Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 June 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जून २०२६ सायंकाळी
६.१०
****
· विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, ९७ हजार ७०६
कोटी ४० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
· विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर,
दहा जागांवर महायुतीला यश
· शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांचा एकनाथ
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश
· नीट फेरपरीक्षेचा पेपर फुटला नाही- एनटीएचं स्पष्टीकरण,
समाजमाध्यमांवर अफवा पसरणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा
आणि
· पश्चिम महाराष्ट्रासह
मराठवाड्यात मान्सूनची आगेकूच
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली.
कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य
सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२६-२७ च्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध
भागांत पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी
सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी
दिलं.
दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी
मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव
धोटे, बळीराम कोटकर-पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव
सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहाने
श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित
सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन २०२६-२७ साठीच्या पुरवणी
मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी
प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित
वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. पद्मविभूषण आशा
भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना
श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात
आलं.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकंदर ९७ हजार ७०६
कोटी ४० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर
करण्यात आल्या. यात सर्वाधिक, २०
हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली
आहे. त्याखालोखाल १० हजार ७ कोटी १० लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून
राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी
केली आहे. विकसित भारत जी-राम-जी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा ७ हजार ३६७
कोटी ३२ लाख रुपये इतका आहे, तर
सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी ३ हजार कोटी रुपयांच्या निधीची
तरतूद आहे. सहकार, पणन
आणि वस्त्रोद्योग विभागाच्या २२ हजार १५ कोटी ४२ लाख, नगर विकास विभागाच्या १५ हजार १५२ कोटी ४३ लाख, तर उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या १४ हजार ७६० कोटी ४८ लाख
रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे.
दरम्यान, आजच्या पुरवणी मागण्यांमध्ये परभणी जिल्ह्यातील
पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यासाठी ४२० कोटी रुपयांचा निधी मंजूर
करण्यात आला आहे. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी ही माहिती दिली.
****
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल
आज जाहीर झाले. अकरापैकी दहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या
एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर सहा जागांवर महायुतीचे उमेदवार याआधीच बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे
निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत १७ पैकी १६ जागा जिंकत
महायुतीनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.
निवडून आलेल्यांमध्ये, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेड अमरनाथ राजुरकर, लातूर-बीड-धाराशिव
बसवराज पाटील, परभणी-हिंगोली शिवसेनेचे
सईद खान, सांगली सातारा धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर
राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर
नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोतदार यांनी विजय मिळवला.
नाशिक मतदारसंघातून शिवेसेनेचे नरेंद्र दराडे यांना
पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते हे अपक्ष
म्हणून तिथून निवडून आले आहेत.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या ६ खासदारांनी आज एकनाथ
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. संजय देशमुख, संजय जाधव, नागेश
पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज एकनाथ शिंदे
यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी
सर्वतोपरी सहकार्य करेल, असं शिंदे याप्रसंगी म्हणाले.
बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
****
दरम्यान, माजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून तीन दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव
आणि शिर्डी या लोकसभा मतदार संघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातील खासदारांनी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
****
नीट फेरपरीक्षेचा पेपर फुटल्याचं वृत्त एनटीए, राष्ट्रीय
चाचणी संस्थेनं फेटाळलं आहे. नीट फेरपरीक्षा २०२६ चा पेपर टेलिग्राम या समाजमाध्यमावर
परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त
वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अफवा पसरणाऱ्या व्यक्तींविरोधात
कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने
या प्रकाराचा तपास सुरु आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या (www.neet.nta.nic.in)
या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं
आहे.
****
राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या
दुरुस्ती तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पाच
जुलै पासून राळेगणसिद्धी इथं उपोषण करणार आहेत. या संदर्भात अण्णा हजारे यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. १२ जून २०२६ रोजी काढलेल्या
आदेशानुसार माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदीत दुरुस्त्या आणि बदल करण्यात आला
आहे. या दुरुस्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी अण्णा हजारे उपोषण
करणार आहेत.
****
बीड इथं आज समाजकल्याण आयुक्त पुणे दीपा मुधोळ-मुंडे यांनी
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारण्यात येत असलेल्या संत भगवानबाबा मुलांच्या
शासकीय वसतीगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून कामाच्या प्रगतीबाबत
सविस्तर माहिती घेतली तसेच काम वेळेवर पूर्ण करण्याची सूचना केली.
****
जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता कायम आहे, त्यामुळे
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शाळा उद्यापासून
सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात
दिशा-निर्देश जारी केले.
****
शेगाव इथून प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या
पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. यावेळी भाविकांनी पालखीचं
उत्साहात स्वागत केलं. यंदा श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं ५७ वं वर्ष
असून या पालखीमध्ये सुमारे ७०० वारकरी सहभागी झाले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच जणांचा गणपतीपुळे येथील
समुद्रामध्ये बुडून शनिवारी मृत्यू झाला. या पाचही जणांचे मृतदेह आज बिडकीन इथं
आणले. या पाचही जणांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राजपत्रित नागरी सेवा संयुक्त
पूर्व परीक्षा
अर्थात राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज प्रसिध्द केला आहे. ३१ मे
रोजी ही पूर्व परीक्षा घेण्यात आली
होती. विविध संवर्गातील उमेदवारांसाठीच्या
गुणांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
****
हवामान
नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली
आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग, तसंच
मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रीय झाला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
पुढील काही तासांत जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं
व्यक्त केला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना
जिल्ह्यांत उद्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment