Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
मोदी
सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासात गुणात्मक बदल झाले असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला १२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त
त्यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारने
केलेल्या मदतीमुळे राज्यात झालेल्या विविध सुधारणांचा त्यांनी आढावा घेतला. केंद्र
सरकारने महाराष्ट्राला सिंचनाचं विशेष पॅकेज दिलं, त्या माध्यमातून १०० पेक्षा अधिक
प्रकल्प पूर्ण झाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
१२ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी,
विविध रस्त्यांचे प्रकल्प, वाढवण बंदर आदींचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला.
यंदा
अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण कमी राहणार असून, त्या संदर्भात सरकार तयारी
करत असून, जलसंधारणाची कामं पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं. दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शेतकर्यांनी कृषी विभागाच्या सूचनेनंतरच
पेरणी करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्र सरकारला १२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातल्या
स्त्री शक्तीचा विकास यासंदर्भात विविध क्षेत्रातल्या महिलाशक्तीच्या वाढत्या सामर्थ्याचं
महत्त्व अधोरेखित केलं. गेल्या १२ वर्षांत सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला
चालना देण्यासाठी सातत्याने काम केलं असून, याचे सकारात्मक परिणाम आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये
स्पष्टपणे दिसून येत असल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आर्थिक
साक्षरता आणि उद्योजकतेपासून ते शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, गृहनिर्माण, क्रीडा,
विज्ञान आणि प्रशासनापर्यंत महिला विविध क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत
असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकार स्वयं-सहायता गटांना सक्रियपणे पाठिंबा देत आहे,
जे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं.
****
वाढत्या
मागणीवर आणि इंधनाच्या काळाबाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी, सरकारने औद्योगिक, व्यावसायिक
आणि संस्थात्मक ग्राहकांना किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास
मनाई केली आहे. या ग्राहकांना आता केवळ अधिकृत घाऊक केंद्रांमधूनच इंधन खरेदी करावं
लागेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे
निर्बंध पुढील ९० दिवसांपर्यंत लागू राहतील.याशिवाय, मोठ्या प्रमाणावर होणारी इंधन
खरेदी रोखण्यासाठी किरकोळ पेट्रोल पंपांना प्रति ग्राहक दररोज जास्तीत जास्त २०० लीटर
हाय-स्पीड डिझेल विकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्ही, रेडिओ आणि संबंधित सेवांशी निगडित 'खरेदी-विक्री आणि
सेवा नियमन' अधिक सुटसुटीत करण्यासाठी दूरसंचार नियम २०२६ चा मसुदा जाहिर केला आहे.
हे प्रस्तावित नियम सध्याची व्यवस्था अधिक सोपी आणि सुसंगत बनवण्यासाठी तसंच टीव्ही
आणि रेडिओ प्रसारण क्षेत्रात 'व्यवसाय सुलभतेला' चालना देण्यासाठी तयार केले असल्याचं,
मंत्रालयाने म्हटलं आहे. हा मसुदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर
उपलब्ध करून देण्यात आला असून, नागरिक २७ जुलैपर्यंत यावर आपल्या हरकती आणि सुधारणांचे
प्रस्ताव सादर करू शकतात, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताचे
प्रख्यात नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले माजी सुवर्णपदक विजेते जसपाल
राणा यांचं दिल्लीत निधन झालं, ते ४९ वर्षांचे होते. जर्मनीत म्युनिक इथं झालेल्या
'आयएसएसएफ' विश्वचषकानंतर भारतीय पथक परतत असताना त्यांची प्रकृती बिघडली, नवी दिल्लीत
उतरल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं
निधन झालं. राणा हे भारतीय पिस्तूल नेमबाजांचे 'हाय-परफॉर्मन्स कोच' म्हणून कार्यरत
होते.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. नेमबाजी क्षेत्रातील
आपल्या असामान्य कामगिरीद्वारे राणा यांनी देशाला अनेक गौरवशाली क्षण दिले. उत्कृष्टता,
शिस्त आणि क्रीडा क्षेत्रातील सेवाभाव यांप्रती त्यांची अखंड निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी
राहील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
धुळ्यातील
शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन इथं उभारण्यात आलेल्या तीन कोटी रुपये
किंमतीच्या ड्रोन लॅबचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या
पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयांमधली ही पहिली अत्याधुनिक ड्रोन लॅब असून, महाविद्यालयातल्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतल्या विद्यार्थ्यांसाठी ही लॅब मोठी संधी ठरणार
असल्याचा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.
****
तुर्कीमधील
अंताल्या इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय रिकर्व्ह मिश्र जोडी
बी. धीरज आणि कुमकुम मोहद यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केलं आहे.अंतिम
फेरीत धीरज आणि कुमकुम यांचा सामना येत्या १४ तारखेला कोरियन जोडीशी होणार आहे.
****
ऑस्ट्रेलियन
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुने उपान्त्य फेरीत प्रवेश
केला आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधुने चायनीज तैपेईच्या खेळाडुचा
२१–६, २१–९ असा पराभव केला.
उपान्त्य फेरीत सिंधुचा सामना जपानच्या अकाने यामागुची सोबत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment