Monday, 15 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 15 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या दौऱ्यार्साठी आज जॉर्डनला रवाना झाले. अम्मान इथं ते जॉर्डनचे राजा अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसेन यांच्यासोबत द्विपक्षीय आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चा करणार असून, भारत–जॉर्डन बिझनेस फोरमला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून, ऐतिहासिक पेट्रा शहरालाही भेट देण्याची शक्यता आहे. भारत–जॉर्डन राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्षानिमित्त ही भेट होत असून, गेल्या ३७ वर्षांत भारतीय पंतप्रधानांची ही पहिली पूर्ण द्विपक्षीय भेट आहे. व्यापार, संरक्षण, दहशतवादविरोधी सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतील दृढ संबंधांना या दौऱ्यामुळे नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

जॉर्डनचा दौरा आटोपून पंतप्रधान १६ आणि १७ डिसेंबर रोजी इथियोपियाला भेट देतील, त्यानंतर १७ आणि १८ तारखेला ते ओमानला जाणार आहेत.

****

देशाचे पहिले गृहमंत्री सदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाचं आणि मजबूत भारताच्या उभारणीत त्यांच्या अतुलनीय भूमिकेचं स्मरण करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

****

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज त्याच्या GOAT इंडिया दौर्याच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी नवी दिल्लीत पोहोचेल. अरुण जेटली मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी मेस्सी तीन युवा ट्रॉफी जिंकणार्या मिनर्वा अकादमीच्या संघांचा सत्कार करणार आहे, तसंच काही मान्यवर खेळाडू फुटबॉलचा सामना देखील खेळणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने काल मुंबईत मेस्सी याच्या उपस्थितीत प्रोजेक्ट महादेव या राज्यस्तरीय क्रिडा उपक्रमाचं उद्घाटन केलं. 

****

भारतीय रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक विद्युतीकरण पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. २०१९ ते २०२५ दरम्यान ३३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गाचं विद्युतीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीत विद्युतीकरण झालेलं एकूण अंतर जर्मनीच्या संपूर्ण नेटवर्कच्या अंतराइतकं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमावरुन गोंधळ निर्माण केल्याचा आरोप करत भाजपने काल काँग्रेसवर टीका केली. नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली. संसदेत निवडणूक सुधारणांबाबत व्यापक चर्चा आधीच झाली आहे. या चर्चेदेम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना मुद्देसूद उत्तरं दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था – आयआयटी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अवानरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा कायदा मंजूर केला असून, त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.

****

शास्त्रीय संगीत रसिकांची स्वरपंढरी मानल्या जाणाऱ्या ७१व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल पुण्यात सांगता झाली. गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर रंगलेल्या या स्वरांच्या महोत्सवात शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनीही आपल्या कलेचं सादरीकरण केलं आणि त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.

****

माता–बाल संगोपन, कुटुंब कल्याण आणि नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नांदेड जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. यासंदर्भातल्या अहवालात नांदेड जिल्ह्याने माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात योग्य कार्य केल्याचं स्पष्ट झालं आहे.

****

खगोलप्रेमींना १३ आणि १४ डिसेंबर रोजी आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत दृष्य पाहायला मिळालं. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्कावर्षाव होता. हा उल्कावर्षाव मिथुन या तारकासमूहात झाल्यानं, त्याला मिथुन उल्कावर्षाव असं नाव देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीने उल्कावर्षाव निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कन्नड तालुक्यात मोहरा इथल्या पुंडलिकराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात या उल्कावर्षावाचं निरीक्षण करण्यात आलं. विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते.

****

 

No comments: