Thursday, 28 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पोलीस हे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक नसून नागरिकांचे मित्र आणि मार्गदर्शक बनले पाहिजेत, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून, गंगटोक इथं सिक्कीम पोलिसांना ‘प्रेसिडेंट्स पोलिस कलर’ प्रदान सोहळ्यात त्या आज बोलत होत्या. पोलिसांनी लोकांच्या समस्या समजून घेत मदतीची भूमिका स्वीकारली, तर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल. यामुळे समाजात सुरक्षा, कायदा आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं.

****

राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबतच्या शिफारशी असलेला एक सविस्तर अहवाल गृह मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश, देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. अलीकडील कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क बळकट झाले असले तरी, कायदेशीर जागरूकता आणि न्यायाची उपलब्धता आणखी सुधारण्याची गरज असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. हा अहवाल विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो. तसंच, मुस्लिम महिलांशी संबंधित विविध कायद्यांचा आढावा घेण्यात आला.

****

देशाच्या काही भागात ईद–उल–अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं बकरी ईद निमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करुन, एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

हिंगोलीतही बकरी ईद उत्साहात साजरी होत आहे. शहरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण करण्यात आलं.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, नेते तसेच स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने म्हैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंतांचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे चार किलो वजनाचे भारतीय हत्तीचे हस्तिदंत जप्त करण्यात आले.

****

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत आय एफ एम एस आणि ॲग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफ एस ए एस हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून, QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर तीन दिवसांत निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण म्हणजेच ‘F’ ग्रेड मिळाला आहे, अशा तब्बल २९ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक आठरा, लातूर जिल्ह्यातल्या सात आणि परभणी जिल्ह्यातल्या चार महाविद्यालयांचा समावेश आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षणात एकूण ७२ महाविद्यालयांच्या यादीमध्ये केवळ पाच महाविद्यालयांना ‘O’ ग्रेड आणि ११ महाविद्यालयांना ‘A’ ग्रेड मिळवता आला आहे. १३ महाविद्यालयांना B ग्रेड, चार महाविद्यालयांना C ग्रेड, पाच महाविद्यालयांना D ग्रेड मिळाला आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. बीड शहरातल्या सहा उपकेंद्रावर ही परिक्षा होणार असून, जिल्ह्यातून एकूण १ हजार ५३० उमेदवार परिक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

****

बंगळूर इथं सुरू असलेल्या आठव्या इंडियन खुल्या पॅरा ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा दुहेरी पॅरालिम्पिक विजेता भालाफेकपटू सुमित अंतिल यानं स्वतःचाच जागतिक विक्रम मोडला आहे. पुरुषांच्या भालाफेकीतील एफ-६४ प्रकारात सुमितनं ७४ पूर्णांक ८२ मीटर लांब भाला फेकून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...