चार तासांचा ‘मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम’
पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र
नसलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाचे
सहआयुक्त रवी गायकवाड यांनी सांगितलं. सर्व चालकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ
घेऊन वेळेत प्रमाणपत्र मिळवावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
बुलढाणा
जिल्ह्यातले शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या चार दिवसांपासून
सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन आज मागे घेतलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री
गिरीश महाजन यांनी बुलढाणा शहरात येऊन आज तुपकर यांची भेट घेतली. महाजन यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठीच्या
मागण्याविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर
तुपकर यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लातूर
जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत तब्बल १२ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त
केला. या कारवाईत अमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ अटक
करण्यात आली. या आरोपींकडून तीन लाख
१८ हजार ५०० रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
****
नांदेडमध्ये इतवारा भागात अन्न आणि
औषध प्रशासनाची कारवाई करत
नऊ लाख ८६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी विक्रेता आणि पुरवठादार अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राज्यात
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल झालेल्या मतदानाची मोजणी येत्या २२ तारखेला होणार
आहे. यासाठी परभणी
जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी निवडणूक निरीक्षक रूचेश जयवंशी यांनी मतपेट्या
ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
घेतला.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं गेल्या तीन महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तीन हजार १९३
वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. आरटीओच्या अत्याधुनिक रडार प्रणालीद्वारे वाहनाचा वेग, लेन बदल, सीट बेल्टचा वापर आणि धोकादायक वाहन चालवणं या संदर्भात ही कारवाई करण्यात
आली.
****
नीट
युजी पुनर्परीक्षा बीड जिल्ह्यात १७ केंद्रांवर होणार असून प्रशासनातर्फे या
परीक्षेसाठी पूर्ण नियोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण पाच
हजार ५६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
****
सामाजिक
न्याय आणि सक्षमीकरण विभागानं अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिजिटल उपक्रम सुरू केला
आहे. शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्याकरता अर्जदारांना आता रहिवासी प्रमाणपत्र
सादर करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांवरील अनुपालनाचा भार कमी करणं आणि अर्ज
प्रक्रिया सुलभ करणं हा या निर्णयाचा उद्देश असल्याचं विभागानं म्हटलं आहे. दरवर्षी अंदाजे एक कोटी दोन लाख विद्यार्थ्यांना या
शिष्यवृत्ती योजनांअंतर्गत लाभ मिळतो.
****
गडचिरोली
पोलीसांनी विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या बापू व्यंकटी जनगम या
नक्षलवाद्याला आज अटक केली. गेल्या अकरा वर्षांपासून पोलिस त्याच्या शोधात होते. बापू जनगम हा नक्षल्यांना मदत करणाऱ्या जनमिलिशिया
संघटनेशी संबंधित होता. आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर
पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment