Monday, 8 June 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      १५ जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार, पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन

·      राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर

·      घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ

·      नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

आणि

·      धाराशिव जिल्ह्यात १३ पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश

****

नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं, तरी १५ जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून, दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं त्यांनी सांगितलं.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काल रात्री पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे २०१० साली भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते.

****

स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कालपासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली. गेल्या तीन महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९१२ रुपये ५० पैशांवरून ९४१ रुपये ५० पैसे झाली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलिंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त असल्याचं, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.

****

२१ जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा राष्ट्रीय चाचणी संस्था – एनटीएने फेटाळला आहे. विद्यार्थी आणि पालकांमधल्या तणावाचा गैफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं संस्थेनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित आहे, उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी, यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून, संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल, असंही संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.

****

कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनात सात हजार नागरिक सहभागी झाल्याचा आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केलेलं हे आंदोलन ते राजीनामा देईपर्यंत सुरूच राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचंही दिपके यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाजीनगर इथल्या घरी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

****

राज्यात प्रतिबंधित गुटखा पानमसाला आणि अश्या प्रकारच्या पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली आहे. एक ते पाच जून दरम्यान राज्यभर टाकण्यात आलेल्या, १९५ धाडीत, १९२ जणांना अटक करण्यात आली असून, सुमारे एक कोटी ९९ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी विभागाकडून राज्यभर कठोर कारवाई सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. 

****

गोव्यात मडगाव इथं झालेल्या सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताने विक्रमी सहावं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने गतविजेत्या बांगलादेशचा ३-१ असा पराभव केला.

या विजयाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे.

****

चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने मजबूत पकड निर्माण केली आहे. सामन्याच्या काल दुसऱ्या दिवसाअखेर अफगाणिस्तानने ५ बाद ११३ धावा केल्या असून, संघ अद्याप भारताच्या पहिल्या डावापेक्षा ४५१ धावांनी मागे आहे. यापूर्वी भारताने पहिल्या डावात आठ बाद ५६४ धावा केल्या होत्या. काल भारताकडून मानव सुथारने तीन तर प्रसिद्ध कृष्णाने दोन गडी बाद केले.

****

धाराशिवमध्ये काल ‘संडे ऑन सायकल’ या अभियानांतर्गत सायकल फेरी काढण्यात आली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. चंद्रजित जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात झाली.

****

छत्रपती संभाजीनगरचे युवा लेखक ऋषिकेश गोल्हार यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला ‘कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार, मिळाला आहे. वाशीम मधल्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. वाशीम जिल्ह्यातले ग्रामीण कथा, कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला आहे.

****

बीड इथल्या दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी प्रियाराणी पाटील यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या निराकरणाबाबत जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन न केल्यामुळे हे आदेश देण्यात आले. 

****

छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महागाई विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

****

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतिची होळी करून बीड जिल्ह्यात खांडे पारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत, यामुळे ८० ते ९० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटीशर्ती काढून टाकाव्यात, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे.

****

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या आणखी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे पाच कोटी रुपये किमतीचं तीन किलो सोनं विभागाने जप्त केलं. या प्रकरणात तीन बांगलादेशी आणि श्रीलंकन ट्रान्झिट प्रवासी, विमानतळावरचे तीन कर्मचारी तसंच एक सोनार अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी सोनं स्वतःच्या शरीरात लपवून भारतात आणल्याचं समोर आलं आहे, तसंच विमानतळावरील काही कर्मचाऱ्यांनी हे सोनं वितरणासाठी विमानतळाबाहेर नेण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

****

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव, कळंब, भूम, वाशी आणि परंडा तालुक्यातल्या १३ पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केले आहेत. याशिवाय परिसरातल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही विचार करून संबंधित प्रकल्पांतलं उपलब्ध पाणी राखीव ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. उपलब्ध जलसाठा अधिकाधिक काळ टिकून राहावा आणि नागरिकांना दीर्घकाळ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

****

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी काल नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला होता.

हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. वसमत तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वसमत - नांदेड मार्गावरील निळा जवळ विद्युत टॉवर पडल्याने वसमत - आसेगाव मार्ग सायंकाळ पर्यंत बंद होता.

****

येत्या दोन दिवसांत कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...