Thursday, 4 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण- राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      बालविवाहमुक्त भारतासाठी शंभर दिवसांच्या राष्ट्रीय अभियानाचं उद्घाटन

·      देशात यंदा ३१५ लाख टन साखर निर्मितीचा राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचा अंदाज

·      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

आणि

·      २७व्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाला नांदेड इथं प्रारंभ

****

राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही भारतीय नौदल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज नौदल दिनानिमित्त, समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी नौदलाचं कौतुक करत, सागरी सीमांच्या सुरक्षेपासून समुद्रातल्या आव्हानात्मक बचाव मोहिमा राबवण्यापर्यंत, भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं.

 

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात, भारतीय नौदल म्हणजे, देशाची सागरी शक्ती, सतर्कता आणि राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचं मूर्तिमंत प्रतिक असल्याचं, म्हटलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात, आयएनएस विक्रांत या युद्ध नौकेवरील तैनात जवान आणि अधिकाऱ्यांसोबत साजरी केलेली दिवाळी अत्यंत संस्मरणीय असल्याचं सांगत, या शब्दांत नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या…

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नौदल दिनानिमित्त नौ सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं पश्चिम विभागाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राहुल गोखले यांनी गौरव स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

बालविवाहमुक्त भारतासाठी शंभर दिवसांच्या सखोल जागरुकता राष्ट्रीय अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री अन्नपूर्णादेवी यांनी नवी दिल्लीत या अभियानाच्या पहिल्या वर्धापनदिनी, या मोहिमेचं उद्घाटन केलं. बालविवाह प्रथेचं समूळ उच्चाटन करण्यासाठीच्या कटिबद्धतेची शपथही यावेळी उपस्थितांना देण्यात आली. पुढच्या पाच वर्षांत देश बालविवाहमुक्त करण्याचं उद्दीष्ट सरकारने निर्धारित केल्याचं अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं. वर्षभर चालणाऱ्या या अभियानांतर्गत देशभरातल्या शैक्षणिक संस्था तसंच पंचायतींमध्ये प्रबोधनपर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

****

देशभरातल्या विमानतळांची संख्या गेल्या ११ वर्षांत ७४ वरून १६४ झाली आहे. नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. २०२४-२५ या वर्षांत देशातल्या सुमारे २४ कोटींहून अधिक नागरिकांनी देशांतर्गत तसंच देशाबाहेर जाण्यासाठी विमान प्रवास केल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

****

देशातल्या इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाची उलाढाल पुढच्या पाच वर्षांत २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असं केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. सध्या देशात ५७ लाख इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी झाल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. देशभरात या वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी पीएम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत दोन हजार कोटी रुपये निधी वितरीत केल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

****

जल जीवन अभियानांतर्गत १५ कोटींहून अधिक घरांना नळाच्या पाण्याची जोडणी देण्यात आल्याचं जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

****

देशात यंदा ३१५ लाख टन साखर निर्मितीचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं वर्तवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्रेपन्न लाख टन जास्त उत्पादन होणार आहे. अतिरिक्त साखर गोदामात पडून राहू नये यासाठी १० लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी, साखर महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे.

****

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. पूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत चालू आर्थिक वर्षात चार हजार ३५९ लाभार्थ्यांना ८८ कोटी रुपयांहून अधिक मदतीचं वाटप झालं आहे.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे.  सर्व आवश्यक सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी सुमारे आठ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात असून, चैत्यभूमीतल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यांवर, तसंच विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा औद्योगिक परिसरातल्या ऑरिक सिटी मैदानावर, उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा होणार आहे.

****

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ चं आयोजन करण्यात आलं आहे.  येत्या आठ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान ऑरिक सिटीमध्ये हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे. संघटनेचे उपाध्यक्ष राहुल  मोगले यांनी यासंदर्भात महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक विभागाचे निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांची भेट घेतली. या प्रदर्शनामुळे मराठवाड्यात नव्या गुंतवणुका, रोजगार संधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या संधी उपलब्ध होणार असून, औद्योगिक क्रांतीला चालना मिळेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. या चार दिवसीय प्रदर्शनात हजारो उद्योजक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.

****

सत्ताविसाव्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ला नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आजपासून सुरुवात झाली. राज्यभरातील २४ विद्यापीठांच्या संघांनी या महोत्सवात सहभाग घेतला आहे. कबड्डी क्रीडा प्रकारात आज चुरशीचे अनेक सामने खेळवण्यात आले. खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस तसंच बॅडमिंटनचे रोमांचक सामनेही आज पहायला मिळाले.

****

दत्तजयंती सोहळा आज साजरा होत आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूरगडावरच्या दत्तमंदिरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. इतरही सर्वच ठिकाणच्या दत्तमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.

दत्तजयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्तमंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. या परिसरात आज भरणारा घोडे बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे.

****

अहिल्यानगर-बीड डेमू रेल्वेचं सुधारित वेळापत्रक येत्या आठ डिसेंबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार ही गाडी अहिल्यानगरहून सकाळी पावणे आठ वाजता निघेल, तर बीडहून दुपारी एक वाजता निघेल. दरम्यान, बीड-परळी रेल्वेमार्गावर, बीड ते वडवणी दरम्यान परवा सहा तारखेला इंजिन चाचणी होणार आहे. यावेळी नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन रेल्वे विभागाने केलं आहे. या चाचणीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून १० आणि ११ डिसेंबरला सखोल तपासणी आणि हाय-स्पीड चाचण्या घेण्यात येणार आहेत.

****

लातूर महानगरपालिकेनं मालमत्ताकर वसुली साठी आता थेट धडक जप्ती मोहिमेला सुरवात केली आहे. त्याकरिता आठ पथकं नेमण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मालमत्ताधारकांनी मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यामूळे थकबाकीदारांनी कर भरणा करण्याचं आवाहन महानगरपालिका आयुक्त मानसी यांनी केलं आहे.

****

राज्यात आज सर्वात कमी १० पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव इथ अकरा पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव इथं १२ पूर्णांक दोन अंश, छत्रपती संभाजीनगर इथं १३ पूर्णांक दोन, बीड इथं १३ पूर्णांक नऊ तर परभणी इथं १४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: