Friday, 15 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 15 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मे २०२ सकाळी .०० वाजता

****

वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट युजी पुनर्परिक्षा येत्या २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परिक्षा संस्था – एनटीएने आज ही घोषणा केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शिक्षण मंत्रालय, एनटीए, सीबीएसई, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परिक्षेसंबंधी केवळ एनटीएच्या अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन संस्थेनं केलं आहे. पेपरफुटी मुळे या महिन्यात तीन तारखेला झालेली नीट परिक्षा रद्द करण्यात आली होती, सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते युएई मध्ये पोहोचणार असून, राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

****

जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर १०६ रुपये ६८ पैसे प्रति लिटर तर डिझेलचा दर ९३ रुपये १४ पैसे प्रति लिटर झाला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९७ रुपये ७७ पैसे, आणि डिझेलचा दर ९० रुपये ६७ पैसे प्रति लिटर इतका झाला आहे.

****

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीसंदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे डॉ नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

****

येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये, यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वज प्रदान कार्यक्रमात ते काल बोलत होते. पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकूल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून, याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे, येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.

****

राज्य सरकारनं विदर्भातल्या साडे पाचशे किलोमीटरच्या महामार्गांना काल मंजुरी दिली. नागपूर – गोंदिया, भंडारा- गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि नवेगाव मोरे- कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर २०२८ पर्यंत हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकासकामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी, या उद्देशानं विकासकामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसने केला.

****

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने बारामती तालुक्यातल्या होळ इथं उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्रासह, जिल्ह्यातल्या ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

****

चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया १०० टक्के पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व नऊ वाड्यांमधल्या ४२५ कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

****

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधुचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जपानच्या अकाने यामागुची सोबत होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज दुपारी थायलंडच्या खेळाडूसोबत होणार आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट आज लखनौ सुपर जायन्ट्स आणि चेन्नई सुर किंग्ज यांच्या सामना होणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...