Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29 June 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २९ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या
साडे तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करुन तीची हत्या केल्या प्रकरणी आरोपी भिमराव
कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने गेल्या २५
तारखेला त्याला दोषी ठरवलं होतं. या प्रकरणात आरोपीने केलेला
गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि ‘दुर्मिळातील
दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. आरोपीविरोधात सादर
करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत, केवळ वय हा शिक्षेत सवलत
देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि
मंडळांच्या शाळांना पहिली ते दहावी दरम्यान मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असून,
याच्या अंमलबजावणीची तपासणी विशेष मोहिमेद्वारे करण्यात येईल आणि
तसं आढळून न आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं. शाळांमध्ये
मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही, असा प्रश्न
विरोधकांकडून विचारण्यात आला होता. शालेय अभ्यासक्रमात
थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची
माहिती देणारं नवं पुस्तक समाविष्ट केलं जाईल, अशी माहितीही
भुसे यांनी दिली.
राज्यात अवैध सावकारी
प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून साडे ११ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. ८३०
हेक्टर पेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून, ५४९
गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.
राज्यात १२ हजार २११ नोंदणीकृत सावकार आहेत आणि त्यांनी साडे पाच लाखापेक्षा अधिक जणांना सुमारे तेराशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप केल्याची माहितीही त्यांनी दिली.
टीईटी पेपर फुटीच्या मुद्यावरून
विरोधकांनी आज विधानसभेत सभात्याग केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
या विषयावरचा विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला
आणि सरकारला योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून, आजच सविस्तर निवेदन करण्यात येईल, अशी माहिती
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. पेपरफुटीशी सरकारचा थेट संबंध आहे, अशी चर्चा असल्याचं सांगत, सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी, अशी मागणी
सदस्य भास्कर जाधव यांनी केली. टीईटी वरून शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना
निर्माण झाली आहे, या पेपरची छपाई परराज्यात का केली, असा प्रश्न सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुसऱ्या टप्प्यातले शौर्य पुरस्कार प्रदान करणार आहेत. सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच राज्ये आणि
केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलीस दलातल्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
जम्मू-काश्मीरमधली अमरनाथ यात्रा तीन
जुलैपासून सुरू होत आहे. या यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, यात्रेला अधिकृत प्रारंभ होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था, यात्रेकरूंच्या ताफ्याची वाहतूक आणि एकूणच तयारीचा आढावा घेण्यात आला असल्याचं,
आकाशवाणीच्या जम्मू वार्ताहराने कळवलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या
सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांच्यासह इतर
मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या सहाव्या टप्प्यामध्ये २५ हजार ८२३ शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या
खामगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्या
मंगला गुरव यांनी आज
वटसावित्री पोर्णीमेच्या मुहुर्तावर
एक महिला एक झाड
ही मोहीम राबवली. या माध्यमातून
त्यांनी अनेक महिलांच्या हस्ते
बोर्डी नदीच्या तीरावर
वडाच्या झाडाची लागवड
केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर
विदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ,
उंबर, चिंच, जांभूळ, करंज आणि
कडुनिंब यांसारख्या देशी
वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन
त्यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जालना रस्त्यावर केंब्रिज चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह
काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे
खासदार डॉ. कल्याण काळे,
आमदार रोहित पवार याठिकाणी उपस्थित आहेत.
****
अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांत याने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत श्रीकांतने जपानच्या युदाई ओकिमोतो याचा २२-२०, १५-२१, २१-१९ असा
पराभव केला. अंतिम सामन्यात श्रीकांतची लढत चायनीज
तैपेईच्या सु ली यांग याच्याशी होणार आहे.
दरम्यान, महिला एकेरीत भारताची देविका
सिहाग हिला उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफरसेन हिच्याकडून पराभव स्वीकारावा
लागला आणि तिचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
****
No comments:
Post a Comment