Wednesday, 17 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 17 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

फ्रान्स मधील एव्हीयन शहरात सुरू असलेल्या 52व्या जी-सात परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत ‘नवीन भागादारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुर्नस्थापना’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रा दरम्यान पंतप्रधानांनी, आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या सूत्रावर आधारित आहे असंही त्यांनी सांगितलं. G7 शिखर परिषदेत, भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा करण्यात आली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यात सहभागी देशांनी पुनरुच्चार केला.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव, पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत.

तत्पूर्वी ते, रांजणगाव इथं जबील कंपनी, इको बॉक्स इंडस्ट्रियल पार्क आणि रांजणगाव गणपती एम.आय. डी. सी. ला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं वैष्णव यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

****

येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट-युजी  फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाइटच्या वापरावर २२ तारखेपर्यंत निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ॲपवर झळकत आहेत; त्यामुळे एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये, असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

****

दरम्यान नीट-युजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील २६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

****

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येत्या २१ तारखेला म्हणजे रविवारी, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बिबी का मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल, या दोन ठिकाणी, सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात सामूहिक योगासनांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’, ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे.

****

महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे तसेच वीज वापराचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे कसे करता येते याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग-दोन याठिकाणी काल हे मेळावे पार पडले तर, खुलताबाद, सावंगी, चौका, सिद्धनाथ वाडगाव, वडोदबाजार, हतनूर, महालगाव, गारज, पिशोर, भवन, शिवना, अजिंठा, आमठाणा या गावांसह सिल्लोड शहरातील बालाजीनगरात आज मेळावे घेण्यात येणार आहेत. तसंच उद्या पैठण, कानडगाव, गदाना, परसोडा, खंडाळा, नागापूर इथं तर शुक्रवारी गोळेगाव, डोंगरगाव, कासोद इथं ग्राहक समाधान मेळावे घेण्यात येणार आहेत.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात, गतविजेत्या अर्जेंटिनाने अल्जेरियाचा ३-० ने पराभव केला. या सामन्यात लिओनेल मेस्सीने हॅट-ट्रिक साधत इतिहास रचला. मेस्सीने विश्वचषकात सर्वाधिक १६ गोल करत जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोझच्या विक्रमाची बरोबरी केली. आज सकाळी, अमेरिकेतील बॉस्टन स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात 'आय' गटातील नॉर्वेने इराकचा ४-१ ने पराभव केला. काल रात्री, न्यू जर्सीमध्ये फ्रान्सने सेनेगलचा ३-१ ने पराभव केला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 17 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...