Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 May 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०६ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, निवडणूक आयोगानं विधानसभेच्या स्थापनेबाबत
अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडे पाठवण्यात आली
आहे. मतदान प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, कायदेशीर चौकटीचे पालन करत, मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार
पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या
लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे मुख्य
सचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना निवडणुकीनंतर होणाऱ्या हिंसाचारादरम्यान कडक कारवाई करण्याच्या
सूचना दिल्या आहेत.
****
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम
हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी लाम यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष लाम यांच्यात आज द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक
सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या श्री राजुरेश्वर
मंदिरात काल अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे साडेचार
लाख भाविकांनी गणपतीचं दर्शन घेतलं. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात पेयजल, कुलर तसंच अन्य सुविधा उपलब्ध करून
देण्यात आल्या होत्या.
****
लातूर मनपाच्या वतीने आज आणि उद्या
गंजगोलाई परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. या भागातले फेरीवाले, व्यापारी तसंच गाळेधारकांनी आपल्या दुकानासमोरचं अतिक्रमण तत्काळ काढून घेण्याची सूचना मनपा प्रशासनाकडून
करण्यात आली आहे.
****
पालघर इथं तेरा वर्षांच्या बालिकेवर
अघोरी पूजेच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणाऱ्या पंचावन्न वर्षीय भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. यासोबतच जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आणि विशेष सरकारी
वकील नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, डॉ. गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संपर्क
साधून त्यांना धीर दिला.
****
आयसीसीने पुरुषांची नवीन टी २० सांघिक
क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारत अव्वल स्थानी कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या
नेतृत्वाखालील भारताने २७५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे २६२ गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया २५८ गुणांसह
तिसऱ्या स्थानी आहे.
****
पंजाबच्या जालंधर येथील बीएसएफ मुख्यालयासमोर
मंगळवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटानंतर रात्री उशिरा अमृतसरमध्येही मोठा स्फोट झाला
आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांची चौकशी सुरू केली आहे. अमृतसरमध्ये खासा कॅम्पजवळ असलेल्या आर्मी कॅम्पच्या बाहेर रात्री उशिरा
हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस
आणि लष्कराच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सुरक्षा वाढवली आहे. याशिवाय फॉरेन्सिक
टीम आणि डॉग स्क्वॉडला तपासासाठी पाचारण केला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची
वृत्त नाही.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू
होणाऱ्या सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्य शिक्षण मंडळानं मंजुरी दिली आहे.
अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. काल झालेल्या महाराष्ट्र प्राथमिक
शिक्षण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून दुसरी, तिसरी आणि चौथीसोबतच सहावीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
****
मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील
१९ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी
दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामुळे या भागातील
पर्यटनाला चालना मिळेल असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील
न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेही
पंतप्रधानांनी कौतुक केले. हा निर्णय देशाची न्यायिक पायाभूत सुविधा बळकट करेल आणि
जनतेला जलद न्याय मिळण्याची खात्री देईल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय
मंत्रिमंडळानं कपास कांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता
दुप्पट करणं, हे या निर्णयाचं उद्दिष्ट
आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी ही माहिती दिली. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या मिशनसाठी पाच
हजार ६५९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आगामी पाच वर्षांसाठी हे मिशन राबवलं
जाणार आहे, याअंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची
दोन हजार केंद्रं सुरू केली जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment