Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली.
सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या
पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी
समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागाने केलेल्या परिवर्तनामुळे
या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही
वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आता मुल्याधारित शिक्षण
सुरु करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण
भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं
पुष्प देऊन स्वागत केलं.
****
२१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय
आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. दिल्ली इथं
आज झालेल्या योग दिनाच्या
पूर्वतयारीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' ही या वर्षीच्या
योग दिनाची संकल्पना आहे. संस्कृती मंत्रालयातर्फे
देशभरातल्या १०० प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात अडीच हजार ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची
माहिती जाधव यांनी दिली. योग केवळ भारताचा सांस्कृतिक वारसा न
राहता आरोग्य आणि कल्याणासाठीची एक सामायिक जागतिक चळवळ बनला असल्याचं त्यांनी
नमूद केलं.
****
फ्रान्समधल्या एव्हियन इथं ५२व्या G7 शिखर परिषदेची आजपासून सुरुवात होत आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका
आणि युरोपियन युनियनचे नेते सहभागी होत आहेत. फ्रान्सने भारतासह नऊ देशांना विशेष निमंत्रण
दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा G7 परिषदेतील हा सलग १३वा सहभाग असून, ते उद्या
संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. या परिषदेत भू-राजकीय आव्हाने, आंतरराष्ट्रीय शांतता,
जागतिक सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि सध्याच्या प्रमुख जागतिक संकटांवर सखोल चर्चा
होणार आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात काल भाविकांना घेऊन जाणारी गाडी विहिरीत कोसळून झालेल्या
अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमांवरील संदेशात या
अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करत जखमींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान मोदी यांनी या अपघातातल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन
लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहिर केली.
माळशिरस तालुक्यात तांदूळवाडी गावाजवळ झालेल्या या अपघातात आठ जणांचा मृत्यू
झाला, तर सात जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं.
****
'अल निनो'च्या परिस्थितीचा परिणाम होऊनही देशात अन्नधान्याचा पुरेसा राखीव साठा असून अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. नवी
दिल्ली इथं आज झालेल्या 'माइंडमाइन समिट' मध्ये त्या बोलत होत्या. यावर्षी नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, खरीप
हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, आगामी रब्बी
हंगामासाठी खतांचा पुरवठा नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल, अशी माहितीही
सीतारामन यांनी दिली.
****
गेल्या बारा वर्षांच्या कार्यकाळात केंद्र
सरकारने देशातल्या मध्यमवर्गीयांना आर्थिक सुरक्षा, उत्तम सुविधा आणि नवीन संधी देऊन सक्षम करण्यासाठी व्यापक
बदल केले असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरील संदेशात त्यांनी सरकारच्या विविध धोरणांचा उल्लेख केला. यात प्राप्तिकर
सुधारणांद्वारे कर सवलत आणि जीएसटीद्वारे कर प्रणालीतील पारदर्शकता यांचा समावेश
आहे. उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत यांसारख्या उपक्रमांमुळे नागरिकांसाठी मूलभूत
सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना, यासारख्या उपक्रमांमुळे सरकारने
मध्यमवर्गीय ग्राहकांना सक्षम केलं आहे. हा वर्ग आता भारतीय अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख शक्ती बनला असून, 'आत्मनिर्भर
भारत' आणि 'विकसित भारत' या संकल्पनांना
गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं
नबीन यांनी नमूद केलं.
****
No comments:
Post a Comment