Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 June 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जून २०२६ सायंकाळी
६.१०
****
· नसरापूर बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला
फाशीची शिक्षा
· सदर प्रकरणी जलद तपास आणि निकालाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून
यंत्रणेचं अभिनंदन
· पुढील वर्षापासून ऑनलाईन
टीईटी घेणार-शालेय
शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच
· विधानपरिषदेच्या
उपसभापती पदासाठी १ जुलै रोजी निवडणूक
आणि
· मराठवाड्यातल्या
जलसाठ्यात
गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ९ टक्क्यांनी घट
****
पुणे जिल्ह्यातल्या
नसरापूर इथल्या बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा
सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या
न्यायालयाने गेल्या २५ तारखेला सदर आरोपीला दोषी ठरवलं होतं.
आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष
आणि 'दुर्मीळातील दुर्मीळ' स्वरूपाचा
असल्याचं सांगत न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा
ठोठावली. साडे तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात सादर परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं
निरीक्षण नोंदवत, केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार
ठरू शकत नसल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.
या प्रकरणाचा जलद तपास
आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी न्यायालय,
पोलीस, वकीलांचे आभार मानले आहेत.
विधानसभेत त्यांनी यासंदर्भात केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री
म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
शिक्षक पात्रता परीक्षा
– टीईटी पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. आज यासंदर्भात विधानसभेत निवेदन करतांना, भुसे
यांनी, सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असं भुसे यांनी सांगितलं.
फेरीपरीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार असल्याची ग्वाही भुसे यांनी दिली. ते म्हणाले
-
बाईट - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
दरम्यान, टीईटी पेपर फुटीप्रकरणी विधिमंडळाच्या
दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. यासंदर्भात विरोधकांचा स्थगन
प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांनी
सभात्याग केला.
विधानपरिषदेत विरोधकांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
द्यावा,
शिक्षणमंत्र्यांनी
राजीनामा द्यावा तसंच शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं, आदी मागण्या करत, हौद्यात उतरून घोषणाबाजी
केली.
त्यामुळे सभापतींना सभागृहाचं कामकाज
अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं.
****
राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी
शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल, अशी माहिती शिक्षण
मंत्री भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. थोरामोठ्यांच्या
कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या
शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसल्याचे शिक्षण
मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं.
****
यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध
भागांत वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका १ लाख २२
हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी ७ लाख
९ हजार शेतकऱ्यांना ७१७ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन
मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
****
राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही
प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज पुरवणी
मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. या कर्जमाफीचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना
होणार असल्याचा दावा केला जात असला, तरी चार वेळा नियमित
कर्जफेड केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही, अशा कठोर अटी घालून सरकारने
शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
****
वन्यप्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या
ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या
ठिकाणी जाऊ नये,
असं
वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या सूचनेचा भंग केल्यास कारवाईचा इशारा वनमंत्र्यांनी दिला.
****
राज्यात
अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून साडे ११ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत.
८३० हेक्टर पेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून, ५४९
गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.
****
विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक परवा १ जुलै रोजी घेण्याची
घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांना उद्या दुपारी १२
वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, छाननी उद्या दुपारी १ वाजता होईल, असं सभापतींनी सांगितलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातले शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
तसंच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलीस दलात अतुलनीय शौर्यासाठी
हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन
यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या आठ नवनिर्वाचित आणि पुनर्निवाचित सदस्यांना शपथ
दिली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे.
****
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ
होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय
रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरण सेवा उपक्रम’ यंदाही राबवण्यात येत
आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या
उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून
दिल्या जातात. या उपक्रमात जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती
संभाजीनगरसह
११
प्रमुख जिल्ह्यांतून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सुमारे
४०० विश्रांती आणि मुक्काम स्थळांचा समावेश आहे.
****
राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व
वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठीची मुदत उद्या संपत आहे.
नियमांचं
पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार १ जुलैपासून कडक कारवाई
करण्यात येणार आहे. दरम्यान, ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसवण्यासाठी
अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक
कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
****
आपल्या दिव्यांगत्वावर मात करून प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध
क्षेत्रात चांगल कार्य करणाऱ्यांना आणि शासकीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग
कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ मिळणार आहे. शासन मान्यता प्राप्त
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी
याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. राज्यातील सर्व जिल्हा
परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या
कार्यक्षेत्रातील शासकीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग कर्मचाऱ्यांना तात्काळ आगाऊ
वेतनवाढ देण्याविषयी आदेशित केलं आहे.
****
ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध
समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करावं, असे निर्देश जालन्याच्या
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. आज झालेल्या जिल्हास्तरीय
स्थलांतरपूर्व नियोजन समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत कामगारांना स्वतंत्र ओळखपत्रं देण्यासाठी नवीन
कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.
****
यंदा पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या
वर्षीच्या तुलनेत सुमारे ९ टक्क्यांनी घट झाली आहे. विभागात ११ प्रमुख
प्रकल्पांमध्ये सरासरी ३३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
जायकवाडी धरणातील जलसाठा हा २१ टक्क्यांच्या खाली आला आहे. गेल्या वर्षी
याच दिवशी जायकवाडीत सुमारे ४१ टक्के जलसाठा होता. मांजरा तसंच माजलगाव १९ टक्के, तर निम्न दुधना धरणात २५ टक्के
उपयुक्त जलसाठा आहे. येलदरी धरणात सर्वाधिक ५१ पूर्णांक ४६ टक्के जलसाठा असून, सिद्धेश्वर धरणात उपयुक्त जलसाठा शून्य
टक्के आहे.
****
हवामान
जालना शहरासह जिल्ह्यात
आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून
पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर जिल्ह्यात आज सलग
दुसऱ्या दिवशीही लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील
जळकोट, उदगीर आणि रेणापूर तालुक्यांमध्ये
शंभर मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
****
No comments:
Post a Comment