Friday, 29 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सीबीएसईच्या बारावी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन-केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

·      नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

·      सत्तेत सहभागापासून वंचित असल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत

·      प्रख्यात शायर डॉ. बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन

·      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत २९ महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश

आणि

·      नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेड इथं दोन विद्यार्थिनींसह कुटुंबीयांची चौकशी

****

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल, मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

****

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मे २०२३ मध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सिद्धरामैया दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. यापूर्वीही त्यांनी २०१३ ते २०१८ या कालावधीत मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. कॉग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे नामनिर्देशित मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं, अशी विनंती सिद्धरामैया यांनी राज्यपालांकडे केली आहे. काँग्रसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते, अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.

****

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार, असा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. अल निनोमुळे कमी पावसाचं भाकीत व्यक्त होत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अहमदपूर परिसरातल्या हजारो कार्यकर्त्यांनी काल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, या मेळाव्यात पोलिसांनी पत्रकारांशी कथित धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून, सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल दिल्ली इथं पत्रकारांशी संवाद साधत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असं त्यांनी सांगितलं. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असून, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेत, सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं. जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३० मेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे.

****

भाजप-शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस सहभागी झाल्याने रिपाईचं महत्त्व कमी झालं, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. रिपाईंला सत्तेत सहभाग मिळत नसून, पक्षाचा एखादा मंत्री असायला हवा होता, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला विधान परिषद किंवा महामंडळ मिळायला हवं, असं सांगतानाच, महायुतीत रिपाईला दुर्लक्षित करू नये, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.

****

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरीद काल राज्यात भक्तिभावाने साजरा झाला. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदागहमधे नमाज अदा करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर इथं बकरीद निमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करुन, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीतल्या  ईदगाह मैदानावर नमाज पठण केली, बीड जिल्ह्यात विविध ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

धाराशिव इथं जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीने सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बीड इथल्या सावरकर महाविद्यालयातही सावरकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. 

****

प्रख्यात शायर डॉ. बशीर बद्र यांचं काल भोपाळ इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतिभ्रंशाचा आजार होता, गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती, काल त्यांचं निधन झालं, बशीर यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत,

जिंदगी तूने मुझे कब्र में कम दी है ज़मी।।

पांव फैलाऊं तो दीवार से सर लगता हैं

 

आयुष्याकडे अशी तक्रार करणारे बशीर बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं झाला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मेरठ इथल्या महाविद्यालयात कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं.

बशीर यांचे हिंदीत १२ हून अधिक तर उर्दूत सात काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

 

खुदा हम को ऐसी खुदाई न दे।।

कि अपने सिवा कुछ दिखाई न दे

अशा साध्या सोप्या शब्दांचा नेमका वापर, हे बशीर यांच्या रचनांचं सौंदर्य मानलं जातं. त्यांच्या रचनांमधून स्नेह, विरह, वेदनेसह जीवनातलं प्रतिबिंब उमटतं, म्हणूनच त्यांच्या रचना जनमानसात प्रिय ठरल्या..  

आपल्या एका रचनेत ते म्हणतात,

 

सात संदूकों में भर कर दफ्न कर दो नफरतें।।

आज इंसा को मोहब्बत की जरूरत हैं।

साहित्यातील योगदानाबद्दल डॉ. बशीर बद्र यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बद्र यांना श्रद्धांजली वाहिली. बद्र यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

****

नांदेड शहरातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्योती देशमुख यांचं काल नांदेड इथं निधन झालं, त्या ८३ वर्षांच्या होत्या. डॉ. देशमुख यांनी नांदेड इथं महिला महाविद्यालय सुरू करण्यात पुढाकार घेतला, अर्धापूर इथं ‘मीनाक्षी देशमुख मुलींचे हायस्कूल’ स्थापन करण्यातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशमुख यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणूनही कार्य केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण म्हणजेच ‘F’ ग्रेड मिळाला आहे, अशा तब्बल २९ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक ठरा, लातूर जिल्ह्यातल्या सात आणि परभणी जिल्ह्यातल्या चार महाविद्यालयांचा समावेश आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरात काल दोन ठिकाणी चौकशी केली. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून शहरातल्या दोन विद्यार्थिनींची आणि कुटुंबाची चौकशी करण्यात आली. यापूर्वीही १६ मे रोजी नांदेडमध्ये एका विद्यार्थिनी आणि पालकांची सीबीआयच्या पथकाने चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक दोन, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक सहा, बीड ३९ पूर्णांक एक तर धाराशिव इथं ३८ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...