Thursday, 11 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 11 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या २२ टक्के, २५ टक्के, २७ टक्के आणि ३०टक्के इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. अमेरिकन लष्कराने इराणमधल्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला असून, इराणच्या आक्रमक कारवायांना प्रत्यूत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराबाबत इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासांत ही लष्करी कारवाई करण्यात आली.

दरम्यान, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली असून, तेथून जाणाऱ्या जहाजांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. इराणच्या वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, सिरिक, कंगन, बंदर अब्बास आणि मिनाब परिसरात स्फोट झाले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये पाणीपुरवठा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही इराणने केला आहे. या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे तीन डॉलर्सची वाढ होऊन त्या ९४ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.

****

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास अडीचशे एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं, काल क्लीव्हलँड ओहोयो इथं राज्य सरकार, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून सहभागी झाले होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष २०२४ आणि २०२५ साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्करांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक, लोककला, आदिवासी कला आणि बाहुलीनाट्य यांसारख्या विविध क्षेत्रांतल्या १०८ कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कारांसाठी १०६ युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातले कथक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारूडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे.

****

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल आठ जणांचा बुडून मृत्यु झाला. बीड जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्र पुरुषोत्तम पुरी इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये ३५ भाविक होते. त्यापैकी दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला.

गोंदिया जिल्ह्यत तिरोडा तालुक्यातल्या बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या नऊ तरुण मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौकाविहार करताना ही घटना घडली. यापैकी सात तरुणांना वाचवण्यात यश आलं. अधिकृत जल पर्यंटनासाठीच्या नौकेचा वापर न केल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून तीन भावंडाचा मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुट्टीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. एका तरुणाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं.

अन्य एका घटनेत रायगड जिल्ह्यात काशिद समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. हे दोघे जळगाव जिल्ह्यातले होते.

****

जम्मू-काश्मीरमधल्या उरी सेक्टर इथं नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी नऊ जून रोजी झालेल्या भीषण अपघाती स्फोटात नवी मुंबईतल्या ऐरोली इथले सैनिक विक्रम चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातले सैनिक अर्जुन जाधव यांना वीरमरण आलं. कमलकोट इथं गस्तीवर असताना झालेल्या एका कारवाईमध्ये हॅन्ड ग्रेनेडचा स्फोट होऊन, ही दुर्घटना घडली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...