Thursday, 4 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी प्रसार भारती आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार

·      मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’म्हणून घोषणा

·      मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष; हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय

आणि

·      मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

****

डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्याच्या पहिल्या ‘महाराष्ट्र क्वांटम धोरण’ आणि ‘महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता देण्यात आली असून, या धोरणांसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

****

मुंबईतल्या मालाड उपनगरात आकाशवाणीच्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसारभारती यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. यासाठी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी स्थापन करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, आतिथ्य, आयटी आणि आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत.

****

राज्याच्या क्रीडांगण विकासासोबतच प्रत्येक क्रीडांगणावर मॉडेल स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाशयोजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. याबाबत कृती आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करण्यासही त्यांनी सांगितलं.

****

मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देशातल्या अकरा राज्यांतून मालाची आवक होत असून, वार्षिक चार लाख मेट्रिक टन मालाची उलाढाल होते. या निर्णयामुळे मुंबई तसंच नागपूर बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार आहे.

****

विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या १७ उमेवारांची अंतिम यादी काल महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. काही बंडखोर उमेदवारांनी यापूर्वी माघार घेतली असून, उर्वरित उमेदवार मुदतीपूर्वी, अर्ज मागे घेतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी काल व्यक्त केला.

****

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणर आहे. या जागेसाठी निवडणूक लढवली गेल्यास १८ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून, आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. न्यायमूर्ती शिंदे समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, पुढील तीन महिन्यांमध्ये गृहभेटी, विशेष शिबिरं आयोजित करुन याची जबाबदारी जिल्हाधिकार्यांवर निश्चित करावी आदी सूचनाही मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार असलं तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची, हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं असंही वडेट्टीवार म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्यावरून सरकारवर टीका केली. ते काल नाशिकमध्ये बोलत होते. ही कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने दहा हजार कोटी रुपयांच्या विमान इंधन किंमत स्थिरीकरण निधीला मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या ७७ लाख नोकऱ्यांचं संरक्षण होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

नवी दिल्लीत एका रेस्टॉरन्टला लागलेल्या आगीत २१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमधे बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून दोन दिवसीय ’एज्युकेशन एक्स्पो-प्रज्ञावेध-२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. ‘ओपन डे’च्या माध्यमातून विद्यापीठाच्या क्षमतांचं दर्शन होईल, असं प्र–कुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. या प्रज्ञावेधसाठी नवीन नाट्यगृहात ६० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी मुख्य कॅम्पसमधले ४५ विभाग, तसंच धाराशिव उपपरिसरातल्या १० विभागांची दालनं असतील. सकाळी १० ते ६ या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन विद्यापीठ व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, ‘एज्युकेशन एक्स्पो’च्या आयोजनासंदर्भात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली काल विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठकही घेण्यात आली.

****

संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी विहिरी, हातपंप तसंच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर ‘जलतारा खड्डे’ तयार करावेत असे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुढील वर्षासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

हिंगोली जिल्ह्यात एक जून पासून "शेत वाचवा अभियान" राबवण्यात येत आहे. "सुदृढ मृदा – समृद्ध पीक – आनंदी शेतकरी" ही या अभियानाची संकल्पना आहे. जिल्ह्यातल्या मातीत फॉस्फरसचं प्रमाण पुरेसं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकांसाठी 'डीएपी' खताचा अवाजवी वापर थांबवावा. त्याऐवजी पीएसबी आणि प्रति हेक्टरी ५ टन शेणखताचा वापर करावा असा सल्ला हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक पी. पी. शेळके यांनी दिला आहे.

****

बीड जिल्ह्यात माजलगांव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे चारशेहून अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

****

अन्न औषध प्रशासन विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी आणि नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम तसंच खाद्यतेल जप्त केलं. राहुरी इथं शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीमचे ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पाकीटं, तर नेवासा इथं एसबीजी ब्रँडचं सुमारे अडीच लाख रुपयांचं दीड हजार किलो रिफाइंड पामोलीन खाद्यतेल जप्त करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगरमध्येही गजानन नगर इथल्या प्रसन्ना डेअरीतून १८ हजार रुपयांहून अधिक किंमतीचं तूप जप्त करण्यात आलं.

****

बेकायदेशीर मद्यविक्रीविरोधात लातूर जिल्हा पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर छापेमारी करुन, तीन लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी काल एकाच दिवसात आठ गुन्हे दाखल करण्यात आले.

****

जागतिक सायकल दिनानिमित्त काल परभणी शहरात सायकल फेरी काढण्यात आली. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

हिंगोली शहरात पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या वतीने काल भव्य सायकल रॅली काढण्यात आली. 'सायकल चालवा, भविष्य घडवा', 'पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा', अशा घोषणा रॅलीत दरम्यान देण्यात आल्या.

****

हवामान

राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी, धाराशिव आणि बीड इथं सरासरी ३९, छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक नऊ, तर नांदेड इथं ३७ पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, मराठवाड्यात बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...