Saturday, 6 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 06 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०२ सकाळी.०० वाजता

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसन्मान, सुशासन आणि राष्ट्र रक्षणाच्या मूल्यांवर आधारित शासन व्यवस्था निर्माण केली आणि त्यामुळे जनतेमध्ये नव्यानं आत्मविश्वास बळावला. बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प केला आणि मुघलांना आव्हान दिलं आणि आजही त्यांचं जीवन लाखो युवकांना देशभक्ती आणि सांस्कृतिक गौरवाच्या भावनेने प्रेरित करत असल्याचं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत काल राज्यशासन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जेबील कंपनी तसंच राज्यशासन आणि दुबईस्थित आरएसए ग्लोबल यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे महाराष्ट्रात चार  हजार ८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ४ हजार ७५० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.

या दोन्ही प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक, निर्यात क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला वेग मिळेल तसंच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील महाराष्ट्राचं अग्रस्थान आणखी मजबूत होणार आहे. जेबील कंपनी पुण्यातल्या प्रकल्पात १ हजार ५०० कोटी रुपयांची तर रायगडमधील उरण इथल्या प्रकल्पात २ हजार ५८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

****

अंदमान बेटांपासून १५ किलोमीटर अंतरावर श्री विजयपूरम इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले.

****

देशाच्या न्याय व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआयविषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत, चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या २० जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

अभियांत्रिकी क्षेत्रातील एक प्रमुख समूह आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग उद्योगातील अग्रेसर कंपनी असलेल्या सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडने नाशिक मधल्या पिंपळगाव गरुडेश्वर इथं आपल्या 'एक्स्ट्रा हाय-व्होल्टेज' स्विचगिअर उत्पादन प्रकल्पाचं कामकाज सुरू केल्याची घोषणा केली. उच्च-व्होल्टेज चाचणी प्रयोगशाळांसह प्रगत उत्पादन आणि चाचणी सुविधांनी सज्ज असलेला हा प्रकल्प आहे.देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील विश्वसनीय वीज पारेषण उपकरणांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या सुविधेमुळे रेल्वे, नवीकरणीय ऊर्जा, तेल आणि वायू तसंच पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्प यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांना सेवा देण्याची सीजीची क्षमता बळकट होते.

****

मुंबईतल्या जुहू चौपाटी इथल्या समुद्रात पोहायला उतरलेल्या १६ वर्षीय मुलाचा काल बुडून मृत्यु झाला.काल दुपारी चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  सरफराज खान असं त्याचं नाव असून  समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्यामुळे तो खोल समुद्रात ओढला गेला.जीवरक्षकांनी समुद्रात उडी घेऊन बुडालेल्या सरफराजला बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

****

ठाणे जिल्ह्यात पनवेल-मुंब्रा महामार्गावरील दहिसर मोरी भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल सापळा रचून तब्बल एक कोटी २८ लाख रुपये किमतीचं गोवा बनावटीचं विदेशी मद्य तसंच २८ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एक कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.गोव्यात निर्मिती केलेल्या या बाटल्यांवर कोणताही बॅच नंबर किंवा किरकोळ किंमतही छापलेली नव्हती.या प्रकरणात अटक केलेला चालक प्रवीण कुमार याच्याकडून दारूचा साठा, ट्रक आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

****

भारतीय हवामान विभागाने आज केरळ, माहेमध्ये आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्येही दिवसभरात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, तेलंगणा, कोकण, गोवा, रायलसीमा, अंदमान आणि निकोबार बेटं आणि लक्षद्वीपमध्येही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे.

दरम्यान सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर आणि परिसरातही काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळकठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...