Wednesday, 10 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जून २०२ दुपारी १.०० वा.

****

भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं.

मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. पंडित नेहरूंनी १३ मे १९५२ रोजी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती आणि २७ मे १९६४ पर्यंत ते या पदावर होते. निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा कार्यकाळ चार हजार ३९८ दिवसांचा होता. २६ मे २०१४ पासून ते आज १० जून २०२६ पर्यंत, पंतप्रधान मोदींचा सलग कार्यकाळ आता चार हजार ३९९ दिवस झाला आहे.

भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा टप्पा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचं आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वानं लोकशाही संस्था, संसदीय परंपरा आणि सुशासन आणि विकसित भारताच्या दिशेने देशाचा प्रवास अधिक मजबूत केल्याचं बिर्ला यांनी म्हटलं आहे.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी देखील पंतप्रधानांचं अभिनंदन केलं आहे.

****

जगभरातूनही पंतप्रधान मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात तसंच ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करण्यात मोदींच्या भूमिकेचं कौतुक केलं.

पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींना आदर्श नेता म्हणत, भारतातील कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केलं.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी भारताला जागतिक मंचावर मजबूत आणि प्रभावशाली आवाज म्हणून उभं करण्यात मोदींच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.

केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. साध्या पार्श्वभूमीतून सुरू झालेला मोदी यांचा प्रवास समर्पण, चिकाटी आणि लोकसेवेला वाहिलेल्या आयुष्याचं उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नायजेरियाचे पंतप्रधान बोला अहमद टिनुबू, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं.

****

देशात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजीचा कोणताही तुटवडा नाही, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. सरकार घराघरांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस अर्थात पीएनजीचा पुरवठा वाढवत असून, एलपीजी कनेक्शनचं पीएनजी कनेक्शनमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर तात्काळ आणि कडक कारवाई केली असल्याचंही पुरी यांनी सांगितलं.

****

विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्याने या विभागातल्या शाळा उशिराने म्हणजे २२ जून रोजी सुरू होतील, असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. यासंदर्भात शिक्षण संचालनालयानं काल एक परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या १५ जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात २२ ते ३० जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील, आणि एक जुलैनंतर नियमित वेळेत भरतील, असं या आदेशात म्हटलं आहे.

****

महागाई, टंचाई, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी काल हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. यावेळी आंदोलकांनी कर्जमाफीच्या शासन आदेशाच्या प्रती दहन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ग्रामीण भागात आरोग्य, स्वच्छता, कृषी आणि पशुसंवर्धन विषयक जनजागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं विद्यार्थी आरोग्यदूत हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातल्या ८०० शाळांमधल्या एक हजार ५०० विद्यार्थ्यांची आरोग्यदूत म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये ९०० मुलींचा सहभाग आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा वन परिक्षेत्रातल्या कोंढवळ बीटच्या महिला वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे यांना १७ हजार रुपयांची लाच स्विकारतांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. तक्रारदाराकडून काटेरी बाभूळ झाडांच्या वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...