Thursday, 7 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्यास कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

·      नगरपालिका तसंच महानगरपालिकांमधल्या जमिनींचे सातबारा उतारे बंद

·      नाशिक गुंतवणूक परिषदेत सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार

·      राज्यातल्या महिला अत्याचार प्रकरणांची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल

आणि

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसआयआर अंतर्गत मतदार मॅपिंगचं काम दहा मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

****

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागाने काल यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान २० वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन मिळेल. ही रक्कम किमान साडे ७ हजार रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण दहा वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्याअंतर्गत निवृत्तीवेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्तीवेतन मिळणार नाही, त्याला फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ६० टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा १० टक्के व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठे, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानिक शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांनाही हे नियम लागू होतील. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल.

****

राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी, सोबत सुमारे तीन हजार सातशे आठ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. लातूरसह राज्यभरात नियोजित सात बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयांना याचा लाभ होणार आहे.

****

नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये हद्दवाढीमुळे ज्या नवीन गावांचा समावेश झाला आहे, अशा भागातील जमिनींचे सातबारा उतारे आता बंद करण्यात येणार आहेत. या क्षेत्रातील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचं मालमत्ता पत्रक तयार करून देण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. काल महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे.

****

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. राज्य स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारनं शासकीय पत्रव्यवहार आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य केली होती. सध्याच्या परिस्थितीत हिंदीचा फारसा वापर होत नसल्याने, ही परीक्षा सुरू ठेवणं संयुक्तिक नसल्याचं, सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDC ला देण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं, MIDC हा कर गोळा करुन आपल्या परिसरात पायाभूत सुविधा पुरवेल. त्यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

नाशिक गुंतवणूक परिषदेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या परिषदेत सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे एकूण ३१४ सामंजस्य करार करण्यात आले. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी गती मिळणार असून लहान-मोठ्या उद्योगांसाठीही ही सुवर्णसंधी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिरात, अयोध्येच्या धर्तीवर २१ फूट उंच पंचधातूचं धर्मध्वज उभारण्यात आला आहे.

****

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो तसंच अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासाठी तीन कोटी तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

****

राज्यातल्या महिला अत्याचार प्रकरणांची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलिसांशी चर्चा करून, नाशिक इथलं भोंदू खरात प्रकरण आणि टीसीएस प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने, तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याच सांगितलं. तसंच पुण्यातील चार वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सबळ पुरावे सादर करण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील अल्पवयीन पीडितेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल भेट घेतली. आरोपीला जामीन मिळू नये आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.

****

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेम्पती यांची नेमणूक झाली आहे. त्यांचा कार्यकाळ ३ वर्ष असेल. वेम्पती यांनी यापूर्वी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे.

****

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सादर केला.

****

एसटीचं नवीन NCMC कार्डचं शुल्क १९९ रुपये असून, यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी हे कार्ड सवलतीच्या दरात १४९ रुपयांना मिळणार आहे. या कार्डसाठी अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. सध्या दिव्यांगांसाठी वैयक्तिक कर्जाची मर्यादा ५० हजार आहे, ती पाच लाख रुपयांपर्यंत करावी, आदी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेलं विशेष सखोल पुनरिक्षण-एसआयआर अंतर्गत मतदार मॅपिंगचं काम दहा मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न मतदारांपैकी चोवीस लाख पंधरा हजार पस्तीस मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या शनिवारी ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपले वाद सामोपचाराने निकाली काढावेत,असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हा शाखेनं १५ लाख ९८ हजार ४२९ रुपयांचा गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू, जर्दा काल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यातील जलसंधारणाची जास्तीत जास्त कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची सूचना, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केली आहे. काल लातूर इथे यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रगतीपथावरील कामांना गती देण्याचे निर्देशही राठोड यांनी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला आजपासून सुरुवात होत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत गांधीनगर परिसरातून या सफाईला सुरुवात होणार आहे. समर्थनगर परिसरातल्या वरद गणेश मंदिरापर्यंत ही सफाई केली जाणार आहे.

****

मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत कुस्ती आणि लॉन टेनिस खेळांसाठी विभागीय निवड चाचण्या उद्या ८ तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय क्रीडा संकुलात होणार आहेत. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयामार्फत ही स्पर्धा घेतली जात आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं, अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत काल सनरायजर्स हैदराबाद ने पंजाब किंग्ज चा ३३ धावांनी पराभव केला. आज लखनौ इथे लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु यांच्यात सामना होणार आहे.

****

हवामान

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आज उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. तर, विदर्भात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात काल अकोला इथं ४२ पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४१ पूर्णांक ८ दशांश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...