Tuesday, 30 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२ सकाळी.०० वाजता

****

पश्चिम आशियातल्या युद्धग्रस्त परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री तसंच वितरणावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काल यासंदर्भात घोषणा केली. देशातल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १२ जून रोजीचा आदेश उद्या एक जुलै पासून मागे घेण्यात आला आहे.

****

राज्यशासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ‘आधार’ संदर्भातली माहिती बँकेच्या शाखेत देण्याचं आवाहन सहकार विभागाने केलं आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचं सहकार विभागाचं नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातल्या सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. सहकार आयुक्त आणि निबंधक तसंच जिल्हा बँकर्स समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. याअंतर्गत येत्या २९ जुलै पर्यंत मतदान-केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या पाच ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर चार सप्टेंबर पर्यंत प्रारुप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील, आणि सात ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात एक लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात सुमारे २७ लाख ७७ हजार मतदारांचं विशेष सखोल पुनरिक्षण केलं जाणार आहे.

****

सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठं यश आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पाणी फाऊंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप २०२६ स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शासन आणि केंद्र शासन त्र्यंबकेश्वर परीसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा देत असून, त्या पूर्ण झाल्यानंतर या गावाचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर इथं ६१ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. त्र्यंबकेश्वर इथं दर्शन पथ, नवीन घाट, रस्ते तयार करण्यात येत असून, गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील, असंही नियोजन करण्यात असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

****

केंद्र शासनाच्या ‘हीट रेसिलियंट सिटीज’ अर्थात उष्णता-रोधक शहर उपक्रमासाठी देशातल्या निवडक १२ शहरांमध्ये नाशिकची निवड झाली आहे. याअंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून शहरातल्या वाढत्या उष्णतेच्या परिणामांना कमी करण्यासाठी तसंच आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी तब्बल पाच कोटी रूपयांचं अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. या समावेशाने ‘स्वच्छ नाशिक, हरित नाशिक’ आता पर्यावरणीय दृष्ट्या अधिक सक्षम होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.

****

२०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघाने ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला टी–ट्वेंटी स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल.

****

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. फुलर्टन इथं झालेल्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला १५-२१, २१-१६,९-२१ असा पराभव पत्करावा लागला.

****

मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्हे, विदर्भ, खान्देश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...