Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या सहा दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
यावेळी मोदी म्हणाले की, सामरिक दृष्टिकोनातून फ्रान्स भारतासाठी विशेष महत्त्वाचा
आहे. भारत आणि फ्रान्समधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे हा या दौऱ्याचा
मुख्य उद्देश आहे. मोदी उद्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत
'इंडिया इनोव्हेट्स समिट'चे उद्घाटन करतील.
****
आंतरराष्ट्रीय
योग दिन निमित्त आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात
येत असून, योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या
उद्देशाने उद्या १४ तारखेला ऑनलाइन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र
सकाळी सव्वा सहा ते सव्वा सात या कालावधीत होणार असून, या उपक्रमाद्वारे ‘गिनीज वर्ल्ड
रेकॉर्ड’प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त
करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नि:शुल्क क्रमांक १८००-३१५-७००८ वर
मिस्ड कॉल देऊन पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे.
धाराशिव
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी, खेळाडू तसंच शाळा, महाविद्यालयं आणि
शासकीय आणि खाजगी आस्थापनांमधील अधिकारी-कर्मचारी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने
सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात
समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका अपघातात सात वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
आहेत. जालना येथील रहिवासी सुशील गाडगे हे पत्नी आणि तीन मुलांसह मुंबईहून जालन्याकडे
प्रवास करीत होते. ते खासगी ट्रॅव्हल्सने समृद्धी महामार्गावरून येत असताना, टोल नाक्यापूर्वी
काही अंतरावर ते ट्रॅव्हल्समधून उतरले. गाडगे कुटुंबीय महामार्गावर उभे असताना पाठीमागून
भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात गौरी सुशील गाडगे हिचा जागीच
मृत्यू झाला. तर सुशील गाडगे यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाली आहेत.
****
बीड जिल्हा
पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी
मोहीम उघडली असून, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी येथे एका घरावर
छापा टाकून २० किलो ३४० ग्रॅम वजनाचा, सुमारे ९ लाख ७७ हजार ३२० रुपये किमतीचा गांजा
जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
शेतीची
मशागत करताना रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील
साळेगावमधील ३२ वर्षीय शेतकरी मंगेश बाबुराव टोपे यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
लातूर इथल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. १० दिवसांपूर्वी शेतात
रोटाव्हेटर सुरू असताना त्यात अडकलेला ठिबक सिंचनाचा पाईप काढण्याचा प्रयत्न करत असताना
ते थेट फिरत्या रोटाव्हेटरच्या पात्यांवर पडून ते गंभीर जखमी झले होते.
****
अकोला जिल्ह्यातील
अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी ७/१२ उताऱ्याची अट प्रशासनाने रद्द केली असून, केवळ
आधार कार्डवर आता खत मिळणार आहे. सुरुवातीला
प्रशासनाकडून केवळ आधार कार्डच्या आधारे युरिया वितरण करण्यात येत होतं. मात्र, अशा
पद्धतीने खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यानंतर
प्रशासनाने आधार कार्डसोबत ७/१२ उतारा सादर करणे बंधनकारक केलं होतं. मात्र, अनेक शेतकऱ्यांना
७/१२ उतारा सादर करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला
प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश जारी करत ७/१२ उताऱ्याची
अट रद्द करण्याचा निर्णय घेतला.
****
आसाममधील
जोरहाट येथील रौरिया विमानतळावर भारतीय हवाई दलाचे AN-32 हे विमान कोसळले. सूत्रांच्या
माहितीनुसार, विमान नियोजित धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरण्यात अपयशी ठरले आणि ते गवताळ,
असमान भागावर उतरले. उतरताना मोठा स्फोट झाल्यानंतर विमानाला आग लागली आणि त्याचे दोन
तुकडे झाले.
****
भारत आणि
अफगाणिस्तान दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना
आज धरमशाला इथे होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतील
इतर दोन सामने लखनौ आणि चेन्नई इथं होणार आहेत.
****
अमेरिकेने
फिफा विश्वचषक सामन्यात पॅराग्वेला ४-१ ने पराभूत करून विजयी सुरुवात केली. कॅलिफोर्नियातील
सोफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्ट्रायकर फोलारिन बालोगुनने सामन्याच्या
पहिल्या सत्रात दोन गोल करून अमेरिकेला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पॅराग्वेसाठी,
बदली फुटबॉलपटू मॉरिसिओने एक गोल केला. या गटातील दुसरा सामना आता तुर्कस्तान आणि ऑस्ट्रेलिया
यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेतल्या ब गटातील सामन्यात कॅनडाने बोस्नियाशी १-१
अशी बरोबरी साधली.
****
No comments:
Post a Comment