Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 June 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जून २०२६ सायंकाळी
६.१०
****
·
इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट
देण्याचा सरकारचा निर्णय
·
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के; घरभाडे भत्त्यातही
वाढीची घोषणा
·
विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघ निवडणुकीतून गोकुळ गिते
यांची माघार
·
संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातून अनेक नामवंतांचा
गौरव
·
फिफा-फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून प्रारंभ
आणि
·
मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस पावसाचा
यलो अलर्ट
****
केंद्र सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन
शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या २२ टक्के, २५ टक्के, २७ टक्के
आणि ३० टक्के इंधन मिश्रणांवर आता उत्पादन शुल्क आकारलं जाणार नाही. अर्थमंत्रालयानं
आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
जागतिक पातळीवर अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातही, भारत
आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची अकरावी बैठक झाली,
त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल
करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही
पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, शेतकरी कल्याण हे केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी
एक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर
एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र
सरकार कोणतीही कसर सोडत नाही, शेतकरी हे देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया
आहेत असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ काल
झालेल्या हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन सैनिक हुतात्मा झाले. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या
कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं, म्हटलं आहे.
****
प्रवाशांकडून अतिरिक्त रकमेची सक्ती करणाऱ्या आणि ती न मिळाल्यास
प्रवास रद्द करणं अथवा मानसिक त्रास देणाऱ्या ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवा
देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाईचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात
आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा,
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. आज मुंबईत
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत घेतलेल्या एका बैठकीत
त्यांनी ही घोषणा केली. कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय त्यांनी
जाहीर केला. महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा
दिलासादायक निर्णय ठरणार आहे.
****
राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी
राज्य शासनाने विटा, कौलं निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी ७०० ब्रासपर्यंत माती
आणि वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज
नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. राज्य सरकारने आता कुंभार समाजासाठी
विशेष धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाअंतर्गत राज्यातील कुंभार समाजातील
कुटुंबांची नोंदणी करण्यात येणार आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या
निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार गोकुळ
गिते यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री
गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत
गिते यांच्यासोबत बोलणी केली. दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने
गिते हे माघार घेत असल्याचं गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सामाजिक माध्यमं आणि
इतर माध्यमातून काही बोगस जाहिराती निघाल्या असून, अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर
विश्वास ठेवू नये, असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. कृषी विभागाच्या
कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत प्रसिद्धी
माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. अर्जासाठी शुल्क
भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचं आवाहन किंवा संशयास्पद
लिंकला बळी पडू नये, असं भरणे यांनी म्हटलं आहे.
****
सायबर गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं थायलंडमधून
भारतात प्रत्यार्पण झालं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाइन अर्धवेळ
नोकऱ्यांचे आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालय,
गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात
आली.
****
घर सांभाळणाऱ्या महिलांना केवळ गृहिणी म्हणून संबोधित केलं
जाऊ नये, या शब्दामुळे समाजातील त्यांच्या योगदानाचं मूल्य कमी होतं, असं सर्वोच्च
न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह
यांच्या पीठाने एका याचिकेवरील सुनावणी करताना हे मत नोंदवलं. गृहिणींचं कार्य केवळ
घरगुती कामकाजापुरते मर्यादित नसून, त्या कुटुंब संस्थेत आणि भावी पिढ्या घडवण्यात
अमूल्य योगदान देतात, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.
****
सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष २०२४ आणि २०२५ साठीच्या संगीत
नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतल्या
१०८ कलाकारांची निवड करण्यात आली. उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कारांसाठी १०६
युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातले गायक
पंडित अरुण कशाळकर, कथक नृत्यगुरु मनीषा साठे, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनईवादक
शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक
कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारूडकार
भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच, हार्मेोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत
प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुलीनाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य
आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, ताम्रपट
आणि शाल असं अकादमी पुरस्काराचं स्वरुप आहे. तर २५ हजार रुपये, ताम्रपट आणि शाल असं
उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ साठीच्या प्रवेश
परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी प्रत्यक्ष
पद्धतीने होईल. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर
मिळेल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत
४५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत समीर
अब्दुल सत्तार, यांच्यासह चार जणांनी अपील दाखल केलं आहे. या निवडणूक प्रक्रियेत २३
जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून ४ जुलैला मतदान आणि ५ जुलैला मतमोजणी होणार आहे.
****
नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरात २० जूननंतर आंदोलन केलं
जाणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके या आंदोलनात सहभागी होणार असल्याची
माहिती लातूर इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी दिली.
****
बीड जिल्ह्यामध्ये आगामी २०२६ च्या पावसाळ्यासाठी प्रशासनाने
विभागनिहाय वृक्ष लागवडीचे विशेष उद्दिष्ट निश्चित केले असून, संबंधित यंत्रणेच्या
अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. शालेय स्तरावर एक शाळा, एक विद्यार्थी,
एक झाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण
करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केल्या.
****
फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत
आहे. पहिला सामना यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यंदाच्या
विश्वचषकात तब्बल ४८ संघ सहभागी होत असून, ही स्पर्धा फिफा विश्वचषकाच्या इतिहासातली
सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम सामना १९ जुलै रोजी खेळवला जाणार आहे.
****
हवामान
मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यांना
पुढचे तीन दिवस तर जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे. या सर्व जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात
आली आहे. विभागातल्या इतर जिल्ह्यांतही पुढचे काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या
पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, अहिल्यानगर तसंच नाशिकसह कोकण, विदर्भ तसंच पश्चिम
महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment