Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर
होत असलेल्या हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांबाबत निवडणूक आयोगाने कडक निर्देश जारी
केले आहेत. हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त
ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील विविध
भागांतून हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर
निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना निवडणुकीनंतर
होणाऱ्या हिंसाचारादरम्यान कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, कोलकात्यातील न्यूटाउन परिसरात काल एका भाजप कार्यकर्त्याची
मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी निषेध
आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
****
पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदार गटाच्या नेतेपदाच्या निवडीसाठी
केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची तर
तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची केंद्रीय सह-निरीक्षक म्हणून नियुक्ती
केली आहे.
आसाममध्ये मंत्री जे.पी नड्डा यांची केंद्रीय पर्यवेक्षक
म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची केंद्रीय
सह-निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण
विभागाच्या वतीने “खिळे मुक्त झाडं...वेदना
मुक्त निसर्ग” ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली
आहे. या मोहिमेत आतापर्यंत जवळपास १५० झाडांना खिळे आणि तारांपासून मुक्त करण्यात आलं.
ज्या नागरिकांनी अथवा जाहिरातदारांनी झाडांवर खिळे, बोर्ड, आणि केबल्स लावल्या असतील, त्या सात दिवसांच्या आत काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा मनपा प्रशासनाने दिला
आहे.
****
नाशिकमधील श्री काळाराम मंदिराच्या कळसावर एकवीस फुटी
धर्मध्वजाचं आज संध्याकाळी अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी
राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सोरामकुंड
इथं श्री रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने गोदावरी आरती होणार आहे.
****
नाशिक इथं आज उद्योग कुंभ आणि गुंतवणूक परिषदेचं आयोजन
करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या वतीने आयोजित या परिषदेमध्ये पंधरा ते वीस हजार कोटी
रुपयांचे करार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या परिषदेचा
समारोप होणार असून यावेळी विविध सामंजस्य करार होणार आहेत.
****
कोल्हापूर इथल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ
संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या ‘वाघनखांचे’ प्रदर्शन चार नोव्हेंबर २०२६ पर्यंत
वाढवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनाने
या प्रदर्शनाच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ संग्रहालयातून ही ऐतिहासिक वाघनखं तीन वर्षांच्या मुदतीसाठी करारावर भारतात आणण्यात आली आहेत.
****
भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह
अवकाळी पावसाने जोरदार झोडपून काढलं. कालचा सर्वात जास्त पाऊस हा तुमसर, मोहाडी तालुक्यांत पडला आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान
पीक लागवड केली आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे धान भुईसपाट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
झालं आहे.
****
ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल केलेल्या
कारवाईत बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. विभागानं त्यांच्याकडून
एक कोटी ४० लाख रूपयांच्या बनावट विदेशी मद्यासह एक कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
केला, अशी माहिती कोकण विभागीय उपायुक्त
प्रदीप पवार यांनी दिली.
****
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या
राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो आणि बास्केटबॉल स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे.
आजपासून आठ मे पर्यंत पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धा
होणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १० राज्यांतील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष
आणि महिला गटातील तब्बल ४१ संघांचे सुमारे ५३८ खेळाडू सहभागी होत आहेत.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या सहावीच्या
नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्य शिक्षण मंडळानं मंजुरी दिली आहे. अशी माहिती शालेय
शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. काल झालेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून दुसरी, तिसरी आणि चौथीसोबतच सहावीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार
आहे.
****
इंडीयन प्रिमियर लिग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स
हैदराबादचा सामना पंजाब किंग्सशी होईल. हैदराबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला
सुरूवात होईल.
****
No comments:
Post a Comment