Monday, 25 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये प्रत्येकी प्रति लिटर अडीच रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे.  पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 61 पैसे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैसे वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसातली ही चौथी दरवाढ आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात ६६ जणांना  पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळयात दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि ५८ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. २०२६ साठी  राष्ट्रपतींनी पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांसह एकूण १३१ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईने इयत्ता बारावीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक अडचणींबाबत मोठी कबुली दिली आहे. या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून चुकीने जास्त आणि चुकीची फी कपात झाली असल्याचं मंडळाने मान्य केलं असून, अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त घेतलेली फी परत केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल असंही सीबीएसईनं याबाबत जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे.

****

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. गायींची तस्करी,बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अमानुष अत्याचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आजपासून  २८ मे  पर्यंत  सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके आणि वाहतूक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करून आवश्यक परवानग्या आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन होत आहे का, याची पाहणी केली केली जावी तसंच  मोटार वाहन कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि केंद्र शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

****

रायगड जिल्ह्यात महाबळेश्वर जवळील आंबेनळी घाटात मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी आठशे  फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात गाडीतील आठ  जण ठार झाले. ८ पैकी आतापर्यंत पाच मृतदेह हाती लागले असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे. सातारा जिल्ह्याच्या कारेगाव तालुक्यातील आसगावचे हे आठ  तरूण हरणे बंदर इथून येत असतांना आज पहाटे घाटामध्ये चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती दरीत कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात आज पहाटे झालेल्या  तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. लळिंग घाटातून भरधाव वेगाने जाणाऱ्या रेतीच्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानं  डंपर विरुद्ध दिशेला गेला आणि समोरून जाणाऱ्या एका मालवाहू वाहनावर धडकला. याचवेळी मालेगावकडून आलेल्या ट्रॅव्हल्स वाहनाने अपघातग्रस्त वाहनांना जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी धुळ्याच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाला. संतप्त टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत अपघातात मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत, कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडं केली आहे. 

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा-केरवाडी इथली मच्छिमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघे जण थोडक्यात बचावले असून, एक मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाला आहे.

****

पाच दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. भारतसहित जगभरातील १६ लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून, ते सौदी अरेबियातील इथल्या  तंबूंच्या शहरात एकत्र येत आहेत. उद्या पहाटे हजचा मुख्य विधी म्हणजेच प्रार्थना पठण करण्यासाठी भाविक  'अरफात' मैदानाकडे रवान होणार आहेत. या वर्षीच्या हज यात्रेत भारतातून जवळपास  एक लाख ७५ हजार भाविक सहभागी झाले आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...